Thursday, September 4

महाराष्ट्रातील तरूणांत दिसतोय आशेचा किरण!




स्वार्थ आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या वातावरणात राज्य आणि देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचे, येथील लोकांना किमान सुखी-समाधानी आणि संपन्न आयुष्य जगता यावे अशी परिस्थिती निर्माण करण्याचे स्वप्न घेऊन एक सामाजिक कार्यकर्ता उभा राहिला. आपला स्वतःचा संसार न मांडता जनतेचे अश्रू पुसण्याचा वसा त्याने घेतला आणि आज ७१ व्या वर्षीही तो लढतच आहे. यशाने तो हुरळून गेली नाही. अपयशाने खचला नाही. त्याच्यातील आशावाद अजूनही तेवत आहे. तो दीपस्तंभ म्हणजे अण्णा हजारे. महाराष्ट्र कोणाचा या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी राजू परूळेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. साम मराठीवरून प्रक्षेपित झालेली ती ही मुलाखत...

महाराष्ट्रासंबंधी तुमची स्वप्नं काय?
- महाराष्ट्रातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी व्हावी. काही माणसं खाण्यासाठी जगतात आणि काही माणसं जगण्यासाठी खातात. काही माणसं काय काय खावं, यासाठी जगतात आणि काही माणसांना जगण्यासाठी काय खावं, हा प्रश्‍न असतो. आर्थिक आणि सामाजिक विषमतेची दरी वाढत चालली आहे. ती महाराष्ट्राला धोकादायक आहे. विषमता कमी करायची असेल, तर राजकारणी, समाजातील घटक सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. स्वातंत्र्याची ६१ वर्षे झाली. हा कृषीप्रधान देश आहे. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना काय कारणं असतील? शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतीवर खर्च केला, तेवढी किंमत तरी मिळावी. जीवनावश्‍यक वस्तूंच्या किंमती किती वाढल्या आहेत. तेवढ्या पटीने शेतीमालाच्या किंमती का वाढत नाहीत?

तुम्ही नुकत्याच बाळगलेल्या मौनव्रताचं कारण काय होतं?
- सरकारच्या विरोधात मौन नव्हतं. शरीरस्वास्थासाठी दीड महिना मौनात गेलो. अनेकदा पत्रव्यवहार झाले. पण सरकारमधील विविध खाती, अधिकारी, पदाधिकारी यांना जाणीव झाली नाही. म्हणून १५ ऑगस्टपासून उपोषण करायचं ठरवलं आणि सरकार जागं झालं. नद्यांमधील अमर्याद वाळू उपशाचा पर्यावरणाला धोका आहे. पण कोणी विचार करायला तयार नाही. हा प्रश्‍न बैठकीत आल्यावर याप्रकरणी धोरणात्मक निर्णय होईपर्यंत नवीन परमीट कोणाला द्यायचं नाही, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. नद्याकाठच्या गावांमधील वाळूत पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे. नद्याकाठची गावं हिरवीगार होती, ती सुकत चालली आहेत. जलसंधारणावर कोट्यावधी रूपये खर्च करतो. वाळूत नैसर्गिक जलसंधारण होतं. पण कोणाचं लक्ष नाही. प्रत्येक अधिकाऱ्याने आपली संपत्ती वेबसाईटवरून जाहीर करावी, अशी एक आमची मागणी होती. भ्रष्टाचार वाढत चालला आहे. अधिकारी बंद पाकिटातून हा तपशील सरकारला देतात. तो खुला केला पाहिजे. पतसंस्थांमध्ये गरीब, कष्टकरी, मोलकरीण यांच्या घामाचा पैसा आहे. पण पतसंस्थांच्या संचालकांनी हा पैसा दिवसाढवळ्या लुटला. आपसात पैसे वाटून घेतले. सरकारने लायसन दिलं, म्हणून लोकांनी ठेवी ठेवल्या. त्यामुळे तुम्ही ती रक्कम द्या, असं आमचं म्हणणं आहे.

कोणत्या मंत्र्यांवर तुमचा आक्षेप आहे?
- सहकारामध्ये १३ महिने आमचं आंदोलन झालं. प्रत्येक तालुक्‍यात सहकार खात्याचे अधिकारी आहेत. हजारो कोटी रूपयांचा गैरव्यवहार त्यांना दिसला नाही का?अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. प्रत्येक खात्यात काही ना काही गोंधळ आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बऱ्याच मंत्र्यांवर नाराजी आहे?
- सहकार खातं कॉंग्रेसचं आहे. जलसंधारण खातं कॉंग्रेसच्या थोरातांकडे आहे. कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी असा प्रश्‍न नाही. समाज, राज्य व राष्ट्र यांच्यासाठी विघातक कार्य करणारं कुठलंही खातं, अधिकारी किंवा मंत्री असेल... मी त्याविरूध्द बोलत आहे.

मंत्रालयात सामान्य माणसाला प्रवेशासाठी खूप कष्ट करावे लागतात. तुम्हाला दाद मिळते का?
- हो. सुरवातीला मिळत नव्हती. पण आता महाराष्ट्रात जनशक्तीचा दबाव निर्माण झाला आहे. जनतेला आंदोलनाचे महत्व कळले. जनता एकत्र येत गेली आणि संघटन झालं. पाच कायदे सरकारला करावे लागले. माहितीचा अधिकार, दफ्तरदिरंगाई, बदल्यांचा कायदा हे कायदे लोकशाहीसाठी व राज्यासाठी महत्वाचे आहेत. माहितीच्या अधिकाराचा कायदा महाराष्ट्रात आला आणि भारत सरकारलाही करावा लागला.

मुख्यमंत्री विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे तुम्ही कसे बघता?
- या दोघांच्याबद्दल माझ्या कानावर वेड्यावाकड्या गोष्टी आल्या नाहीत. पण सरकार चालवायचं म्हटलं तर "पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाए जैसा'... सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत वैयक्तिक भ्रष्टाचार किंवा चारित्र्याबद्दल माझ्यापर्यंत तक्रारी आल्या नाहीत. समाजाचं हीत साधायचं असेल, तर काही वेळा कठोर बनावं लागतं. दोघांवर माझा विश्‍वास आहे. सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे. पण ते वैयक्तिक सहभागी असल्याचे मला दिसलं नाही.

राज ठाकरे यांच्या मराठीच्या मुद्‌द्‌यावरील आंदोलनाबाबत तुमचं मूल्यमापन काय?
- राज ठाकरे यांना तरूणांची भाषा कळते. त्यामुळे महाराष्ट्रातील तरूण उभा राहत आहे. राज्याचे भवितव्य तरूणच घडवितील. काही गोष्टींचं तारतम्य ठेवावं लागेल. वैयक्तिक चारित्र्याला जपावं लागेल. शुध्द आचार, शुध्द विचार, निष्कलंक जीवन असेल, त्याला महत्व येते. महाराष्ट्राबद्दल ज्यांना तळमळ आहे, त्यांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात येऊन तोडफोड करणाऱ्यांचा व राज्याचं नुकसान करणाऱ्यांचा नाही. एकसंघ भारत निर्माण करायचा मग महाराष्ट्र माझा म्हटलाच पाहिजे. राजचं आंदोलन काही प्रमाणात बरोबर आहे. मात्र त्याला तोडफोड, जाळपोळ याबाबतीत बंधन घालावं लागेल. शेवटी स्वातंत्र्य मिळविताना जहाल व मवाळ असे दोन गट होते. मवाळांना वाटत होते, जहाल गटाचा मार्ग बरोबर नाही. जहाल वागल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, हे दुसऱ्या गटाला वाटत होते. त्यानुसार ते वागले.

राजबद्दल विश्‍वास आहे का?
- राजबद्दल विश्‍वास आहे. त्याला थोडी सुधारणा करावी लागेल. कार्यकर्ते आणि तोडफोड-जाळपोळ या भूमिकेत सुधारणा झाल्यावर अशा तरूणांच्या पाठीशी उभं राहिल्यास दोष नाही. देशाच्या व राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा तरूणांच्या पाठीशी उभं राहावं लागेल.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आर. आर. पाटील आणि छगन भुजबळांबाबत तुमचे ऍनालिसीस काय?
- छगन भुजबळ यांच्याशी जवळून परिचय आला नाही. आर.आर. पाटील यांच्याबाबत जवळून परिचय आला. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदेंबाबत मला जे जाणवतं, तसंच आर. आर.... ते चांगले कार्यकर्ते आहेत. देश, राज्य चांगलं चालवायचं असेल, तर अशा लोकांनी विधानसभेत, लोकसभेत गेलं पाहिजे. गुंड, भ्रष्ट लोक तिथं गेले आहेत.

नावं सांगा?
- ते माझ्यावर न्यायालयात बदनामीचे खटले भरतील. मी घाबरत नाही. पण ज्यावेळी वेळ येईल, तेव्हा मी सांगेन. लोकसभेत काही लोकांना अटक झाली. नोटांचं पुडकं टीव्हीवर पाहिलंत ना?

भाजपमधील गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्याबाबत मत काय?
- भाजपमधील काही नेते चांगले आहेत. या दोन नेत्यांशी जवळचा संबंध आला नाही. युती सरकार असताना उणीव दिसली होती, ती दूर करण्याचा प्रयत्न केला. तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे की, पुढारी गावी जे जे करी, ते लोक करती घरोघरी. मला समाजाला घेऊन जायचे आहे, हे पुढाऱ्याने समजले पाहिजे.

शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांच्याबद्दल मत काय?
- त्यांच्याशी माझी भेटही झाली नाही.

उध्दवजींचे एकंदर राजकारण, समाजकारण याबद्दल अंदाज काय?
- बाळासाहेबांची पुण्याई आहे, त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्याचा लाभ उध्दवजींना मिळत आहे. त्यांची परंपरा पुढे चालविण्याची आवश्‍यकता आहे. राज पूर्वी बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला. बाळासाहेबांना तरूणाईची भाषा कळते, ती त्याला कळते. उध्दवजींशी भेटायचं ठरलं होतं. पण झाली नाही. तरूणांना दिशा मिळाली, तर राज्याला व समाजाला उज्ज्वल भविष्य आहे. तरूणांना कार्यक्रम देणं गरजेचं आहे.

उर्जा, शेतकरी, औद्योगिक विकास, सेझ आदी प्रश्‍नांबाबत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार यशस्वी झालं आहे?
- पक्षाला धोरण असलं पाहिजे आणि पक्षातील प्रत्येकात ते भिनले पाहिजे. उदाहरणार्थ पर्यावरण. आज प्रत्येक पक्ष मताचा विचार करतो, समाज आणि राष्ट्राचा नाही. सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता याभोवती ते फिरत आहेत. हिंदू व्यक्ती मेली, की चार लोक तिरडीवर नेतात. मुसलमानाला पेटीतून नेतात. ख्रिश्‍चनाला बॉक्‍समधून नेतात. बऱ्याच राजकारण्यांना आज वाटतं, की स्मशानात जातानाही खुर्चीत बसून गेलं पाहिजे!

हिंदुत्वाबद्दल मत काय?
- सर्व धर्माच्या मुळाशी गेलं, की एकच धर्म सांगतो, मानवता धर्म. तो शेजारधर्मापासून सुरू होतो. स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे कट्टर अनुयायी होते. त्यांनी अमेरिकेत प्रचार केला. जो धर्म विधवांचे अश्रू पुसत नसेल, भुकेल्याची भूक मिटवत नसेल, तो धर्म मी मानत नाही, असं ते म्हणत असत.

उत्तरप्रदेश व बिहारी लोक महाराष्ट्रात दादागिरी करतात. जैन लोक महाराष्ट्रीयन लोकांना घरे नाकारतात,याबाबत मत काय?
- महाराष्ट्रात राहणाऱ्या, कुठल्याही जातीधर्माच्या प्रत्येकाला राज्याबद्दल आपुलकी पाहिजे. त्यात राष्ट्र सामावलं आहे. मतभेद देशाला घातक आहेत. उत्तरप्रदेश, बिहारी लोंढ्यांनी इथं दादागिरी करणे चुकीचे आहे. मोठ्या संख्येने एका भागात रहायचं, निवडणूक लढवायची आणि निवडून यायचं आणि कब्जा मिळवायचा, हे घातक आहे.

भ्रष्टाचाराविरूध्दचा तुमचा लढा म्हणजे दगडावर डोके आपटण्याचा प्रकार नाही का?
- शंभरटक्के भ्रष्टाचारमुक्ती होणार नाही. प्रभू रामचंद्र, ज्ञानेश्‍वर- तुकारामांच्या काळातही भ्रष्टाचार होता. पण प्रयत्न केला तर ७०-९० टक्‍के मुक्तीपर्यंत जाता येईल. आज २५-३० टक्‍क्‍यांपर्यंत गेलो आहोत. माहितीच्या अधिकारामुळे भ्रष्टाचाराला मोठा ब्रेक लागला आहे. मला खात्री आहे, पाच कायदे केले आहेत. आणखी काही कायदे झाले, तर ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भ्रष्टाचार मोडून काढता येईल.

गरीब राजकारणी आहेत का? बरेच श्रीमंत राजकारणी असून त्यांचा व्यवसायही कळत नाही?
- हे गणित सुटू शकतं. अधिकाऱ्यांनी मालमत्ता जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. नेत्यांनी निवडणुकीच्या वेळी कागदावर मालमत्ता जाहीर केली. पण लोकशिक्षण झालं नाही. त्यांची मालमत्ता कशी वाढते, याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जनतेचे सेवक आहेत, जनता देशाची मालक आहे, हेच कळलेलं नाही. त्यामुळे मालक सेवक बनले आणि सेवक मालक बनले!

मोठ्या शहरांमध्ये जमिनींचे मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत आहेत. नेत्यांना त्यात पैसे मिळतात. या शक्तीपुढे सामान्य माणूस काय करणार?
- सामान्य माणसाला संघटित केलं तर फार मोठं काम करू शकेल. मला एक दिवस सोडून जायचंय, माझ्याबरोबर काही येणार नाही, हे राजकीय नेते विसरले. सत्ता आणि पैशांच्या नशेत एवढे बेहोश झाले आहेत, की लोक काय म्हणतात, त्याकडे लक्ष नाही. त्यासाठी जनतेला संघटित करणं गरजेचं आहे.

जनता हतबल आहे...
- हे आतापर्यंत वाटत होतं. पण मला अनुभव आहे. आंदोलन सुरू केलं. मी आठ बाय दहाच्या खोलीत राहतो. माझ्याकडे धन, संपत्ती, पैसाअडका, सत्ता नाही. राज्यातील प्रत्येक तालुक्‍यात चांगले कार्यकर्ते उभे राहिले आहेत. सरकारचं नाक दाबलं की तोंड उघडेल. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार करीत असतील, तर जनमताचा दबाव वाढविला पाहिजे. हा एकच पर्याय शिल्लक आहे.

तुम्हाला सर्व सुखांचा त्याग करून आयुष्य जगावं लागलं...
- ही भारताची संस्कृती आहे. ती नेहमी त्याग शिकवत आलेली आहे. त्यात खरा आनंद आहे. धनदौलत नाही, पण मला आनंद अनुभवता येतो.

तुम्हाला आमिष दाखविण्याचा प्रयत्न झाला होता का?
- मी पहिल्यापासूनच चारित्र्याला जपले आहे, त्यामुळे लाच देण्याची कोणाला हिंमत झालेली नाही.

महाराष्ट्र कोणाच्या हाती सुरक्षित राहील?
- महाराष्ट्रातील जनतेने संघटित होणं गरजेचं आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार म्हणून वागत असतील, तर जनतेने त्याविरोधात उभं राहिलं पाहिजे. तरच महाराष्ट्र वाचेल.

असं कोण करू शकतं?
- आम्ही काही नसताना थोडं काही उभं करू शकलो. महाराष्ट्रात तरूण पुढे येत असून आशेचा किरण दिसत आहे. पुढाऱ्यांवर वचक निर्माण करू शकतो.

तुमचा उत्तराधिकारी कोण?
- पुढं आलेली खूप मुलं आहेत. राज्यातील गावांगावांतून दुसरी फळी उभी आहे. अण्णा हजारे यांच्यानंतरही हे काम सुरू राहील, यासाठी प्रशिक्षण सुरू आहे.

तुम्हाला परिस्थितीचं शल्य वाटतं का?
- कधीच नाही. तुम्ही जीवनात ध्येय ठेवत नाही, तेव्हा शल्य वाटतं. कुणीतरी करतं म्हणून आपण करायचं. अपयश आलं, की शल्य येतं. कर्मण्येवाधिकारस्ते... ही ईश्‍वराची पूजा आहे. त्यात यश येवो की अपयश.... विचाराने काम करतो. अनेक यशापयशाचे प्रसंग गेल्या ७० वर्षात आले. तरी थकवा नाही, नैराश्‍य नाही. जगायचं ते जनहितासाठी आणि मरायचं तेही जनहितासाठी, हे ध्येय मी ठरविलं आहे.

तुमचा बॅंकबॅंलन्स किती?
- तीन हजार रूपये पेन्शन मिळते. ती वाटून टाकतो. आतापर्यंतचा ३० ते ३२ हजार रूपये बॅंक बॅलन्स आहे. मला २५ लाख रूपयांचे पुरस्कार मिळाले, त्याचा ट्रस्ट केला. त्याचे वर्षाला दोन लाख रूपये व्याज येते. ते समाजाच्या कामासाठी खर्च करतो.

जगायला किती पैसे लागतात?
- काही पैसे लागत नाहीत. ते राजकारण्यांना कळत नाही. हे कळलं असतं, तर महाराष्ट्र देशाचा हेडमास्तर झाला असता! पैसा आणि सत्ता यात राजकारणी गुरफटून गेले आहेत. देश नेहमी त्याग शिकवत आला आहे. दाण्याने भरलेले कणीस पहायला एका दाण्याला त्याग करावा लागतो, जमिनीत गाडून घ्यावे लागते. त्यांना वाटते दाणा नष्ट होतो. मी माडीत आणि गाडीत फिरतो, मग गाडून कशाला घ्यायचं, असं त्यांना वाटतं. स्वतःसाठी जगणारी माणसं कायमची मरतात, इतरांसाठी मरणारी माणसं कायमची जगतात!!

प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अनुभव काय?
- राजकारणी आणि अधिकारी यांची युती झाली आहे. राष्ट्रपतींनी निवड केल्यावर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी राष्ट्र बलवान करण्याची शपथ घेतली आहे. पण ते विसरले. हे एकत्र आले, तर ६१ वर्षात जे झालं नाही, ते घडविता येईल. काही अधिकारी चांगले आहेत. समविचारी एकत्र आले, तर चांगलं काम होईल.

महाराष्ट्रात तातडीने कोणता बदल हवा वाटतो?
- प्रशासकीय अधिकाऱ्यांना दंडात्मक अधिकार आहेत. तलाठी किंवा ग्रामसेवकाचा गैरव्यवहाराबद्दल पुरावे दिल्यावरही तहसीलदार कारवाई करीत नाही. वरिष्ठ स्तरावर जायला सांगतो. आपली जबाबदारी पार न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचण्याचा अधिकार जनतेला देण्याचा कायदा करावा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत त्यांनी मागितली आहे. दुसरा रस्त्यांचा प्रश्‍न. एक वर्षात रस्ता वाहून जातो. कंत्राटदारांशी पाच-सात वर्षांचा करार करा आणि त्यांच्यावर खड्ड्यांच्या दुरूस्तीची जबाबदारी काम देतानाच टाका. सत्तेचं विकेंद्रीकरण होणंही गरजेचं आहे.

तुम्ही समांतर सरकार आहात का?
- त्याने काहीही उपयोग नाही. समांतर सरकारमध्ये धोके आहेत. राज्य आणि देशाबद्दल तळमळ असलेल्या कार्यकर्त्यांचं संघटन झालं पाहिजे. नाहीतर रिमोट कंट्रोलसारखं होईल. ते धोकादायक आहे! राष्ट्रापेक्षा पक्षाला आणि पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व आलं. पुढील काळात त्याने संस्थानिक तयार होतील. हा राष्ट्राला धोका आहे. व्यक्तीपेक्षा पक्ष आणि पक्षापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे.

महाराष्ट्र कोणाचा?
- महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्याला राज्याबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आहे, त्या प्रत्येक नागरिकाचा हा महाराष्ट्र.

सध्याचे राज्यकर्ते राज्य करायला लायक आहेत का?
- मी राज्यात फिरत असताना लोक बोलतात, असल्या सरकारांपेक्षा इंग्रजच बरे! हे दुर्देव आहे! पुढाऱ्यांबद्दल तिरस्कार निर्माण होणे, हा फार मोठा दोष आहे.

मतदारांचं शहाणपण आणि त्यांच्याबद्दलच्या आशा जिवंत आहेत का?
- होय. गुंडांना, व्यभिचा-यांना, भ्रष्टाचाऱ्यांना मत देऊ नका, असं आवाहन मी नेहमी निवडणुकीच्या वेळी करत असतो आणि त्यासाठी राज्यात फिरत असतो. ते त्यांना पटत आहे. जीवनात नैराश्‍य पत्करण्यापेक्षा मरण हातावर घेऊन परिस्थितीशी झगडत राहिलं पाहिजे. तरच पुढं जाऊ शकू.

(शब्दांकन -उमाकांत देशपांडे)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

उद्या पाहा - राजू परुळेकर यांनी केलेले विश्लेषण.

Wednesday, September 3

मराठी माणसाचं अस्तित्व हे महत्वाचं!



मराठी माणसे, भाषा आणि संस्कृतीचा मुद्दा हाती घेऊन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पेटविणारे राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माणाचा आराखडा मांडून मराठी तरूणांच्या हाती काही स्वप्ने ठेवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या, पत्रकार राजू परूळेकर यांनी साम वाहिनीसाठी घेतलेल्या मुलाखतीतील हा काही भाग -

मनसेच्या स्थापनेनंतर अनेक अटकळी बांधल्या जात होत्या. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठविण्याची नांदी तुम्ही परत एकदा केली. शिवसेनेनंतर परत असे करावे, ही वेळ तुमच्यावर का आली?- शिवसेनेत असताना मी हीच ही भूमिका मांडत होतो. रेल्वे नोकऱ्यात बिहारींविरोधात मी आंदोलन केलं होतं. महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे. जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा. पण तो घडलेला महाराष्ट्र कोणाच्या घशात घालायचाय? महाराष्ट्राच्या भूमीपुत्रांच्या, मराठी माणसाच्या वाट्याला ती प्रगती येत नसेल, तर ती काय करायची? त्यासाठी साफसफाई पहिली आणि प्रगती नंतर असं मी ठरविलं. कितीही करीत राहिलात, तरी परप्रांतीयांचे लोंढे या सगळ्या गोष्टी खाऊन टाकतात. तो विचार करून माझी वाटचाल सुरू आहे.

नेमके कोणत्या मुद्‌द्‌यांवर हे आंदोलन जाणार आहे?- सगळेच मुद्दे समोर येत आहेत. स्थानिकांना नोकऱ्यांत 80 टक्के प्राधान्य हे आहेच. पण प्रवेशापासून हे सर्व सुरू होतं. तिथं स्थानिकांना प्रवेश न देता परप्रांतियांना प्रवेश देत असाल, तर स्थानिक मुलांनी जायचं कुठं?

गरीब बिचारे पोटासाठी येतात. त्यांच्यावर तुमचा राग का?- मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, मायावती इथं येतात. तेव्हा तेच गरीब बिचारे त्यांच्या सभेसाठी जातात. राजकीय ध्रुवीकरण यामाध्यमातून होतं, त्याकडे बघणार आहोत की नाही.... ते ज्या पध्दतीने आपली पॉकेट्‌स तयार करतात... मुंबई महापालिकेत किती उपरे नगरसेवक आहेत? कोणत्याही राज्यात असं नाही. तेच उद्या पुणे, नाशिक, ठाणे इथंही होणार आहे.

भारतीय संविधानाने कोणालाही कुठेही जायला परवानगी दिली आहे. तुम्ही नेमकं काय करणार?- महाराष्ट्रातील जे कायदे आहेत, त्यांची अंमलबजावणी नीट झाली, तर हे प्रश्‍न येणार नाहीत. मराठी पाट्यांचा मुद्दा मी मांडला. तो कायदा आहे. कायद्याची अंमलबजावणी होत नाही... सिक्‍युरिटी एजन्सीबाबत कायदा आहे, की एका एजन्सीने पाचपेक्षा अधिक परप्रांतियांना नोकरीत ठेवलं, तर त्यांना कायदेशीर तरतुदींनुसार वेगळी परवानगी घ्यावी लागते. याचं पालन कुठेही होताना दिसत नाही. मी कायद्याच्या गोष्टी बोलत आहे. स्थानिक भूमीपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, असा महाराष्ट्राचा कायदा आहे. इथल्या भूमिपुत्राला माहिती तरी असते का, की कुठले कारखाने येत आहेत, कुठे नोकऱ्या येत आहेत?

मराठी बुध्दिवंत व उच्चवर्गातील मराठी माणसांचे मत आहे, की हा मुद्दा ग्लोबलायझेशनच्या युगात लागू होत नाही.- हे कसलं ग्लोबलायझेशन! चीन हा विचार का करीत नाही. चीन, फ्रान्स आपली भाषा पकडून बसला आहे. आपल्या देशात जन्मापासून, अनेक वर्षांपासून इतक्‍या भाषा आहेत. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक यांना तुमची भाषा सोडा, असं कोणी सांगत नाही. आम्ही ओरडलो की ग्लोबलायझेशन!

भाजप, कॉंग्रेस, शिवसेना या पक्षात बरेच उत्तर भारतीय आहेत. सर्व पक्षांनी हे कल्चर महाराष्ट्रात स्वीकारलं आहे. हा मुद्दा राजकीय भवितव्य निर्माण करणार आहे. तो पुढे नेणार की मागे?- मराठी माणसाचं अस्तित्व हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट नगरसेवक, आमदार, खासदार या गोष्टींवरून तपासून घ्यायची, असं नाही. गुजरातची निवडणूक गुजरात स्वाभिमानाच्या मुद्‌द्‌यावर झाली. नरेंद्र मोदी हिंदुत्व विसरून गेले व हा मुद्दा लावून धरला. बाकीची राज्ये स्वतःची भाषा व मुद्‌द्‌यांवर निवडणूक लढवतात. आपल्याकडचेच पिचक्‍या पाठकण्याचे आहेत. नको तिथं लाचार व्हायचं. आपल्याकडे साडेदहा- अकरा कोटींच्या महाराष्ट्रात साडेआठ-पावणेनऊ कोटी मराठी जनता राहते, ती तुम्हाला महत्वाची वाटत नाही? आणि तुम्हाला दीड-पावणेदोन कोटी परप्रांतीय महत्वाचे वाटतात?

मराठी जनतेचा तुमच्या भूमिकेला किती पाठिंबा आहे?- अनेक ठिकाणांहून मला रिऍक्‍शन आल्या. मॉलमध्ये जाताना, रिक्षा- टॅक्‍सीत बसताना मराठी बोलायला लागले. जे दबकत होते, ते आता उघडपणे बोलायला लागले आहेत.

व्यवहाराची भाषा मराठी ठेवता येत नाही. यावर उपाय काय?- आपण आपल्या भाषेत बोलावे. तो कामासाठी आला आहे. त्याला कामाची गरज आहे. तो भाषा शिकून घेणार. अन्य राज्यात तसं आहे. तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम राहिलात, की तो तुमची भाषा शिकून घेतो. अनेक मारवाडी उद्योगपती कोलकत्त्याला गेले, त्यांना बंगाली शिकावे लागले. बीएमडब्ल्यूसारखे कारखाने तमिळनाडूला गेले. परदेशी लोक तमिळ शिकत आहेत. तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहिलात, की बाकीच्यांना झक मारून ती गोष्ट करावी लागते.

या प्रकारची तुमची भूमिका ही राज्यातील राजकीय बदलाची नांदी ठरू शकते?- वर्तमानपत्रे समाजाचा आरसा असतात. त्यातली वाचकांची पत्रे काय सांगतात? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून मांडला गेलेला हा मुद्दा किंवा खास करून आपण शिवसेनेच्या जन्मापासून बघू... मुंबई, ठाण्यापुरता एकेकाळी असलेला प्रश्‍न राज्याचा बनला आहे. याबाबत राज्यभरातून, परदेशातून पत्रं येतात. हा मुद्दा असा कसा गेला. मी जे बोललो, ते प्रत्येकाच्या मनात होतं, म्हणून पसरलं. ही गोष्ट प्रत्येक जिल्ह्यात आहे. तुम्ही रायगड, सांगली, ठाणे, पुणे, नाशिक जिल्ह्यात जा. प्रत्येक जिल्ह्यात यूपी, बिहारवाले घुसले आहेत आणि त्यांची मस्ती आहे.

पण जैनधर्मीय मराठी माणसांना घरे नाकारत आहेत?
- हे अत्यंत चुकीचं आहे. याची चर्चा होते, पण लोक पुढे येत नाहीत. कायद्याने अशा सोसायट्या करूच शकत नाहीत. मायनॉरिटी कॉलेज नावाची गोष्टच नाही आहे.

मायनॉरिटी कॉलेजचा मुद्दा काय आहे?
- नगरनियोजन आराखड्यात जे भूखंड शिक्षणसंस्थांसाठी राखीव असतात, ते या संस्थांना स्वस्तात मिळाले. त्यावर हे प्रांत, जातीच्या आधारावर मायनॉरिटी कॉलेज काढणार. तुमचे चोचले पुरवायचे असतील तर खासगी जागा घेऊन काय ते करा. तुम्ही सरकारचे प्लॉट घेणार आणि इतरांना ऍडमिशन देणार नाही? हे सर्व खोदून काढलं पाहिजे. प्रत्येक वेळी काचा फोडल्या आणि ते घाबरले, असं होणार नाही. सर्व अंगांनी माझं काम सुरू आहे. कायदे व न्यायालयाच्या माध्यमातूनही माझं काम सुरू आहे. रस्त्यावर जशी लढाई सुरू आहे, तशी ती अन्य माध्यमातूनही लढावी लागेल. तरच हे प्रश्‍नच सुटणार आहेत.

राज्यात हे आंदोलन उभं राहणं हे राजकीय पक्षासाठी पुरसं आहे का?
- मराठी माणसाच्या आतला राग कधीतरी बाहेर काढायलाच पाहिजे की नाही. आतापर्यंत हीच गोष्ट होत राहिली. मतांचे व नोटांचे राजकारण यावर हे मुद्दे बाजूला पडले आणि मराठी माणूस बाहेर फेकला गेला. मी जी गोष्ट करतोय, ती त्याला पटली तर त्याचंच भलं आहे. शेवटी महाराष्ट्र हे राज्य कोणासाठी ओळखले जाणार आहे? मराठी माणसासाठी की अन्य कोणासाठी?

तुमचे एकट्याचे प्रभावशाली असणे, हे राजकीय पक्षाचे प्रभावशाली असणे मानता का?संघटनात्मक पातळीवर नेत्यांची फळी, कार्यक्रम दिसत नाही?
- शंभर वर्षांची कॉंग्रेस, साठ वर्षांचा जनसंघ व भाजप, चाळीस वर्षांची शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष... हे अनेक वर्षांचे पक्ष आहेत आणि माझी अडीच वर्षे. अशी तुलना करून बघा, मग कळेल.

निवडणुकीला किंवा जनतेला सामोरे जाणार, तेव्हा तुम्हाला हे मुद्दे घेता येणार नाहीत?
- अगदी बरोबर आहे. माझ्याबरोबर आज जे सहकारी आहेत, ते वेगवेगळ्या पदांवर गेले. ते उद्या नगरसेवक, आमदार, खासदार बनतील, तेव्हा त्यांची इमेज बनेल. बाकीच्या राजकीय पक्षातील लोक तरी होते कोण? त्यांचं अस्तित्व काय होतं? त्यांनाही पदे मिळाल्यावर काही गोष्टी करून दाखविल्या व समाजात स्थान मिळालं. माझ्या माणसांच्या आज कोऱ्या पाट्या आहेत. ते उद्या निवडून येतील व त्यांची इमेज तयार करतील.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अन्य कॉंग्रेस नेते यांनी निवडणुकीची काही समीकरणं तयार केली आहेत. ही वजाबाकी करून तुम्हाला राजकीय यश मिळू शकेल?
- अनेक पराभव बघितल्यावर शिवसेनेच्या ताब्यात मुंबई महापालिका १९८५ साली आली. त्यावेळी पोस्टर होतं, मराठी माणसा जागा हो. तुझी मुंबई तुझ्यापासून हिरावली जात आहे. त्यावेळी जो मुद्दा होता, तो महाराष्ट्रात इतका पसरला नव्हता. मुंबईत काय चाललं आहे, हे महाराष्ट्रातील लोकांना कळतच नव्हतं. आता परप्रांतियांचे लोंढे मुंबईपुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहेत. अनेक आंदोलनाच्या वेळी अनेक ठिकाणी मनसेचे कार्यकर्तेही नव्हते. लोकांनी उस्फूर्तपणे आंदोलन केलं. हे कशाचं द्योतक आहे? हे कशामुळे आणि का झालं? आणि राजकीय यशाची मला कुठे घाई आहे! लोक विचारतात २००९चं काय? लोकांची मर्जी आणि मतांवर अवलंबून आहे. जनतेने ठरविलं, तर सत्ता देतील. नाहीतर नाही देणार! कोण कसं वागत जातं, त्यानुसार रंग बदलत जायचे... मला ते झेपणार नाही व जमणारही नाही.

यूपी, बिहारची माणसं सनदी अधिकारी, राजकारण व अन्य क्षेत्रातही आहेत. त्यांची शक्ती, पैसा याला किती पुरे पडणार?- त्यांच्या शक्तीपेक्षा महाराष्ट्रातील १० कोटी मराठी जनता ही शक्ती खूप मोठी आहे. ती एकवटली तर ते काहीही करू शकणार नाहीत. महाराष्ट्रातील मराठी प्रशासन, पोलिस, शासकीय मराठी अधिकारी व विविध क्षेत्रातील लोकांना आता वाटायला लागले आहे... मला तशा प्रतिक्रिया येत आहेत. मला काही हाणामाऱ्यांची हौस नाही.

अनेकांना वाटते की, राज ठाकरे यांचा मुद्दा बरोबर आहे, पण मार्ग चुकीचा आहे?
- मग मार्ग तुम्हीच सांगा. आम्ही निवेदनाचा पहिला मार्ग निवडला. त्यातील चांगली भाषा कोणाला समजत नाही. दुसरा मार्ग सांगा ना? मर्सिडीज बेंझच्या शाळेचं काय झालं? त्यांना आम्ही निवेदन दिलं, की १५ ऑगस्टच्या दिवशी सर्व शाळांमध्ये झेंडावंदन होते, तसे तुम्ही करावे. पण आम्ही करीत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. इथं यायचं, जमीन मिळवायची, शाळा उभारायच्या आणि याच देशाचा झेंडा फडकावणार नाही, असं सांगायचं! पोलिस आमच्या कार्यकर्त्यांना मारणार आणि त्यांना काही करणार नाही!

हे आंदोलन दबलं जाईल, असं तुम्हाला वाटतं का?
- अशाप्रकारे आंदोलने दबली जात नाहीत आणि जाणारही नाहीत. मराठीचं आंदोलन तर नक्कीच नाही. प्रशासनाने अगोदर झालेली आंदोलने तपासावीत. ज्यावेळी आंदोलन दाबण्याचे प्रयत्न झाले, त्यावेळी ते दुप्पट वेगाने उसळून आले. त्यांनी ते दाबण्याच्या भानगडीतही पडू नये. हे काय मी माझ्यासाठी करतोय? यात काय माझा स्वार्थ आहे? प्रत्येकाला वाटते काहीतरी राजकारण आहे, मते मिळविण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक गोष्ट तिथेच येऊन थांबते का? दुसरे काही अँगलच नसतात का?

दुसऱ्या काही पक्षांशी चर्चा झाली का? इतरांसाठी तुमच्याबाजूने चर्चेचे दरवाजे का नाही उघडले?
- सध्या राजकारणात मी तसा अस्पृश्‍य आहे. मग मी काय दरवाजा उघडून उभा राहू का?

प्रश्‍नांबाबत विरोधक आंदोलन करून, आवाज उठवून सत्ता हस्तगत करतात. पण विरोधी पक्षाने मांडलेला मुद्दा जनतेने उचलला तरी अन्य विरोधी पक्षांनी उचलला नाही किंवा तेवढ्या तीव्रतेने पुढे नेला नाही, हे का?
- त्यांना असुरक्षितता वाटत असेल. इतर समाजाची मतं काबीज करण्याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. हा मराठी माणसाचा अपमान आहे. मराठी माणसाच्या जीवावर महाराष्ट्रात सत्ता येऊ शकत नाही? जे आजपर्यंत घडलं नाही, ते आता होईल! मराठी माणसं समुद्रकिनारी राहतात, त्यामुळे त्यांचे मेंदू सडके आहेत, असे एक बिहारचा खासदार लोकसभेत बोलला आणि आपले ४८ खासदार गप्प राहतात! एकानेही विरोध केला नाही. सी. डी. देशमुखांची उदाहरणं भाषण करताना द्यायची की त्यांनी नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकला. मग लोकसभेत अपमान होत असताना एकही खासदार बोलत नाही? इतरांची मते जातील म्हणून? मराठी माणसांच्या मतांवर विश्‍वासच नाही. मराठी माणूस एकवटून मते देऊ शकतो आणि राज्य हातात देवू शकतो, यावर विश्‍वासच नाही. मला तो विश्‍वास उभा करायचा आहे.

त्यासाठी एका मजबूत संघटनेची व कार्यकर्त्यांच्या जाळ्याची आवश्‍यकता असते. त्यात तुम्हाला यश मिळालं आहे का?- शंभर टक्के. तुम्ही कोणत्या अँगलने बघता हा वेगळा भाग. राज्यातील कुठल्याही तालुक्‍यात जा, तुम्हाला मनसेचा कार्यकर्ता सापडणारच. अडीच वर्षांएवढ्या कमी काळात राज्यात सर्वदूर पसरलेला दुसरा स्वतंत्र पक्ष सांगा.

दुसऱ्या पक्षाने पुन्हा आपलाच जुना मराठीचा मुद्दा हाताशी धरला. त्यामुळे तुमचा मुद्दा पुढे नेण्यात अडचण येईल का? असुरक्षितता वाटते का?
- मी जो मुद्दा जेवढ्या प्रखरपणे रेटू शकतो, तेवढा ते मांडूच शकत नाहीत. नाहीतर त्यांची अन्य मतं जातील. मला त्याची पर्वा नाही. त्यांनाच आहे. आमचाच जुना मुद्दा आहे, असं ते म्हणतात. १९८५ पासून पाच वर्षांचा अपवाद वगळता महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचीच सत्ता आहे ना? मग १९८५ ते २००८ एवढ्या काळात मराठी पाट्यांचा मुद्दा निकालात का निघाला नाही? पाट्या मराठीत अजून का झाल्या नाहीत? मी निवेदन दिल्यावर जयराज फाटक यांनी नोटीस दिली. कुठल्याही इतर राज्यात हे दुकानदार जातात, तिथल्या राज्याचे नियम व अटी पाळतात ना? शिथीलता तुम्हाला मुंबई, पुण्यात व महाराष्ट्रातच हवी का?

शिवसेनाप्रमुखांनी मराठीचा मुद्दा मांडला व सत्तापदे मिळाल्यावर यू टर्न मारला. तुमच्याबाबतीत तसे होणार का?
- काळच त्याचं उत्तर देईल! विश्‍वास ठेवा. माझं तसं होणार नाही! १९८५ व २००८ या काळात केवढा फरक आहे. आता मराठी माणसाची पीछेहाट झालेली दिसत आहे. एका शाळेत शिक्षिका होत्या. एका मुलाला नीट उत्तर देता आले नाही. तेव्हा "यू ब्लडी महाराष्ट्रीयन' असं त्या बाई बोलल्या. त्यावर सर्व मुलं उभी राहिली आणि त्यांनी शिक्षिकेला घालवून दिलं. त्यांच्यावर प्राचार्यांनी कारवाई केली. ही पुण्यातील शाळा आहे. 20 वर्षांपूर्वी अशी मुलं उभी राहिली असती का? त्या मुलांना उभं करायला राज ठाकरे नव्हता गेला! आम्ही मराठी आहोत, ही भावना जागृत होणं, ही माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे.

उत्तरेतील नेत्यांना महाराष्ट्राबद्दल आकस आहे. त्यांच्याशी कोणत्या साधनसामग्रीशी तुम्ही लढणार?
- ठाम विश्‍वास! हे प्रश्‍न नरेंद्र मोदी, चंद्राबाबू नायडू, जयललिता किंवा इतरांना पडत नाहीत. आम्हीच कशाला उत्तरेचा विचार करायचा? दिल्लीचा आकस आहे, हे आपल्याला माहीत आहे. त्यापध्दतीने पुढे जायचे. महाराष्ट्र व गुजरात हे दोनच प्रदेश दक्षिण व उत्तर भारत या विभाजनामध्ये लटकले आहेत. गुजराती समाजाकडे पैसा आहे. त्यामुळे त्यांच्या हनुवटीला हात लागतात. महाराष्ट्राकडे विद्वत्ता आहे. त्यामुळे डोक्‍याला हात लावण्यापलीकडे काही नाही. विद्वत्तेमुळे महाराष्ट्राची भीती दिल्लीश्‍वरांना पहिल्यापासून वाटत आली आहे. ही ताटाखालची मांजरे होणार नाहीत, असे तेव्हा वाटत होते. आता होतात आणि त्यासाठी वेळही लागत नाही! भौगोलिक रचनेचा विषय असल्याने महाराष्ट्राची लॉबी नाही. राज्यातील ४८ खासदार दिल्लीत गेले, की त्यांची तोंडे दहा दिशेला. पण महाराष्ट्रातील जनता सक्षम आहे आणि माझा विश्‍वास ठाम आहे. त्यावर पुढे जाईन.

शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यामधील कोणत्या प्रकारचे कार्यकर्ते तुम्हाला अपेक्षित आहेत? सामनात छापून येते तुमच्या पक्षातून कार्यकर्ते शिवसेनेत परत गेले.
- हे स्वतःच्या पक्षाच्या मुखपत्रात छापतात की हे आले, हे गेले. माझी ३ मे ला दुसरी सभा झाली. शिवाजी पार्क भरले. पुण्याला सभा झाली. कोण आले व कोण गेले, स्वतःच ठरवायचे? या खिशातून काढायचे आणि या खिशात घालायचे! महाराष्ट्रातील कुठल्याही भागात माझ्याबरोबर चला. माझे कार्यकर्ते दिसतील.

शिवसेनेकडे मराठी कार्यकर्त्यांचं बळ असून ते मराठीच्या मुद्‌द्‌यावर लढत नाहीत. याबद्दल खंत वाटते?
- शंभर टक्के. त्यावर काय करणार? तेही आहेत. ते माझेच आहेत की, सर्वार्थाने.

नारायण राणे व राज ठाकरे यांची काही समीकरणे आहेत का? जुन्या सहकाऱ्याबद्दल तुमची भावना काय?
- मी २००५ मध्ये बाळासाहेबांचं पुस्तक करीत होतो. मला सात-आठ महिने वेळच नव्हता. त्यावेळी ११ मे रोजी मला राणे भेटले. १२ किंवा १३ मे ला मी परदेशी गेलो आणि २ किंवा ३ जूनला आलो. तोपर्यंत राणे परदेशात गेले आणि जुलैमध्ये आले. त्यानंतर हे सुरू झालं. त्यामुळे माझं आणि त्यांचं ठरलं होतं, असं नाही. मी कोणाच्याही हाताखाली काम करू शकत नाही. त्यामुळे कोणाच्याही पक्षात जाण्याचा प्रश्‍नच नाही. माझ्या डोक्‍यातही नव्हतं, की मी पक्ष काढेन. ज्या पध्दतीने चाललं होतं, अपमान होत होता, त्याचा प्रचंड राग होता. पक्ष सोडावा, हे राणे बाहेर पडले, तेव्हाही डोक्‍यात नव्हतं. मी बाहेरच पडावं यासाठी काहींचे ढकलण्याचे प्रयत्न होते. जगाला नावं माहीत आहेत. मी दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नव्हतो. स्वतंत्र पक्ष काढण्याची त्यांची मानसिकता नाही. आता तरी कसे येणार एकत्र. आता ते काय करतात मला माहीत नाही. काय निर्णय घेतात ते बघू.

निवडणुका लढविणं हा राजकीय पक्षाचा धर्म आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात मैत्री किंवा विरोध याचं धोरण ठरलं आहे का?
- मी राजकीयदृष्ट्या अस्पृश्‍य आहे. मी मराठी माणसाची बाजू घेतो, ते कुठल्याही पक्षाला परवडणार नाही. युत्यांचा विचार करून पक्ष मोठा करता येत नाही. मी स्वबळावर निवडणुका लढविण्याचा विचार करीत आहे. बरोबर कोण येणार याची काहीच कल्पना नाही.

राष्ट्रीय धोरण असलेल्या कॉंग्रेस, भाजपसारख्या पक्षांशी राजकीय लग्न होऊ शकतं का?
- माझ्या डोक्‍यात युतीचा विचार नाही. असले विवाह घटस्फोटाकडे जातात. असली लग्नं रोज करता येतील.

तुम्ही शेती, सेझ, असंघटित कामगार, औद्योगिक क्षेत्र आदी विकासाचे मुद्दे घेत नाही?
- यावर मी स्टेटमेंट देऊन झाली. पण दगडफेक न झाल्यामुळं कोणी फारशी दखल घेत नाही. पत्रकार परिषदांमध्ये बोललो. पण त्यात कॉंन्ट्रोव्हर्सी नाही ना? कर्जमाफीने हे प्रश्‍न सुटणार नाहीत. निवडणुकीत घरं, वीज फुकट देऊ, अशी आश्‍वासनं देतात. परमेश्‍वर पाणी फुकट देतो, त्याचं नियोजन करता येत नाही. वर्षानुवर्षे त्याच-त्याच मुद्‌द्‌यांवर निवडणुका लढवतो. अनेक आमदार बदलले, पण गावात त्याच मुद्‌द्‌यांवर निवडणुका लढविल्या जातात. पंतप्रधान मनमोहनसिंह नुकतेच बोलले, बारामतीसारखा देशाचा विकास व्हायला हवा. म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांच्या बारामती मतदारसंघाचा विकास जेवढा होतो, तेवढा महाराष्ट्राचा होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ असून, मला छोट्या मतदारसंघात रस नाही.

तुम्ही निवडणूक लढवणार का?
- निवडणूक लढवण्याचा विचारही माझ्या मनाला शिवत नाही. त्याला कारण म्हणजे लहानपणापासून झालेले संस्कार.

शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. माझ्या मनातलं मुख्यमंत्र्यांनी अंमलात आणलं नाही, असं कारण द्यायला ते मोकळे. तुम्ही असे करणार नाहीत?
- अनुभवातून आपण काही शिकतो की नाही? त्यातूनच शिकत जातो. इतिहास कशासाठी वाचायचा? इतिहासाकडे का बघायचं? चुका पुन्हा पुन्हा करायच्या नाहीत. एकदा मातोश्रीवरून बाळासाहेब व मी शिवसेनाभवनला येणार होतो. आमचे ड्रायव्हर माने आले नव्हते. त्यामुळे टॅक्‍सी मागविली. महापौरांकडे लाल दिव्याची इंपाला गाडी होती. बाळासाहेब महापौरांच्या गाडीत बसणार नव्हते. मग बाळासाहेब व मी टॅक्‍सीत पुढं आणि लाल दिव्याची इंपाला मागे, असं चित्र होतं. माझ्यासाठी लाल दिव्याची गाडी ही छोटी गोष्ट आहे. महाराष्ट्राची सुधारणा होणं हे मोठं.

तुम्हाला अटक झाली, उद्रेक झाला. सतत लढाई, आंदोलन, यामुळे राजकीय नेता व माणूस म्हणून असुरक्षिततेची भावना वाटते का?
- मी लहानपणापासून अशी परिस्थिती पहात आलेलो आहे. भिवंडीत १२ वर्षांनी शिवजयंती साजरी झाली, तेव्हा बाळासाहेबांबरोबर मीच होतो. पनवेलला बैठकीला जात असताना गाडीवर दगडफेक झाली होती. अनेक प्रसंग आणि घटना पाहात आल्याने मला कधीच भीती किंवा दडपण वाटलं नाही.

मुसलमानांबद्दल भूमिका काय?
- महाराष्ट्रातील मराठी मुसलमान सुसंस्कृत आहेत. यूपी, बिहार, बांगलादेश येथील मुसलमानांनी जी पॉकेट्‌स बनविली आहेत, त्यातून धांदल सुरू आहे. जे राष्ट्रवादी मुस्लिम आहेत, त्यांना या गोष्टी आवडत नाहीत. त्याबाबत स्पष्ट बोलणारे काही मुसलमान आहेत. अनेक मुसलमान माझ्याबरोबर आहेत. देवनारला दंगल झाली, ते आझमगडचे आहेत. हा संस्कृतीतील फरक आहे.

तुमच्या आंदोलनाच्यावेळी अबू आझमी म्हटले होते की, आझमगढहून 20 हजार माणसे आणू.
- काय बापाचा माल आहे का?

त्या पट्ट्यातील अनेक शार्प शूटर, गुन्हेगारी रेकॉर्ड असलेले येथे येतात. ते माणसांना मारू शकतात. त्यांच्याशी घर, कुटुंब असलेला मराठी कार्यकर्ता कसा लढणार?
- ज्यांच्याशी लढायचे, तशी माणसे आमच्याकडे आहेत. कोणी महाराष्ट्र लेचापेचा समजू नये. तुम्ही जी कॅटॅगरी मागाल, ती आमच्याकडेही आहे. त्यामध्ये महाराष्ट्र कमी नाही. मग तुम्ही आयटी काढा, नाहीतर काहीही काढा.

समांतर सरकार चालवू नये, असा इशारा सरकार व विविध पक्षांनी तुम्हाला दिला होता?
- मला असं का करावं लागत आहे, याचा सरकारने विचार केला पाहिजे. मी कायद्यानेच बोलत आहे. त्याची अंमलबजावणी सरकार किंवा इतर पक्ष करीत नसेल, तर प्रतिसरकार चालवू नका, असं म्हणायचं? मग तुम्ही करा. इतर राज्यात त्यांची भाषा पहिलीपासून सक्तीची आहे. मग महाराष्ट्रात मराठी का नाही? सगळ्या सवलती महाराष्ट्र सरकारकडून घेऊन मराठी माणसाला ठेंगा दाखवायचा?

कृपाशंकरसिंह यांची निवड मुंबई प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी करण्यात आली. हे तुम्हाला कॉंग्रेसचं उत्तर आहे का?
- कॉंग्रेसने हा मराठी माणसाचा केलेला ढळढळीत अपमान आहे. कृपाशंकरसिंह येवो किंवा अन्य कोणी, मुंबईला काही फरक पडत नाही. मराठी कार्यकर्त्यांच्या डोक्‍यावर उत्तर भारतीय आणून बसवला, याचा विचार त्या पक्षातील मराठी कार्यकर्त्यांनी केला पाहिजे.

इतर पक्षातील मराठी कार्यकर्ते आणि नेते यांना तुमच्या भूमिकेबद्दल आस्था, प्रेम आहे का?
- गुप्तपणे कितीतरी जण फोन करतात. त्यामध्ये कॉंगेस, राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आहेत. तुम्ही करता ते योग्य आहे, आम्ही उघडपणे काही करू शकत नाही. लागेल ती मदत सांगा, असं ते म्हणतात.

तुम्ही वेबसाईट व दूरध्वनीक्रमांक जाहीर केले. त्याला लोकांनी प्रतिसाद दिला?
- आयकर भर्तीबाबत मुलुंडला जे आंदोलन झालं, त्याचा दूरध्वनीच आला होता. अशा अनेक गोष्टी लोकांनी पाठविल्या आहेत आणि त्यावर काम सुरू आहे.

समृध्द महाराष्ट्राबद्दलचे तुमचं स्वप्न काय?
- हे वेगळ्या प्रकारचे आक्रमण थोपवायचं, हा माझा प्रयत्न आहे. आक्रमण वेगवेगळया ठिकाणी पसरलेलं असल्याने एखादा मुद्दा लावून धरला, तर सतत तेच बोलतो, असं म्हणायचं. अनेक प्रश्‍न आहेत! एखादा मुद्दा सोडविण्याचा प्रयत्न करत असताना मुद्दा सोडला, तर म्हणायचं सातत्य नाही! यू टर्न मारला! त्यामुळे मला वाटेल ते मी करतो. मराठी माणसाला समाधान मिळते आहे ना, तो स्वाभिमानाने जगतो आहे ना? याचा मी विचार करतो.

समृध्द महाराष्ट्रातील टूरिझम, शेती, उद्योग आदींबाबत तुमचं काय स्वप्न आहे?
- आम्ही जी अकादमी उभी केली आहे, त्यात त्या क्षेत्रांचं काम सुरू आहे. पाणी हे उद्योग व सिंचनासाठी लागणारं आहे. त्यावर काम सुरू आहे. निवडणुकीच्या वेळी आम्ही हे काम जनतेसमोर ठेवू, की आम्ही काय केलं आणि काय करणार आहोत.

कोणत्याही नेत्याचा उदय झाला की जनतेला वाटतं, की हाच नेता आपल्यासाठी लढेल. पण प्रकाश वेगळ्या वाटेने गेला व जनता अंधारात राहिली. आज तुमच्याबाबत जनतेला वाटत आहे, की तुम्ही काहीतरी कराल. तुमच्यावर विश्‍वास का ठेवावा?
- हे लोकांनी शोधावं. मी माझं काम प्रामाणिकपणे करतो. माझ्या मनाला वाटेल, ते मी बोलतो. ६० वर्षे या लोकांवर विश्‍वास ठेवला, माझ्यावर एकदा ठेवून बघा.

लोकसभेत कणा असलेली किती माणसे पाठवू शकता?
- पाठीचे कणे तपासून पाठवीन. पिचलेल्या पाठकण्याची माणसं पाठवणार नाही. महाराष्ट्राचा आवाज संसदेत उमटविणारा तरूण पाठवीन. त्या योग्यतेचा तो असेल, तरच ती जागा मी लढवीन. झाला तेवढा तमाशा खूप झाला. आता जे काही करायचं, ते योग्य करावं.

तुम्हाला स्वप्न म्हणून विधानसभेत पूर्ण किंवा अंशतः सत्ता हस्तगत करायची आहे, की काय करायचं आहे?
- जेव्हा केव्हा जनता ठरवेल, आता राज ठाकरे, तेव्हा पूर्ण सत्ता द्यावी. तरच महाराष्ट्रात मला जे करायचे आहे, ते मी करू शकेन. ह्याच्या दाढीला हात लाव, त्याला गॅलरीतून डोळा मार, हे मला जमणार नाही.

तुम्हाला प्रशासकीय अनुभव काय?
- ज्यांना अनुभव होता त्यांनी काय केलं? ६० वर्षे म्हणजे तीन पिढ्या गेल्या. एकदा विश्‍वास ठेवा. त्या गोष्टींचं प्रशिक्षण सहकाऱ्यांना देण्याची जबाबदारी माझी. मला सत्तेचा सोस नाही. पण हे प्रशिक्षण अजून सुरू नाही. ते केलं तर तिकीटवाटप सुरू झालं, असं वाटेल. त्यामुळे आता शांत राहिलेलं बरे.

हिंदुत्वाच्या भूमिकेबाबत तुमचं म्हणणं काय?
- हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व असेल, तर ते मला मान्य आहे. हिंदुत्व म्हणजे मुसलमानांना विरोध आहे का? देशावर ज्या पद्धतीचे आतंकवादाचे संकट आहे, त्याला माझा विरोधच आहे ना? त्याला काय प्रोत्साहन देणार? मुस्लिम आतंकवाद जगात किंवा देशात सुरू आहे. तो ठेचलाच पाहिजे. तो कोणत्या धर्माचा आहे, याचा त्यात काही संबंधच नाही. आपल्या समुद्रकिनाऱ्यावर आरडीएक्‍स उतरवलं गेलं आणि ज्यांना माहित होतं, ते उतरवून घेणारे बरेचसे हिंदूही होते. हा हिंदू-मुस्लिम विषय नसून राष्ट्रवाद, कायदा व सुव्यवस्थेचा, करदात्यांचा आणि त्यांच्या सुरक्षेचा विषय आहे.

निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र पादाक्रांत करू, असे तुम्ही म्हणाला होता. किती काळ लागेल?
- मी माझं काम करीत आहे. माझे विषय मांडत मी पुढे जाणार. माझ्या संकल्पेनेतील महाराष्ट्र मी मांडत राहीन. जनता मला ज्या पध्दतीने पाठिंबा देईल, त्यापध्दतीने मी पुढे सरकत जाईल. मला यश मिळेल, याची शंभर टक्के खात्री आहे.

-------------------------------------------

उद्याची मुलाखत - सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मा. अण्णा हजारे.

Tuesday, September 2

सध्याच्या राज्यकर्त्यांमुळे महाराष्ट्र मागे!



महाराष्ट्रातील प्रश्‍नांना कोण जबाबदार आहे, ते कसे सोडविता येतील, अभ्यासूपणे व धोरणात्मक विचार करून राज्याला विकासाच्या वाटेवर नेता येण्याची क्षमता युतीकडे आहे का, भाजपशी असलेल्या कुरबुरी, राज ठाकरे व नारायण राणे यांच्या पक्षातून जाण्यामुळे शिवसेनेला बसलेला फटका, आदी बाबींवर प्रकाशझोत टाकत आहेत, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे.... साम टीव्हीवर महाराष्ट्र कोणाचा या कार्यक्रमात पत्रकार राजू परूळेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी केलेली बातचीत...

राज्यापुढील अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलेल्या समस्या सोडविणे सोपे नाही. असे वाटते की समस्या ही एक संधी आहे?
- राज्यात मराठी ही भाषा थोड्याथोड्या अंतरावर वेगवेगळी बोलली जाते. मेळघाटमधील आदिवासींना मराठी किंवा हिंदी भाषा येत नाही. त्यांची भाषा आहे, कोरकू. विविध भाषा, परंपरा, इतिहासाने सजलेला-नटलेला हा महाराष्ट्र. देशात प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राएवढा संपन्न वारसा दुसऱ्या कोणत्या राज्याला मिळाला असेल, असे मला वाटत नाही. समाजसुधारणा, इतिहास, राजकारण, प्रबोधन कोणत्याही क्षेत्रात संपन्न अशी माणसे राज्याने दिली आहेत. महाराष्ट्र ही हिऱ्या माणकांची खाण आहे. अशी परंपरा असलेले राज्य दिवसागणिक मागे पडताना पाहून अंतःकरण तिळतिळ तुटते. या समस्या सुटू शकतच नाहीत का? या समस्या निर्माण कशा झाल्या.? स्वातंत्र्याला ६० वर्षे व संयुक्त महाराष्ट्राला ४८ वर्षे झाली. एकामागून एक संकटे राज्यावर येत आहेत. विरोधक म्हणून मला आगपाखड करावयाची नाही. यासाठी प्राधान्याने गुन्हेगार कोण असतील, तर ते राज्यकर्ते आहेत.

युतीसह सर्व राज्यकर्ते जबाबदार आहेत?
- युतीच्या काळात जेवढी कामे झाली, त्याच्याआधी व नंतरही एवढी कामे झाली नाहीत. एखादी गोष्ट सोडविणे खूप कठीण असते. पण तुम्ही ती सोडविण्याचा प्रयत्न न करता नुसती स्वप्ने दाखवत असाल, तर ते योग्य नाही. गेली ८-९ वर्षे आघाडीचे सरकार आहे व वीजेचे संकट खूप मोठे आहे. मी सिन्नरला गेलो होतो, तेव्हा एका शेतकऱ्याने सांगितले की, चार दिवस झाले आमच्याकडे वीजच आलेली नाही.

एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडविण्याची चूक युतीने केली. हे कारण वीजसंकटामागे आहे का?
- एन्‍रॉन हा एकमेव प्रकल्प राज्यासाठी आहे का? दुसरे कोणतेच प्रकल्प दिसत नाहीत? एन्रॉनमुळे किती वीज राज्याला मिळणार आहे? आम्ही काय केले? तो आम्ही बंद पाडला नाही. आधीच्या सरकारने जो करार केला होता, त्यातील राज्याला वाईट, अहितकारक गोष्टी आम्ही बदलून घेतल्या. एन्रॉनकडे बोट दाखवून सरकारला पापातून सुटका करून घेता येणार नाही. गेल्या ९ वर्षात इतर किती प्रकल्प सरकारने आणले व वीजनिर्मिती केली? किती उद्योगधंदे राज्यात आले? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी किती मंत्री गेले?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलेल्या नेत्यांची पिढी वृध्दत्वामुळे किंवा निधनामुळे सध्या पक्षात नाही. तर काही नेत्यांनी शिवसेना सोडली किंवा त्यांना काढले. त्यामुळे सत्ता मिळाल्यावर शिवसेनेकडे चांगला प्रशासकीय अनुभव असलेले किती नेते आहेत?
- शिवसेनेला आपण प्रबळ पक्ष समजत असल्याबद्दल धन्यवाद. गेल्या २-३ वर्षात काहींना बाळासाहेबांनी काढले, तर काही सोडून गेले. त्यानंतर शिवसेनेत राम राहिला नाही, शिवसेना संपली, भवितव्य राहिलेले नाही, उध्दव ठाकरे कारकुनी करणारा आहे, त्याच्याकडे नेतृत्वगुण नाहीत, हे सगळे आरोप मी सहन केले. बाळासाहेबांचे आशीर्वाद भक्कमपणे माझ्यामागे नसते व कार्यकर्त्यांचे बळ माझ्या पाठीशी नसते, तर तुम्ही मला मुलाखतीसाठी बोलावले नसते.

ज्याअर्थी तुमच्यावर जोरदार टीका होते. त्याअर्थी तुम्ही प्रबळ आहात...
- शिवसैनिकांना अजून कोणी ओळखलेले नाही. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना दुःख दिले, त्यांना शिवसैनिक कधीही आपले समजत नाहीत. माफ करीत नाहीत व माफ करणार नाहीत. हे शिवसैनिकांबद्दल ज्यांचा गैरसमज आहे, त्यांनी लक्षात ठेवावे. शिवसैनिक आलेल्या आव्हानाला कधीच घाबरत नाहीत. आम्ही गावोगावी जात आहोत, जे विषय समजत नव्हते, ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. अनुभवाने शहाणपण येते. महाराष्ट्रात परिस्थिती काय आहे? इथे बसून सर्व समजत नाही. लोकांशी बोलल्यावर अनेक गोष्टी उलगडत जातात.

प्रशासकीय ताकद असलेली माणसे पक्षाकडे नाहीत...
- राहुल गांधींना जर पंतप्रधान म्हणून बघितले जाते, तर शिवसेनेकडे संशयाच्या नजरेतून पाहण्याची गरज नाही.

मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. रस्त्यावरील खड्डे, अनधिकृत झोपड्या हे प्रश्‍न आहेत. पोलिसांना घरे नाहीत आणि झोपडपट्टीवासियांना मोफत घरे मिळतात? तुमची सत्ता असताना काय करता?
- महापालिकेकडे मुंबईचे पालक म्हणून पाहिले पाहिजे. मुंबईचे पालकत्व एकाकडे नाही. पालिकेवर एमएमआरडीए, रेल्वे व एअरपोर्ट ऍथॉरिटीची जागा वेगळी, अशी परिस्थिती आहे. आम्ही कलानगरला राहतो. पावसाळ्यात आम्हाला रात्रीची झोप येत नाही. कारण हा विभाग बशीसारखा झाला आहे. एका बाजूला एमएमआरडीएचा रस्ता आहे. बीकेसी आहे, नाल्याचे रूंदीकरण झालेले आहे. म्हणजे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. झोपड्या काढत असताना पोलिसांची मदत पालिकेला मिळत नाही. महापालिकेकडे स्वतःचे दल नाही. गृह विभाग व राज्य सरकारची मदत मिळाली नाही, तर अनधिकृत झोपडी काढून टाकता येत नाही, अशी परिस्थिती आहे.

मराठीच्या मुद्‌द्‌यावर स्थापन झालेली शिवसेना उत्तर प्रदेशमधून येणाऱ्यांचे लांगूलचालन करीत आहे. जैनधर्मीय मराठी लोकांना घरे नाकारतात. परप्रांतीयांची दंडेलशाही वाढत आहे. याकडे तुम्ही कसे पाहता?
- शिवसेना आणि मराठी माणूस यांचे नाते तुटलेले नाही व तुटणार नाही. जे कोणी असे म्हणत असेल, शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडला आहे, तर ते राजकीय आंधळे असतील. आम्ही मराठीसाठी लढतच आहोत व हिंदुत्वाचा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. आपण थोडेसे मागे गेलो, तर १९८७ची विलेपार्ल्यातील पहिली पोटनिवडणूक अशी होती, की जी हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌यावर लढविलेलीच नव्हे, तर जिंकलेली निवडणूक होती. आम्ही गेटवे ऑफ इंडियापुढे जाऊन कोणाला बोलावत नाही, की इकडे या आणि घरे बळकावा. आपल्याकडे काहीजण ७०-८० वर्षे झाली, राहात आहेत व मराठी बोलत आहेत. मी मध्यंतरी "मी मुंबईकर' कल्पना राबविली होती. वर्षानुवर्षे येथे राहात असलेल्या परप्रांतीयांनी आता आपल्या प्रांतातील लोकांना सांगितले पाहिजे, की आम्हाला आता इथे श्‍वास घेऊ दे. तुम्ही तिकडेच राहा व तेथेच काम पाहा. मी शेतकऱ्यांनाही तेच सांगत आहे, की तुम्ही आत्महत्या करू नका, मुंबईत या.

भाजप हा बनियांचा पक्ष आहे. बनियांचा अजेंडा शिवसेनेवर लादला आहे का? त्यामुळे शिवसेनेचा लढाऊ बाणा दबला गेला आहे का? रस्त्यावर शिवसेनेची ऍक्‍शन दिसत नाही?
- खासगी सुरक्षा संघटनांचा विषय असेल, तर आपण त्यांची मानगूट पकडू. त्यात परप्रांतीय का येत आहेत? पण मराठी माणूस सुरक्षारक्षक म्हणून मिळत नाहीत. मराठी माणसाने यात काम केले पाहिजे व त्या जागा भरल्या, तर परप्रांतीयांना जागा मिळणार नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज होत आहेत. खरे भूमीपुत्र ते आहेत. तिथे कोणी लक्ष घातले आहे? ते मराठी नाही आहेत का? ठाणे जिह्यातही कुपोषण होत आहे. तिथे सरकारी आकडेवारीनुसार २९० बालके मृत्यूमुखी पडली. ते आदिवासी असले, तरी मराठी नाहीत का? त्यांना सोडून दिले आणि नुसता मराठीचा मुद्दा लावून धरला, तर चर्चेतून काहीच होणार नाही. मराठी माणसाची मानसिकता बदलली पाहिजे. मराठी माणसाबाबत चर्चा करण्याचे आता दिवस व वेळ नाही. आपल्याकडे मराठीचा गर्व व ताकद असली पाहिजे. मी मराठी असून हिंमत असेल, तर मध्ये येऊन दाखव. ही हिंमत, अभिमान मराठी माणसात येत नाही, तोपर्यंत आपण बोलून उपयोग नाही.

मध्यंतरी भाजपशी युती तोडण्याची वेळ आली होती?
- शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडलेला आहे, असे म्हणणारे राजकीय आंधळे आहेत आहे. मराठीच्या मुद्‌द्‌यावरच युती तोडण्याची वेळ आली होती. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला होता. त्या पहिली मराठी महिला राष्ट्रपती बनल्या याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही कोणताही अपराध, गुन्हा केला नाही. राजकीय परिणामांची पर्वा न करता उघड भूमिका घेऊन पाठिंबा दिला होता. गैरहजर राहून, चोरून मारून छुपी मदत केली नव्हती. भाजपने शिवसेनेवर बनियाचा मुद्दा लादला हे होऊच शकत नाही. रेल्वे, बॅंक असो, कारखाने असो, जिथे लक्षात येते तेथे पूर्वीच्याच पध्दतीने शिवसेना आंदोलन करीत आहे. मुंबईत मराठी माणसाचा टक्का उरला आहे, ते शिवसेनेमुळेच आहे, हे मी अभिमानाने सांगेन. जैनधर्मीयांनी अन्य लोकांना घरे नाकारणे हा गुन्हाच आहे.त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई केलीच पाहिजे. आम्हीही घरे नाकारली, तर आंदोलन करू. प्रत्येकाने एकमेकांना समजून घेतले पाहिजे, म्हणजे अशी वेळ येणार नाही.

शिवसेना-भाजप युतीत संवाद होत नाही. उध्दव ठाकरे राजकारणी नव्हेत, ते कलावंत मनाचे आहेत?
- राजकारण कोणीही करतो. कलावंत रक्तात असावा लागतो.पैशाने राजकारण करता येते. कला नाही. मी कलावंताचा मुलगा आहे, याचा मला अभिमान वाटतो. शिवसेनेचे साम्राज्य ही एका कलावंताच्या कुंचल्याची किमया आहे. आम्ही दसऱ्याच्या दिवशी आजही कुंचल्याची पूजा करतो. राजकारण्याकडे मनच नसते, कलावंताला मन व संवेदना असते. त्या चांगले काही करू शकतात.

नारायण राणे भाजपमध्ये जाण्याची दाट शक्‍यता आहे?
- मी अजूनही माणूस शोधतोय, की जो केमिस्टकडे जाऊन डोके दुखण्याची गोळी मागेल.

महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ असेल, तर केंद्रात शिवसेना छोटा भाऊ असेल, हे अलिखित कराराचे समीकरण बदलेल का?
- अजून लोकसभा व विधानसभा निवडणुकीला अवकाश आहे. आपण जागावाटपाला महत्व द्यायचे की निवडून यायला. कोणाची किती ताकद वाढली आहे, हे डोळ्याला दिसत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी हाव धरून राहणारे खूप आहेत. पण त्यांना मुख्यमंत्री बनविणाऱ्यांची कोणाला पर्वा आहे. माझी ताकद मी जनतेच्या प्रश्‍नांसाठी अधिक वापरण्याचे ठरविले आहे.

शिवसेना-भाजप युती तुटली, तर शिवसेना स्वबळावर सत्ता मिळवू शकते?
- युती तुटेल, असे वातावरण सध्या नाही व तसे आमच्या मनातही नाही.

युतीत तणाव असताना भाजपच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युतीसाठी बैठका झाल्या होत्या. अशा मित्रावर विश्‍वास ठेवून सत्ताधारी आघाडीला पराभूत करणे सोपे आहे?
- राजकारणात कोण खरे बोलते व किती खोटे हे कोणी सांगू शकत नाही. एक व्यक्ती म्हणजे पक्ष होऊ शकत नाही. आमचा जनतेवर अधिक विश्‍वास आहे. बाकीचे विषय गौण ठरतात. आजचा महाराष्ट्र हा गुंडागर्दीचा आहे. शेतकऱ्यांचा राहिलेला नाही. घुसखोरांचा झाला आहे. सत्ता असताना बांगलादेशींना आम्ही सरहद्दीवर नेऊन सोडत होतो. मला बॉंबस्फोटांची चिंता असून तिकडे कोणी बघत नाही. एमआयडीसी बंद आहेत. कारखाने बंद पडताएत. एसईझेडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. तुम्हाला खुर्ची हवी आहे ना, मग फर्निचरच्या दुकानातून खुर्ची आणून त्यावर मुख्यमंत्री म्हणून बसा. कोणी विचारायला येणार नाही.

गोपीनाथ मुंडे अनुभवी राजकारणी आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी ते जीवतोड प्रयत्न करणार. हे शिवसेनेसाठी त्रासदायक नाही का?
- याची उत्तरे निवडणुकीनंतरच मिळतील.

शिवसेनाप्रमुखांनी सर्वस्व मानून कोणतीच प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली नाही किंवा प्रशासकीय पद स्वीकारले नाही. तुम्ही मुख्यमंत्रीपद घेणार का?
- मी पंतप्रधान, मुख्यमंत्री अशी कोणतीही वैयक्तिक स्वप्ने पहात नाही. स्वप्नांना कोणताही आधार नसतो. भलीभली माणसे स्वप्नातून कधी जागी झालीच नाहीत व अशीच संपून गेली.

महाराष्ट्र समृध्द करावयाचा असेल, तर प्राधान्याने करावयाच्या कोणत्या बाबी आहेत?
- शहरे पाहिली, तर मुलांच्या शिक्षणापासून प्रश्‍न सुरू होतो. चांगल्या शाळेत मुलांना प्रवेश देणे, शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयात प्रवेश आणि पदवीनंतर नोकरी मिळवून देणे, हे शहरी प्रश्‍न झाले. शेतीबाबत विचार करायचा झाला, तर एकाने विचारले तुम्ही शेतकरी-शेतकरी म्हणत आहात, तुमच्याकडे काय योजना आहेत? मला तर शेतीतील काही कळत नाही. माझ्यावर विरोधक तसाच आरोप करतात. ते खरेच आहे की मी शहरी बाबू आहे. पण ग्रामीण भागात वीज भारनियमनाचा मोठा प्रश्‍न आहे. दिवसभर वीजच नसते. मुलांना घरी अभ्यास करायचा असेल तर वीज नाही. शुभंकरोती कल्याणम, ही आपली परंपरा आहे. पण दिवेलागणीला घरी वीज नाही.

यातून कसा मार्ग काढणार? दूरदृष्टी असलेली व हे बदलू शकतील अशी माणसे तुमच्याकडे आहेत?
- निश्‍चित आहेत. तुम्हाला किंवा मला ते ज्ञान असले पाहिजे, हे आवश्‍यक नाही. पण ते तिथपर्यंत पोचले पाहिजेत. प्रश्‍न सोडवायचे असतील, तर तशी धमक असली पाहिजे.

जुन्या काळात सी.डी. देशमुख, रामभाऊ म्हाळगी, बॅरिस्टर नाथ पै, मधू दंडवते, असे अभ्यासू राजकीय नेते होते. त्या ताकदीचे नेते आज कुठे आहेत?
- ही जबाबदारी नेतृत्वाची, म्हणजे माझीच आहे. मी कराडला गेलो होतो व यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन घेऊन बाहेर आलो. गर्दीत एक यशवंतरावांचा कार्यकर्ता भेटला. तो म्हणाला, मी गेली 40 वर्षे कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिलो, पण पक्षाने आमच्या पदरात दगडधोंड्यांशिवाय काही घातले नाही. मी आता तुमचे काम करणार आहे. तुम्हीच आता परिवर्तन करू शकाल. गेल्या निवडणुकीच्या वेळी आमच्याकडे कोण होते? कर्जमुक्ती व मोफत वीजेचे आश्‍वासन आम्ही दिले होते.त्यावेळी आमच्याकडे कोण होते? त्यापूर्वी म्हणजे 1995 मध्ये सत्ता मिळाली, तेव्हाही आमच्याकडे कोण होते? कृष्णा खोऱ्याचे काम आम्हीच मार्गी लावले होते. कलाकाराचे मन असलेल्या शिवसेनाप्रमुखांचे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे स्वप्न सुदैवाने नितीन गडकरी यांनीच पार पाडले.त्यावेळी शिवसेनाप्रमुखांना प्रशासनाचा कुठे अनुभव होता.? आयटीपार्क झाले. वांद्रे-वरळी सागरीमार्गाचे भूमीपूजन शिवसेनाप्रमुखांनीच केले.

हिंदुत्व ब्रॅंडची ताकद प्रचंड होती व केंद्रात सरकार आले. हिंदुत्वाच्या ब्रॅंडखाली आता काय कामे सुरू आहेत?
- ज्या ज्या वेळी देशावर संकटे आली, त्यावेळी महाराष्ट्रातून कोणीतरी उभा राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वा.सावरकर, डॉ. हेडगेवार अशी उदाहरणे आहेत. हिंदुहृदयसम्राट म्हणून जे देशात ओळखले जातात, ती अस्सल मराठी व्यक्ती आहे. हिंदुत्व व मराठी या गोष्टी वेगळ्या नाहीत. कॉंग्रेसने ज्या जातीपातीच्या भिंती उभ्या केलेल्या आहेत, त्या आता हळूहळू तुटायला लागल्या आहेत. आपण मराठी म्हणून उभे राहतो, पु. ल. देशपांडे यांच्या वाड्‌मयातही याचे उल्लेख आढळतात की, त्याच मराठी माणसाचे कोळ्याचे कोष्ट्याशी, कुणब्याचे तेल्याशी जमत नाही. याला जबाबदार कोण?

हिंदुत्वासाठी मराठी माणसाने लाठया खाल्या, रक्त सांडले. हिंदुत्वाच्या लाटेचे क्रीम उत्तर भारतीय, बिहारी लोंढे व जैन लोकांनी खाल्ले. याबाबत काय म्हणाल?
- मी माझ्या पक्षाची जबाबदारी पार पाडतो आहे. सर्व पक्षीयांनी त्याकडे पाहिले पाहिजे.

महापालिका आयुक्तांनी आदेश काढूनही अनेक आस्थापनांनी मराठी पाट्या बदलल्या नाहीत. शिवसेना रस्त्यावर उतरून याला उत्तर देणार की नाही?
- ही जबाबदारी घ्यायला मी तयार आहेच. त्याबाबत मला लाज वाटण्याचे कारण नाही. मी शांत, संयमी आहे, असे माझ्यावर आरोप आहेत. हे करायला आम्ही मागेपुढे पहात नाही. पण ज्यांना सांगून कळत नाही, त्यांना कायद्याचा बडगा आहे. प्रशासन असमर्थ ठरले तर शिवसेना आहेच.

शिवसेनेचे किती खासदार व आमदार निवडून येतील?
- जेवढ्या जागा शिवसेना लढवेल, तेवढ्‌या सगळ्या जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार. मी शिवसेनेचा कार्याध्यक्ष व शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून आकाश पाताळ एक करीन. रात्रंदिवस मेहनत करीन. शिवसेना-भाजप युतीचा भगवा लोकसभा व विधानसभेवर या निवडणुकीत फडकावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.

नारायण राणे यांना शिवसेनेतून काढले. वेगवेगळ्याप्रकारचे आरोप त्यांनी जाहीररीतीने केले. त्यांची माणसे पक्षातून गेली. या काळात मनाचा समतोल कसा टिकविला?
- आमच्या कुटुंबियांनीही माझ्यावर आरोप केले होते. असा शत्रू कोणाला लाभला नसेल. शिवसैनिकांचे ऋण मी जन्मोजन्मी विसरू शकणार नाही. शिवसेनाप्रमुख माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मी खरा आहे की खोटा आहे, ते त्यांना माहीत आहे. त्यांनी मला खंबीरपणे सांगितले, तुझी भूमिका बरोबर आहे, एक ना एक दिवस जनता तुझ्या पाठीशी आल्याशिवाय राहणार नाहीत. माझी पत्नी रश्‍मीचे पाठबळ मिळाले. मुलगा आदित्य त्यावेळी दहावीत होता. तो शाळेत जात होता. अभ्यास काय करतोय, पेपर कसा गेला, हे मी विचारू शकत नव्हतो. संजय दत्त खलनायक म्हणून लोक विसरले होते. खलनायक म्हणून रोज वृत्तपत्रांतून माझेच नाव येत होते. दुसरा मुलगा तेजस हाही त्यावेळी पेपर वाचत होता, टीव्ही पहात होता. त्यांनी माझ्यावर विश्‍वास व धीर दाखविला . दुर्देवाने आता शाळा-महाविद्यालयातील मित्र राहिले नाहीत. महाविद्यालयातील मित्र संजय सुरे हा माझ्यासोबत अजूनही आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी याकाळात तुम्हाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साथ दिली?
- शिवसेनेला जशास तसे आक्रमकपणे उत्तर द्या, असे ते गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या बैठकीत बोलले आहेत. मी लहान मुलांच्या टीकेकडे लक्ष देत नाही, असे ते मध्यंतरी बोलले होते. आता शिवसेनेकडे लक्ष द्या सांगितले आहे.

तुम्ही राजकारणापेक्षा कलेत अधिक रमता?
- कला हा मला लाभलेला वारसा समजतो. दुर्देवाने मी कलेला आता जास्त वेळ देऊ शकत नाही. चित्र काढायला मला आवडते. पेटिंग व फोटोग्राफीची आवड आहे. चांगल्या पेंटिगची तारीफ करायची वृत्ती आहे. फोटोग्राफीवर टीका झाली होती. त्यावर मी सांगितले होते, की माझ्या छंदाचे दिवसाढवळ्याही प्रदर्शन करू शकतो. तुमच्या छंदाचे करता येत असेल, तर करा.

तुम्ही मुख्यमंत्री होणार?
- विचार केलेला नाही. मुख्यमंत्रीपद जेवढे वाटते, तेवढे सोपे नाही. लाखो लोक ज्या विश्‍वासाने येतात, ती मोठी जबबदारी आहे. लोक ज्या अपेक्षेने शिवसेनेकडे पाहतात ती पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही.

मुंबईत छटपूजा झाली पहिजे की नाही?
- यावर सर्व राजकीय पक्षांनी बोलले पाहिजे. एका पक्षाला कात्रीत पकडून चालणार नाही. याबाबत बोलताना आपण आपली कंपनी व व्यवसायापासून सुरवात केली पाहिजे. आपली बांधकाम कंपनी असेल, तर तिथे गवंडी मराठी पाहिजे. तो बिहारी किंवा परप्रांतीय चालतो आणि मग छटपूजेला विरोध करतो! यासाठी स्पष्ट भूमिका पाहिजे. विरोध करायचा असेल, तर स्वतःपासून आचरण सुरू केले पाहिजे. माझे सहकारी व कंपन्यांमधील व्यक्ती अमराठी चालतात. मी बांधकाम व्यावसायिक असेल, तिथे अमराठी चालतात आणि राजकारण म्हणून मी विरोध करतो. आधी तिकडे मराठी कर, मग छटपूजेच्या विरोधाला मी पाठिंबा देईन. माझ्यात शांत, संयमीपणा आला आहे, ही माझ्या मॉं ची देणगी आहे. तिचे ऋण व आशीर्वाद मला नेहमी जाणवत असतात. म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.

(शब्दांकन - उमाकांत देशपांडे)
--------------------------------------------------------------------------------------

उद्याची मुलाखत - राज ठाकरे


"मराठीचा मुद्दा घेतला तर अन्य भाषिकांची मते जातील, ही भीती राजकीय पक्षांना असल्याने राजकारणात मी अस्पृश्‍य आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाबरोबर निवडणुकीसाठी युतीबाबत मी विचारही केलेला नाही.''
- राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्वर्यू. मराठी माणसाच्या प्रगतीचा मुद्दा घेऊन ते राजकारण करू इच्छितात, त्यांना यशाची घाई नाही; परंतु खात्री आहे. आपल्या ठाकरी शैलीत त्यांनी दिलेली मुलाखत "साम' वाहिनीवर रंगली.
ता. 3 सप्टेंबर, रात्री 9.30

--------------------------------------------------------------------------------------------

तुम्ही राज ठाकरे यांना प्रश्‍न विचारू इच्छिता? टाइप करा pun1 (स्पेस) तुमचा प्रश्‍न आणि पाठवा 54321 वर. (एअरटेल मोबाईलधारकांनी 56666 ला एसएमएस करावा)
(एसएमएससाठी ऑपरेटरनुसार एक ते तीन रुपये खर्च येईल)

Monday, September 1

आम्ही राज्यात परिवर्तन करू!



शिवसेनेबरोबरची युती जेव्हा संकटात होती, तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करण्याचा विचार आम्ही केला होता. पण दुर्देवाने आमच्यातील भांडण मिटले. राज ठाकरे हे एक उमदे व्यक्तिमत्व आहे. पण राजकारणात त्यांना फायदा होईल, असा एकही निर्णय मी घेणार नाही... ही व्यक्तव्ये आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांची.
साम मराठीवर महाराष्ट्र कोणाचा या कार्यक्रमात पत्रकार राजू परूळेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतील ही काही प्रश्नोत्तरे...

गेल्या निवडणुकीत सरकारविरोधी जनमताचा (अँटी इन्कबन्सी फॅक्‍टर) फायदा घेता आला नाही. त्याचे विश्‍लेषण करून आगामी निवडणुकीत तुमची काय स्ट्रॅटेजी आहे?
- गेली आठ वर्षे राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार आहे. सत्ताधारी आघाडीने निवडणूक जाहीरनाम्यात सांगितले होते, की शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ, कर्ज माफ करू, कापसाला प्रतिक्विंटल 2500 रूपये भाव देऊ... अशा अनेक घोषणा केल्या होत्या. निवडून आल्यावर मुख्यमंत्री म्हणाले होते, की जाहीरनाम्यातील घोषणा पाळण्यासाठी नसतात. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रभा राव म्हणाल्या होत्या, की ती प्रिंटीग मिस्टेक आहे. तर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते, की तो आमचा निवडणूक संटट होता. ही जनतेची फसवणूक होती. आम्ही राज्य सोडले होते, तेव्हा राज्यावर 39 हजार कोटी रूपयांचे कर्ज होते. आम्ही सत्तेवर आलो होतो, तेव्हा 16 हजार कोटी रूपयांचे कर्ज होते. महाराष्ट्रावर आज एक लाख 51 हजार कोटी रूपये इतका कर्जाचा बोजा आहे. राज्यात गेल्या काही वर्षात सुमारे 15 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बिहार, उत्तरप्रदेशचा विक्रम तोडून महाराष्ट्रात 18-20 तास वीज भारनियमन सुरू आहे.

एन्रॉनप्रकरणी ते तुम्हाला जबाबदार धरत आहेत...
- हे सरकार येऊन 8 वर्षे झाली. एका वीज प्रकल्पाला चार वर्षे लागतात. आता आठ वर्षानंतरच्या स्थितीलाही आम्हीच जबाबदार कसे? हे आमच्यावर अन्यायकारक आहे. राज्याने 13 वीजप्रकल्पांबाबत सामंजस्य करार केले व उर्जामंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्याची विधीमंडळात घोषणा केली होती. त्यातील एक तरी आला का?

तुम्ही सत्तेवर आल्यावर तुमचे राज्याबद्दलचे स्वप्न काय?
- उद्योगधंदे व शेती अशा विकासाच्या दोन महत्वाच्या बाबी आहेत. उद्योगधंद्यांच्या विकासासाठी वीज, पाणी, वाहतूक व दळणवळण या गोष्टी आवश्‍यक आहेत. तर शेतीसाठी वीज, सिंचन सुविधा, खते, बियाणे, कमी व्याजदराचे कर्ज या गोष्टी महत्वाच्या आहेत. या गोष्टी उपलब्ध करून दिल्या, तर विकासदर वाढेल. रोजगार वाढेल. दरडोई उत्पन्न वाढेल. महाराष्ट्राचे चित्र बदलेल. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पतंगराव कदम, अशोक चव्हाण अमेरिकेत परकीय भांडवल आकर्षित करण्यासाठी गेले. ज्या राज्यात 18 तास वीजभारनियमन आहे, तेथे येण्यासाठी उद्योगपतींना काय वेड लागले आहे?

मोफत वीजेची घोषणा बाळासाहेब ठाकरेंनीही केली होती...
- त्याची अंमलबजावणी दोन वर्षात करता येईल. जादा वीजनिर्मिती करून शेतकऱ्यांना मोफत वीज देणे शक्‍य आहे. सरकारकडे इच्छाशक्तीच नाही. एका वीजप्रकल्पासाठी 28 ना-हरकत परवाने लागतात. प्रत्येक खाते झटपट काम करीत नाही व परवाने देत नाही. त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून प्रकल्प मार्गी लावले पाहिजेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गसाठीही पर्यावरणासह अनेक अडचणी होत्या. पण इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही ते अडथळे दूर केले. इच्छाशक्ती नसेल, तर सर्व्हे, सेमिनार, कमिटी, चर्चा, अहवाल हेच होत राहते. महाराष्ट्राला उद्योगधंद्यांमध्ये सहाव्या क्रमांकावर नेऊन ठेवले आहे. हे नरेंद्र मोदींच्या नावे खडे फोडतात, पण ते गुजरातला पहिल्या क्रमांकावर घेऊन गेले. त्याचे आम्हाला मराठी म्हणून दुःख आहे.

शिवसेनेने भाजपबरोबर सातत्याने मैत्री निभावलेली नाही. युतीचा धर्म पाळला नाही, अशी अनेक उदाहरणे आहेत. मग अशा मित्राला घेऊन सत्ता मिळवणे शक्‍य आहे का?
- जे झाले ते आम्ही विसरलो आहोत. कोणत्याही मैत्रीत लहान-मोठे वाद होतात. हिंदुत्वावरून शिवसेनेशी मैत्री आहे. झाले गेले विसरून महाराष्ट्रात युतीचे राज्य आणि देशात लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे राज्य आणायचे, असे आम्ही ठरविले आहे आणि कामाला लागलो आहोत. आम्ही निश्‍चितपणे राज्यात परिवर्तन करू, याची मला खात्री आहे.

लालकृष्ण अडवाणींच्या पंतप्रधानपदाच्या आकांक्षेसाठी भाजप राज्यात शिवसेनेच्या दावणीला बांधला गेला आहे का?
- हे असत्य आहे. अडवाणी ध्येयसमर्पित व राष्ट्रसमर्पित नेते आहेत. ते पंतप्रधान होण्यासाठी राजकारणात आलेले नाहीत.राजकारण हे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे एक साधन आहे, अशी त्यांची शिकवण आहे. अडवाणींचा कोणताही स्वार्थ नाही. भाजपला एकट्याच्या ताकदीवर पर्याय उभा करणे शक्‍य नाही. हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌यावर समविचारी पक्षाशी झालेली आणि देशात सर्वाधिक काळ टिकलेली ही युती आहे. दोन व्यक्तींमध्ये 100 टक्के कधीच पटत नसते. घरात भावाभावांचीही वेगळी मते असतात. हिंदुत्वाच्या विचाराकरिता ही युती केलेली आहे. आम्ही लहानमोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून राष्ट्रहितासाठी मार्गक्रमण करणार आहोत. कटु गोष्टी विसरलो आहोत, त्याची आठवणही काढत नाही.

भाजपमध्ये संघाची शिस्त आहे. पण अशा पक्षात गोपीनाथ मुंडे यांचे बंड झाले. त्याबाबत तुमच्या दिशेने बोटे वळली होती. या परिस्थितीत भाजप कसा सत्ता मिळविणार?
- आम्ही आता सर्व विसरलो आहोत. मी त्यांचा कधीच अपमान केलेला नाही. ते आमचे नेते आहेत. मी वेगळ्या पध्दतीने काम करतो. एखादा निर्णय त्यांना आवडला नाही व ते नाराज झाले. त्यांच्या नेतृत्वाबद्दल आकस नसून, आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली निवडणुका लढणार आहोत. भविष्यात असे प्रसंग येणार नाहीत.

प्रदेशाध्यक्षाला कार्यक्षमतेनुसार माणसे नेमायची असतात. मुंडेंना त्यांची माणसे वेगवेगळ्या पदावर आणायची होती. व तुम्ही नेमत नव्हता. कार्यक्षमता न पाहता त्यांना आवडणारी नेमायचे ठरले, की काय झाले?
- मी राजकारणात आलो, ते सेवेचे व विकासाचे राजकारण करण्यासाठी. ते करताना पद मिळाले तर ठीक, पण ते मिळण्यासाठी मी काम करीत नाही. गोपीनाथ मुंडे मला खूप ज्येष्ठ आहेत. आमच्यातील गैरसमज आता दूर झाले आहेत. पक्षशिस्त म्हणून अंतर्गत व्यासपीठावर चर्चा केली पाहिजे, ती जाहीर करता कामा नये. ते माझ्या शिस्तीत बसत नाही. आमच्यातील भांडण व्यक्तिगत सत्तापदासाठी नव्हते. दोघांनी चर्चा करून प्रश्‍न मिटविला आहे.

तुम्हाला संघाचा भक्कम पाठिंबा आहे हे खरे आहे?
- तुम्ही संघावर अन्याय करता. संघ कुठलेही आदेश देत नाही. पाठिंबा देत नाही. सर्व संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांना चांगले काम करणे अपेक्षित असते. संघाने अमूक करा, हे सांगितलेले नाही. संघ समन्वयाचे म्हणजे दुधात साखर टाकायचे काम करतो.

विदर्भात शेतकरी आत्महत्या, बालमृत्यू, दुष्काळ, पूर, आदी प्रश्‍न आहेत. तुम्हाला त्यावर काय उपाय सुचविता येतील?
- राज्याच्या तिजोरीतील पैसा पश्‍चिम महाराष्ट्राला अधिक मिळाला. विदर्भाचा विकास झाला नाही. विशेषतः सिंचनाच्या बाबतीत अनुशेष खूप मोठा आहे. विदर्भात वीज तयार होते. वीजकेंद्राच्या बाजूच्या गावात 16-18 तास भारनियमन सुरू आहे. वन कायद्यामुळे सिंचनप्रकल्पही होत नाहीत. तेथील नेते विकासाकरिता पूर्ण ताकद पणाला लावून काम करीत नाहीत. पश्‍चिम महाराष्ट्राला मी दोष देणार नाही. आम्ही सत्तेवर असताना मी केवळ विदर्भ-मराठवाड्याचा विचार केला नाही. खंबाटकी घाट, मेळघाट परिसर, मुंबई पुणेमार्ग, नक्षलवादी भागातीलही रस्ते केले. विकास सर्व भागाचा व्हायला पाहिजे, हा विचार केला. शक्तिशाली नेते आपल्याकडे निधी ओढून घेतात. विदर्भाला पशुसंवर्धन, वस्त्रोद्योग व शिक्षण खाते आहे. अर्थ, गृह, सहकार, उर्जा, सगळी खाती पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडे आहेत. कॉंग्रेसमध्ये विदर्भाच्या मंत्र्यांना किंमतच नाही. कोणी मंत्रिमंडळात त्यांचे ऐकूनही घेत नाही.विदर्भ, मराठवाडा, कोकणच्या मंत्र्यांचे कोणी ऐकत नाही. या भागात सरकारविरूध्द असंतोष आहे. तेथील सिंचन प्रकल्प पूर्ण केले पाहिजेत. विदर्भातील अर्थकारण कापूस व सोयाबीनवर आहे. कापूस प्रक्रिया उद्योग आले पाहिजेत. त्याचबरोबर कपडे, पॅंट निर्यात उद्योग तेथे झाले पाहिजेत. विशेष आर्थिक क्षेत्र मुंबई परिसरात झाले, तर विदर्भात गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरला कोण जाईल? विदर्भात सवलती देऊ नका, पण मुंबईच्या 200 किमीपरिसरात उद्योगांनाही सवलती देऊ नका. मग आमच्याकडे विदर्भात उद्योग येतील. व्हिडीओकॉनची फॅक्‍टरी नवी मुंबईत कशाला?

विशेष आर्थिक क्षेत्राबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. याबाबत तुमचे धोरण काय?
- त्यासाठीच्या जमिनी सरकारने संपादित करू नये. उद्योगपतींनी बाजारभावाने जमिनी घेतल्या पाहिजेत. जेथे 100टक्के निर्यात क्षम उद्योग आहेत, तेच एसईझेड मुंबई परिसरात आणावेत. नाहीतर ते अन्य भागात गेले पाहिजेत. उद्योगांचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. अन्य भागातील लोकांनाही रोजगार मिळाला पाहिजे. तर प्रगती व विकासाचे विकेंद्रीकरण होईल. सांगली, आटपाडी, गडचिरोली येथे उद्योग नाहीत. मुंबई,परिसरात सवलती असताना मग याभागात कोण जाईल. प्रत्येक जिल्ह्यात एसईझेड करा. शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमोल भावाने संपादित करतात व उद्योगांना देतात. सरकार दलालीचे काम कशाला करते?

तुमच्या सरकारमध्ये मंत्री भ्रष्टाचारमुक्त होते का?
- आमचा पक्ष मोठा आहे. पक्ष भ्रष्टाचारमुक्त आहे, असा दावा करणे वेडेपणाचे आहे. पक्षात भ्रष्टाचाराला मान्यता किंवा प्रतिष्ठा नाही. पक्षात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. सर्वांसाठी असा दावा करणे बरोबर नाही. सिंचन, रस्ते, जीवन प्राधिकरण यांची कामे युतीच्या काळातही झाली. पण आता निविदा प्रक्रिया बंद आहे. मंत्री सांगतील, त्यांना कामे मिळतात. भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू आहे. सर्व सरकारच असे आहे. एसआरए, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, सर्व खाती सारखीच आहेत. मंत्री दुष्काळातून आल्यासारखे राज्यात लूटमार करीत आहेत. निवडणुकीनंतर आम्ही मंत्रालयात शपथ घेऊन जाऊ, तेव्हा मंत्रालयात आम्हाला बसायला टेबलखुर्ची तरी ठेवा. आठ मंत्र्यांविरूध्द उच्च न्यायालयाचे ताशेरे आहेत. सुरेशदादा जैन, नवाब मलिक, डॉ. गावीत आहेत. उच्च न्यायालय, लोकायुक्त यांचे मंत्र्यांविरूध्द ताशेरे आहेत. आमच्याकाळी अशा प्रकरणात लगेच चौकशी आयोग बसत असे. पण आता सरकार काहीच दखल घेत नाही. इतके बोजड सरकार आहे. आता कोणीही राजीनामा देत नाही. सरकार थंड असून संवेदनशीलता गमावली आहे.

विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांच्यात तोडबाजी आहे. कामे देण्यात टक्केवारी आहे. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाविरूध्द आवाज उठविला जात नाही?
- शिवसेना नेते उध्दव ठाकरे हेही भ्रष्टाचाराबाबत बोलले आहेत. काहींना कमी प्रसिध्दी मिळते. पण सरकार निगरगट्ट झाले आहे. भायखळ्याला 25 रूपये दराने जमीन विकली होती. वक्‍फ बोर्डाच्या जमिनी विकल्या. अनाथालय, कब्रस्तान याच्या जमिनी विकल्या जात आहेत.

मुसलमान समाजाला उखडण्याचे तुमचे तत्वज्ञान आहे?
- हे 100 टक्के चुकीचे आहे. हिंदुत्व हे मुसलमानाविरूध्द नाही. सर्वोच्च न्यायालयाने व्याख्या केली आहे की, हिंदुत्व ही जीवनपध्दती आहे. ते मुसलमानांविरूध्द नाही. स्वामी विवेकानंदांनी हिंदुत्वाची व्याख्या केली आहे. सेक्‍युलर शब्दाचा अर्थ सर्वधर्मसमभाव असा अर्थ आहे. धर्मनिरेपेक्ष असा त्याचा अर्थ नाही. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व. सावकरांचे विचार वाचा. देशाचा इतिहास म्हणजे हिंदुचा इतिहास. भारतीयांचा इतिहास म्हणजे औरंगजेबाचा? नाही, शिवाजी महाराज, राणा प्रताप यांचा इतिहास आहे. जगात हिंदूंचा देश कोणता? हिंदुस्थान व नेपाळ. हे दोनच देश आहेत. हिंदूची संस्कृती ही येथील संस्कृती. पाकिस्तानप्रमाणे धर्माधिष्ठित राष्ट्र निर्माण करणे आम्हाला अपेक्षित नाही.

मोगलांनी देशाच्या संस्कृतीत काहीही भर टाकली नाही?
- देशाच्या इतिहासाचे पुस्तक लिहायला सांगितले, तर कोणाचा इतिहास येईल. बौध्द, हिंदू, शीख यांचाच इतिहास येईल. या देशाची संस्कृती व इतिहास हा आमचा इतिहास आहे. संसदेवर हल्ला करणाऱ्या व सुरक्षा जवानांना मारणाऱ्या अफझल गुरूला हे सरकार फाशीची शिक्षा देत नाही. जवानांच्या विधवांनी आपली पदके फेकली. जम्मू-काश्‍मीरमध्ये सैन्याशी लढताना जे गेले, त्यांना भरपाई व परिवाराला पेन्शन मिळते. हे का सुरू आहे.?

या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. आपल्या सरकारला दोन प्रकरणात अतिरेक्‍यांना सोडावे लागले?
- ही वेगवेगळी प्रकरणे आहेत. इंडियन एअरलाईन्सच्या विमानातील प्रवाशांना सोडण्यासाठी अतिरेक्‍यांना सोडावे लागले. जनतेने, पत्रकारांनी तशी मागणी केली होती. अफझल गुरूबाबत अशी काय अडचण आहे? बॉंबस्फोट घडविणाऱ्यांच्या वकिलाला स्वतःला राष्ट्रवादी म्हणविणारा पक्ष सरचिटणीस म्हणून नेमतो. तुम्ही पोटा कायदा का रद्द करतो. एका गटाचे तुष्टीकरण करण्यासाठी.

भाजप नारायण राणेंसाठी रेडकार्पेट ट्रीटमेंट देऊन पक्षात घेणार?
- मी व गोपीनाथ मुंडे यांनी राणेंबरोबर अनेक वर्षे काम केले. आमचे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत. त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा आमचे राजकीय संबंध संपले. शिवसेना सोडू नये, म्हणून मी त्यांना विनवणी केली. प्रयत्न केला. त्यांचे आमचे राजकीय संबंध नाही. भाजप-शिवसेना युती एकत्र आहे. आम्ही आतून राणे यांना पाठिबा देऊ अशी कृती करणार नाही. कॉंग्रेस नेहमी सर्वांना फसवतो. कॉंग्रेसमध्ये जाऊन राणे यांनी चूक केली आहे.

जागावाटपाबाबत भाजप व शिवसेना यांच्यामध्ये शिवसेना राज्यात व भाजप केंद्रात मोठा भाऊ अशी समीकरणे ठाकरे व महाजन यांनी ठरविली होती. ती समीकरणे बदलली आहेत व तशीच राहणार आहेत?
- हिंदू कुटुंबात आईवडिलांनी घेतलेल्या निर्णयाचे मुले जशी पालन करतात, तसे सुरू आहे.

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गुणदोष काय सांगता येतील?
- माझ्या मनात जेवढी श्रध्दा अटलबिहारी वाजपेयींबद्दल आहे, तेवढी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल आहे. भाजप-शिवसेना युती एक नैसर्गिक युती आहे. ज्याप्रकारे प्रमोद महाजन व बाळासाहेबांनी युती टिकविली आहे, त्याप्रमाणे बाळासाहेबांनंतर उध्दव ठाकरे व आम्हीही ती टिकवू. दुधात साखर टाकण्याचे काम आम्ही करू. काही पत्रकार व राजकीय नेत्यांना कायम वाटत असते, की आमची युती तुटावी.

भाजप व मनसे युती होण्याची हवा होती? आज तुमची भूमिका काय?
- राज ठाकरे शिवसेनेत होते, तेव्हापासून माझे त्यांच्याशी चांगले संबंध होते. मनसेबरोबर युतीचा प्रस्ताव कधीही नव्हता. मित्र म्हणून राज ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. शिवसेनेबरोबरची युती संकटात आली होती, तेव्हा आपण राज ठाकरे यांच्याबरोबर युती करावी असा विचार आला होता. पण सुदैवाने आमचे भांडण मिटले. राजकारणात आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. राज ठाकरे एक उत्तम व्यक्तिमत्व आहे. पण राजकारणात त्यांना फायदा होईल, असा एकही निर्णय मी घेणार नाही.

शिवसेना-भाजप युतीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्याचा संकल्प सोडला आहे का? तो सिध्दीस जाईल का?
- मागच्यावेळी सत्तेने जवळून हुलकावणी दिली होती. यावेळी मंत्र्यांविरूध्द जनतेमध्ये असंतोष आहे. राज्यात विकासाचे वातावरण तयार केले पाहिजे. चित्र बदलू शकतो, भारनियमन थांबवू शकतो, उद्योगांचे विकेंद्रीकरण करू शकतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू शकतो, याबाबत संयुक्तरितीने प्रचार करून जनतेच्या मनात विश्‍वास निर्माण केला पाहिजे. लवकरच याबाबत योजना घेऊन आम्ही काम करू. युतीच्या काळातील काम व निर्णय आणि या सरकारचे निर्णय व कामगिरी यासंदर्भात जनजागृती व परिवर्तन अभियान सुरू करू. आमचीच सत्ता येईल व मंत्रालयावर भगवा फडकेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

जर शिवसेनेबरोबर युती नसेल, तर सर्वात जवळचा पक्ष कोणता असेल?
- शिवसेनेबरोबर युती असल्याने तसे उत्तर देता येणार नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------

उद्याची मुलाकत - उद्धव ठाकरे

"केवळ राजकारण म्हणून मराठीच्या मुद्द्याचा वापर करू नये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू आदींकडे दुर्लक्ष करून मराठीचा मुद्दा लावून धरण्याचा काहीच उपयोग नाही.''
- उद्धव ठाकरे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष. नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षाची पडझड रोखण्यात यशस्वी ठरलेले नेते. राज्यात सत्तापरिवर्तनाचे शिवधनुष्य पेलण्याविषयी त्यांनी केलेल्या वक्तव्यांतून "साम' वाहिनीवर त्यांची रंगलेली मुलाखत.
2 सप्टेंबर, रात्री 9.30
---------------------------------------------------------------------------------------------------

उद्धव ठाकरे यांना प्रश्‍न विचारण्यासाठी एसएमएस करा. "मेसेज'मध्ये टाइप करा pun1, (आपला प्रश्‍न) आणि पाठवा 54321 वर. (एअरटेल मोबाईलधारकांनी 56666 ला एसएमएस करावा)

("एसएमएस'साठी ऑपरेटरनुसार एक ते तीन रुपये खर्च येईल)