+f.jpg)
महाराष्ट्रातील प्रश्नांना कोण जबाबदार आहे, ते कसे सोडविता येतील, अभ्यासूपणे व

राज्यापुढील अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलेल्या समस्या सोडविणे सोपे नाही. असे वाटते की समस्या ही एक संधी आहे?
- राज्यात मराठी ही भाषा थोड्याथोड्या अंतरावर वेगवेगळी बोलली जाते. मेळघाटमधील आदिवासींना मराठी किंवा हिंदी भाषा येत नाही. त्यांची भाषा आहे, कोरकू. विविध भाषा, परंपरा, इतिहासाने सजलेला-नटलेला हा महाराष्ट्र. देशात प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राएवढा संपन्न वारसा दुसऱ्या कोणत्या राज्याला मिळाला असेल, असे मला वाटत नाही. समाजसुधारणा, इतिहास, राजकारण, प्रबोधन कोणत्याही क्षेत्रात संपन्न अशी माणसे राज्याने दिली आहेत. महाराष्ट्र ही हिऱ्या माणकांची खाण आहे. अशी परंपरा असलेले राज्य दिवसागणिक मागे पडताना पाहून अंतःकरण तिळतिळ तुटते. या समस्या सुटू शकतच नाहीत का? या समस्या निर्माण कशा झाल्या.? स्वातंत्र्याला ६० वर्षे व संयुक्त महाराष्ट्राला ४८ वर्षे झाली. एकामागून एक संकटे राज्यावर येत आहेत. विरोधक म्हणून मला आगपाखड करावयाची नाही. यासाठी प्राधान्याने गुन्हेगार कोण असतील, तर ते राज्यकर्ते आहेत.
युतीसह सर्व राज्यकर्ते जबाबदार आहेत?
- युतीच्या काळात जेवढी कामे झाली, त्याच्याआधी व नंतरही एवढी कामे झाली नाहीत. एखादी गोष्ट सोडविणे खूप कठीण असते. पण तुम्ही ती सोडविण्याचा प्रयत्न न करता नुसती स्वप्ने दाखवत असाल, तर ते योग्य नाही. गेली ८-९ वर्षे आघाडीचे सरकार आहे व वीजेचे संकट खूप मोठे आहे. मी सिन्नरला गेलो होतो, तेव्हा एका शेतकऱ्याने सांगितले की, चार दिवस झाले आमच्याकडे वीजच आलेली नाही.
एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडविण्याची चूक युतीने केली. हे कारण वीजसंकटामागे आहे का?
- एन्रॉन हा एकमेव प्रकल्प राज्यासाठी आहे का? दुसरे कोणतेच प्रकल्प दिसत नाहीत? एन्रॉनमुळे किती वीज राज्याला मिळणार आहे? आम्ही काय केले? तो आम्ही बंद पाडला नाही. आधीच्या सरकारने जो करार केला होता, त्यातील राज्याला वाईट, अहितकारक गोष्टी आम्ही बदलून घेतल्या. एन्रॉनकडे बोट दाखवून सरकारला पापातून सुटका करून घेता येणार नाही. गेल्या ९ वर्षात इतर किती प्रकल्प सरकारने आणले व वीजनिर्मिती केली? किती उद्योगधंदे राज्यात आले? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी किती मंत्री गेले?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलेल्या नेत्यांची पिढी वृध्दत्वामुळे किंवा निधनामुळे सध्या पक्षात नाही. तर काही नेत्यांनी शिवसेना सोडली किंवा त्यांना काढले. त्यामुळे सत्ता मिळाल्यावर शिवसेनेकडे चांगला प्रशासकीय अनुभव असलेले किती नेते आहेत?
- शिवसेनेला आपण प्रबळ पक्ष समजत असल्याबद्दल धन्यवाद. गेल्या २-३ वर्षात काहींना बाळासाहेबांनी काढले, तर काही सोडून गेले. त्यानंतर शिवसेनेत राम राहिला नाही, शिवसेना संपली, भवितव्य राहिलेले नाही, उध्दव ठाकरे कारकुनी करणारा आहे, त्याच्याकडे नेतृत्वगुण नाहीत, हे सगळे आरोप मी सहन केले. बाळासाहेबांचे आशीर्वाद भक्कमपणे माझ्यामागे नसते व कार्यकर्त्यांचे बळ माझ्या पाठीशी नसते, तर तुम्ही मला मुलाखतीसाठी बोलावले नसते.
ज्याअर्थी तुमच्यावर जोरदार टीका होते. त्याअर्थी तुम्ही प्रबळ आहात...
- शिवसैनिकांना अजून कोणी ओळखलेले नाही. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना दुःख दिले, त्यांना शिवसैनिक कधीही आपले समजत नाहीत. माफ करीत नाहीत व माफ करणार नाहीत. हे शिवसैनिकांबद्दल ज्यांचा गैरसमज आहे, त्यांनी लक्षात ठेवावे. शिवसैनिक आलेल्या आव्हानाला कधीच घाबरत नाहीत. आम्ही गावोगावी जात आहोत, जे विषय समजत नव्हते, ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. अनुभवाने शहाणपण येते. महाराष्ट्रात परिस्थिती काय आहे? इथे बसून सर्व समजत नाही. लोकांशी बोलल्यावर अनेक गोष्टी उलगडत जातात.
प्रशासकीय ताकद असलेली माणसे पक्षाकडे नाहीत...
- राहुल गांधींना जर पंतप्रधान म्हणून बघितले जाते, तर शिवसेनेकडे संशयाच्या नजरेतून पाहण्याची गरज नाही.
मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. रस्त्यावरील खड्डे, अनधिकृत झोपड्या हे प्रश्न आहेत. पोलिसांना घरे नाहीत आणि झोपडपट्टीवासियांना मोफत घरे मिळतात? तुमची सत्ता असताना काय करता?
- महापालिकेकडे मुंबईचे पालक म्हणून पाहिले पाहिजे. मुंबईचे पालकत्व एकाकडे नाही. पालिकेवर एमएमआरडीए, रेल्वे व एअरपोर्ट ऍथॉरिटीची जागा वेगळी, अशी परिस्थिती आहे. आम्ही कलानगरला राहतो. पावसाळ्यात आम्हाला रात्रीची झोप येत नाही. कारण हा विभाग बशीसारखा झाला आहे. एका बाजूला एमएमआरडीएचा रस्ता आहे. बीकेसी आहे, नाल्याचे रूंदीकरण झालेले आहे. म्हणजे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. झोपड्या काढत असताना पोलिसांची मदत पालिकेला मिळत नाही. महापालिकेकडे स्वतःचे दल नाही. गृह विभाग व राज्य सरकारची मदत मिळाली नाही, तर अनधिकृत झोपडी काढून टाकता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
मराठीच्या मुद्द्यावर स्थापन झालेली शिवसेना उत्तर प्रदेशमधून येणाऱ्यांचे लांगूलचालन करीत आहे. जैनधर्मीय मराठी लोकांना घरे नाकारतात. परप्रांतीयांची दंडेलशाही वाढत आहे. याकडे तुम्ही कसे पाहता?
- शिवसेना आणि मराठी माणूस यांचे नाते तुटलेले नाही व तुटणार नाही. जे कोणी असे म्हणत असेल, शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडला आहे, तर ते राजकीय आंधळे असतील. आम्ही मराठीसाठी लढतच आहोत व हिंदुत्वाचा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. आपण थोडेसे मागे गेलो, तर १९८७ची विलेपार्ल्यातील पहिली पोटनिवडणूक अशी होती, की जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढविलेलीच नव्हे, तर जिंकलेली निवडणूक होती. आम्ही गेटवे ऑफ इंडियापुढे जाऊन कोणाला बोलावत नाही, की इकडे या आणि घरे बळकावा. आपल्याकडे काहीजण ७०-८० वर्षे झाली, राहात आहेत व मराठी बोलत आहेत. मी मध्यंतरी "मी मुंबईकर' कल्पना राबविली होती. वर्षानुवर्षे येथे राहात असलेल्या परप्रांतीयांनी आता आपल्या प्रांतातील लोकांना सांगितले पाहिजे, की आम्हाला आता इथे श्वास घेऊ दे. तुम्ही तिकडेच राहा व तेथेच काम पाहा. मी शेतकऱ्यांनाही तेच सांगत आहे, की तुम्ही आत्महत्या करू नका, मुंबईत या.
भाजप हा बनियांचा पक्ष आहे. बनियांचा अजेंडा शिवसेनेवर लादला आहे का? त्यामुळे शिवसेनेचा लढाऊ बाणा दबला गेला आहे का? रस्त्यावर शिवसेनेची ऍक्शन दिसत नाही?
- खासगी सुरक्षा संघटनांचा विषय असेल, तर आपण त्यांची मानगूट पकडू. त्यात परप्रांतीय का येत आहेत? पण मराठी माणूस सुरक्षारक्षक म्हणून मिळत नाहीत. मराठी माणसाने यात काम केले पाहिजे व त्या जागा भरल्या, तर परप्रांतीयांना जागा मिळणार नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज होत आहेत. खरे भूमीपुत्र ते आहेत. तिथे कोणी लक्ष घातले आहे? ते मराठी नाही आहेत का? ठाणे जिह्यातही कुपोषण होत आहे. तिथे सरकारी आकडेवारीनुसार २९० बालके मृत्यूमुखी पडली. ते आदिवासी असले, तरी मराठी नाहीत का? त्यांना सोडून दिले आणि नुसता मराठीचा मुद्दा लावून धरला, तर चर्चेतून काहीच होणार नाही. मराठी माणसाची मानसिकता बदलली पाहिजे. मराठी माणसाबाबत चर्चा करण्याचे आता दिवस व वेळ नाही. आपल्याकडे मराठीचा गर्व व ताकद असली पाहिजे. मी मराठी असून हिंमत असेल, तर मध्ये येऊन दाखव. ही हिंमत, अभिमान मराठी माणसात येत नाही, तोपर्यंत आपण बोलून उपयोग नाही.
मध्यंतरी भाजपशी युती तोडण्याची वेळ आली होती?
- शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडलेला आहे, असे म्हणणारे राजकीय आंधळे आहेत आहे. मराठीच्या मुद्द्यावरच युती तोडण्याची वेळ आली होती. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला होता. त्या पहिली मराठी महिला राष्ट्रपती बनल्या याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही कोणताही अपराध, गुन्हा केला नाही. राजकीय परिणामांची पर्वा न करता उघड भूमिका घेऊन पाठिंबा दिला होता. गैरहजर राहून, चोरून मारून छुपी मदत केली नव्हती. भाजपने शिवसेनेवर बनियाचा मुद्दा लादला हे होऊच शकत नाही. रेल्वे, बॅंक असो, कारखाने असो, जिथे लक्षात येते तेथे पूर्वीच्याच पध्दतीने शिवसेना आंदोलन करीत आहे. मुंबईत मराठी माणसाचा टक्का उरला आहे, ते शिवसेनेमुळेच आहे, हे मी अभिमानाने सांगेन. जैनधर्मीयांनी अन्य लोकांना घरे नाकारणे हा गुन्हाच आहे.त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई केलीच पाहिजे. आम्हीही घरे नाकारली, तर आंदोलन करू. प्रत्येकाने एकमेकांना समजून घेतले पाहिजे, म्हणजे अशी वेळ येणार नाही.
शिवसेना-भाजप युतीत संवाद होत नाही. उध्दव ठाकरे राजकारणी नव्हेत, ते कलावंत मनाचे आहेत?
- राजकारण कोणीही करतो. कलावंत रक्तात असावा लागतो.पैशाने राजकारण करता येते. कला नाही. मी कलावंताचा मुलगा आहे, याचा मला अभिमान वाटतो. शिवसेनेचे साम्राज्य ही एका कलावंताच्या कुंचल्याची किमया आहे. आम्ही दसऱ्याच्या दिवशी आजही कुंचल्याची पूजा करतो. राजकारण्याकडे मनच नसते, कलावंताला मन व संवेदना असते. त्या चांगले काही करू शकतात.
नारायण राणे भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे?
- मी अजूनही माणूस शोधतोय, की जो केमिस्टकडे जाऊन डोके दुखण्याची गोळी मागेल.
महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ असेल, तर केंद्रात शिवसेना छोटा भाऊ असेल, हे अलिखित कराराचे समीकरण बदलेल का?
- अजून लोकसभा व विधानसभा निवडणुकीला अवकाश आहे. आपण जागावाटपाला महत्व द्यायचे की निवडून यायला. कोणाची किती ताकद वाढली आहे, हे डोळ्याला दिसत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी हाव धरून राहणारे खूप आहेत. पण त्यांना मुख्यमंत्री बनविणाऱ्यांची कोणाला पर्वा आहे. माझी ताकद मी जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक वापरण्याचे ठरविले आहे.
शिवसेना-भाजप युती तुटली, तर शिवसेना स्वबळावर सत्ता मिळवू शकते?
- युती तुटेल, असे वातावरण सध्या नाही व तसे आमच्या मनातही नाही.
युतीत तणाव असताना भाजपच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युतीसाठी बैठका झाल्या होत्या. अशा मित्रावर विश्वास ठेवून सत्ताधारी आघाडीला पराभूत करणे सोपे आहे?
- राजकारणात कोण खरे बोलते व किती खोटे हे कोणी सांगू शकत नाही. एक व्यक्ती म्हणजे पक्ष होऊ शकत नाही. आमचा जनतेवर अधिक विश्वास आहे. बाकीचे विषय गौण ठरतात. आजचा महाराष्ट्र हा गुंडागर्दीचा आहे. शेतकऱ्यांचा राहिलेला नाही. घुसखोरांचा झाला आहे. सत्ता असताना बांगलादेशींना आम्ही सरहद्दीवर नेऊन सोडत होतो. मला बॉंबस्फोटांची चिंता असून तिकडे कोणी बघत नाही. एमआयडीसी बंद आहेत. कारखाने बंद पडताएत. एसईझेडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. तुम्हाला खुर्ची हवी आहे ना, मग फर्निचरच्या दुकानातून खुर्ची आणून त्यावर मुख्यमंत्री म्हणून बसा. कोणी विचारायला येणार नाही.
गोपीनाथ मुंडे अनुभवी राजकारणी आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी ते जीवतोड प्रयत्न करणार. हे शिवसेनेसाठी त्रासदायक नाही का?
- याची उत्तरे निवडणुकीनंतरच मिळतील.
शिवसेनाप्रमुखांनी सर्वस्व मानून कोणतीच प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली नाही किंवा प्रशासकीय पद स्वीकारले नाही. तुम्ही मुख्यमंत्रीपद घेणार का?
- मी पंतप्रधान, मुख्यमंत्री अशी कोणतीही वैयक्तिक स्वप्ने पहात नाही. स्वप्नांना कोणताही आधार नसतो. भलीभली माणसे स्वप्नातून कधी जागी झालीच नाहीत व अशीच संपून गेली.
महाराष्ट्र समृध्द करावयाचा असेल, तर प्राधान्याने करावयाच्या कोणत्या बाबी आहेत?
- शहरे पाहिली, तर मुलांच्या शिक्षणापासून प्रश्न सुरू होतो. चांगल्या शाळेत मुलांना प्रवेश देणे, शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयात प्रवेश आणि पदवीनंतर नोकरी मिळवून देणे, हे शहरी प्रश्न झाले. शेतीबाबत विचार करायचा झाला, तर एकाने विचारले तुम्ही शेतकरी-शेतकरी म्हणत आहात, तुमच्याकडे काय योजना आहेत? मला तर शेतीतील काही कळत नाही. माझ्यावर विरोधक तसाच आरोप करतात. ते खरेच आहे की मी शहरी बाबू आहे. पण ग्रामीण भागात वीज भारनियमनाचा मोठा प्रश्न आहे. दिवसभर वीजच नसते. मुलांना घरी अभ्यास करायचा असेल तर वीज नाही. शुभंकरोती कल्याणम, ही आपली परंपरा आहे. पण दिवेलागणीला घरी वीज नाही.
यातून कसा मार्ग काढणार? दूरदृष्टी असलेली व हे बदलू शकतील अशी माणसे तुमच्याकडे आहेत?
- निश्चित आहेत. तुम्हाला किंवा मला ते ज्ञान असले पाहिजे, हे आवश्यक नाही. पण ते तिथपर्यंत पोचले पाहिजेत. प्रश्न सोडवायचे असतील, तर तशी धमक असली पाहिजे.
जुन्या काळात सी.डी. देशमुख, रामभाऊ म्हाळगी, बॅरिस्टर नाथ पै, मधू दंडवते, असे अभ्यासू राजकीय नेते होते. त्या ताकदीचे नेते आज कुठे आहेत?
- ही जबाबदारी नेतृत्वाची, म्हणजे माझीच आहे. मी कराडला गेलो होतो व यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन घेऊन बाहेर आलो. गर्दीत एक यशवंतरावांचा कार्यकर्ता भेटला. तो म्हणाला, मी गेली 40 वर्षे कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिलो, पण पक्षाने आमच्या पदरात दगडधोंड्यांशिवाय काही घातले नाही. मी आता तुमचे काम करणार आहे. तुम्हीच आता परिवर्तन करू शकाल. गेल्या निवडणुकीच्या वेळी आमच्याकडे कोण होते? कर्जमुक्ती व मोफत वीजेचे आश्वासन आम्ही दिले होते.त्यावेळी आमच्याकडे कोण होते? त्यापूर्वी म्हणजे 1995 मध्ये सत्ता मिळाली, तेव्हाही आमच्याकडे कोण होते? कृष्णा खोऱ्याचे काम आम्हीच मार्गी लावले होते. कलाकाराचे मन असलेल्या शिवसेनाप्रमुखांचे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे स्वप्न सुदैवाने नितीन गडकरी यांनीच पार पाडले.त्यावेळी शिवसेनाप्रमुखांना प्रशासनाचा कुठे अनुभव होता.? आयटीपार्क झाले. वांद्रे-वरळी सागरीमार्गाचे भूमीपूजन शिवसेनाप्रमुखांनीच केले.
हिंदुत्व ब्रॅंडची ताकद प्रचंड होती व केंद्रात सरकार आले. हिंदुत्वाच्या ब्रॅंडखाली आता काय कामे सुरू आहेत?
- ज्या ज्या वेळी देशावर संकटे आली, त्यावेळी महाराष्ट्रातून कोणीतरी उभा राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वा.सावरकर, डॉ. हेडगेवार अशी उदाहरणे आहेत. हिंदुहृदयसम्राट म्हणून जे देशात ओळखले जातात, ती अस्सल मराठी व्यक्ती आहे. हिंदुत्व व मराठी या गोष्टी वेगळ्या नाहीत. कॉंग्रेसने ज्या जातीपातीच्या भिंती उभ्या केलेल्या आहेत, त्या आता हळूहळू तुटायला लागल्या आहेत. आपण मराठी म्हणून उभे राहतो, पु. ल. देशपांडे यांच्या वाड्मयातही याचे उल्लेख आढळतात की, त्याच मराठी माणसाचे कोळ्याचे कोष्ट्याशी, कुणब्याचे तेल्याशी जमत नाही. याला जबाबदार कोण?
हिंदुत्वासाठी मराठी माणसाने लाठया खाल्या, रक्त सांडले. हिंदुत्वाच्या लाटेचे क्रीम उत्तर भारतीय, बिहारी लोंढे व जैन लोकांनी खाल्ले. याबाबत काय म्हणाल?
- मी माझ्या पक्षाची जबाबदारी पार पाडतो आहे. सर्व पक्षीयांनी त्याकडे पाहिले पाहिजे.
महापालिका आयुक्तांनी आदेश काढूनही अनेक आस्थापनांनी मराठी पाट्या बदलल्या नाहीत. शिवसेना रस्त्यावर उतरून याला उत्तर देणार की नाही?
- ही जबाबदारी घ्यायला मी तयार आहेच. त्याबाबत मला लाज वाटण्याचे कारण नाही. मी शांत, संयमी आहे, असे माझ्यावर आरोप आहेत. हे करायला आम्ही मागेपुढे पहात नाही. पण ज्यांना सांगून कळत नाही, त्यांना कायद्याचा बडगा आहे. प्रशासन असमर्थ ठरले तर शिवसेना आहेच.
शिवसेनेचे किती खासदार व आमदार निवडून येतील?
- जेवढ्या जागा शिवसेना लढवेल, तेवढ्या सगळ्या जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार. मी शिवसेनेचा कार्याध्यक्ष व शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून आकाश पाताळ एक करीन. रात्रंदिवस मेहनत करीन. शिवसेना-भाजप युतीचा भगवा लोकसभा व विधानसभेवर या निवडणुकीत फडकावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.
नारायण राणे यांना शिवसेनेतून काढले. वेगवेगळ्याप्रकारचे आरोप त्यांनी जाहीररीतीने केले. त्यांची माणसे पक्षातून गेली. या काळात मनाचा समतोल कसा टिकविला?
- आमच्या कुटुंबियांनीही माझ्यावर आरोप केले होते. असा शत्रू कोणाला लाभला नसेल. शिवसैनिकांचे ऋण मी जन्मोजन्मी विसरू शकणार नाही. शिवसेनाप्रमुख माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मी खरा आहे की खोटा आहे, ते त्यांना माहीत आहे. त्यांनी मला खंबीरपणे सांगितले, तुझी भूमिका बरोबर आहे, एक ना एक दिवस जनता तुझ्या पाठीशी आल्याशिवाय राहणार नाहीत. माझी पत्नी रश्मीचे पाठबळ मिळाले. मुलगा आदित्य त्यावेळी दहावीत होता. तो शाळेत जात होता. अभ्यास काय करतोय, पेपर कसा गेला, हे मी विचारू शकत नव्हतो. संजय दत्त खलनायक म्हणून लोक विसरले होते. खलनायक म्हणून रोज वृत्तपत्रांतून माझेच नाव येत होते. दुसरा मुलगा तेजस हाही त्यावेळी पेपर वाचत होता, टीव्ही पहात होता. त्यांनी माझ्यावर विश्वास व धीर दाखविला . दुर्देवाने आता शाळा-महाविद्यालयातील मित्र राहिले नाहीत. महाविद्यालयातील मित्र संजय सुरे हा माझ्यासोबत अजूनही आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी याकाळात तुम्हाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साथ दिली?
- शिवसेनेला जशास तसे आक्रमकपणे उत्तर द्या, असे ते गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या बैठकीत बोलले आहेत. मी लहान मुलांच्या टीकेकडे लक्ष देत नाही, असे ते मध्यंतरी बोलले होते. आता शिवसेनेकडे लक्ष द्या सांगितले आहे.
तुम्ही राजकारणापेक्षा कलेत अधिक रमता?
- कला हा मला लाभलेला वारसा समजतो. दुर्देवाने मी कलेला आता जास्त वेळ देऊ शकत नाही. चित्र काढायला मला आवडते. पेटिंग व फोटोग्राफीची आवड आहे. चांगल्या पेंटिगची तारीफ करायची वृत्ती आहे. फोटोग्राफीवर टीका झाली होती. त्यावर मी सांगितले होते, की माझ्या छंदाचे दिवसाढवळ्याही प्रदर्शन करू शकतो. तुमच्या छंदाचे करता येत असेल, तर करा.
तुम्ही मुख्यमंत्री होणार?
- विचार केलेला नाही. मुख्यमंत्रीपद जेवढे वाटते, तेवढे सोपे नाही. लाखो लोक ज्या विश्वासाने येतात, ती मोठी जबबदारी आहे. लोक ज्या अपेक्षेने शिवसेनेकडे पाहतात ती पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही.
मुंबईत छटपूजा झाली पहिजे की नाही?
- यावर सर्व राजकीय पक्षांनी बोलले पाहिजे. एका पक्षाला कात्रीत पकडून चालणार नाही. याबाबत बोलताना आपण आपली कंपनी व व्यवसायापासून सुरवात केली पाहिजे. आपली बांधकाम कंपनी असेल, तर तिथे गवंडी मराठी पाहिजे. तो बिहारी किंवा परप्रांतीय चालतो आणि मग छटपूजेला विरोध करतो! यासाठी स्पष्ट भूमिका पाहिजे. विरोध करायचा असेल, तर स्वतःपासून आचरण सुरू केले पाहिजे. माझे सहकारी व कंपन्यांमधील व्यक्ती अमराठी चालतात. मी बांधकाम व्यावसायिक असेल, तिथे अमराठी चालतात आणि राजकारण म्हणून मी विरोध करतो. आधी तिकडे मराठी कर, मग छटपूजेच्या विरोधाला मी पाठिंबा देईन. माझ्यात शांत, संयमीपणा आला आहे, ही माझ्या मॉं ची देणगी आहे. तिचे ऋण व आशीर्वाद मला नेहमी जाणवत असतात. म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.
(शब्दांकन - उमाकांत देशपांडे)
--------------------------------------------------------------------------------------
उद्याची मुलाखत - राज ठाकरे
"मराठीचा मुद्दा घेतला तर अन्य भाषिकांची मते जातील, ही भीती राजकीय पक्षांना असल्याने राजकारणात मी अस्पृश्य आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाबरोबर निवडणुकीसाठी युतीबाबत मी विचारही केलेला नाही.''
- राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्वर्यू. मराठी माणसाच्या प्रगतीचा मुद्दा घेऊन ते राजकारण करू इच्छितात, त्यांना यशाची घाई नाही; परंतु खात्री आहे. आपल्या ठाकरी शैलीत त्यांनी दिलेली मुलाखत "साम' वाहिनीवर रंगली.
ता. 3 सप्टेंबर, रात्री 9.30
--------------------------------------------------------------------------------------------
तुम्ही राज ठाकरे यांना प्रश्न विचारू इच्छिता? टाइप करा pun1 (स्पेस) तुमचा प्रश्न आणि पाठवा 54321 वर. (एअरटेल मोबाईलधारकांनी 56666 ला एसएमएस करावा)
(एसएमएससाठी ऑपरेटरनुसार एक ते तीन रुपये खर्च येईल)
1 comment:
"राजकारण कोणीही करतो. कलावंत रक्तात असावा लागतो.पैशाने राजकारण करता येते. कला नाही. मी कलावंताचा मुलगा आहे, याचा मला अभिमान वाटतो. शिवसेनेचे साम्राज्य ही एका कलावंताच्या कुंचल्याची किमया आहे. आम्ही दसऱ्याच्या दिवशी आजही कुंचल्याची पूजा करतो. राजकारण्याकडे मनच नसते, कलावंताला मन व संवेदना असते. त्या चांगले काही करू शकतात."
Samvedansheel Rajakarani manasachich aaj maharashtrala garaj aahe.
Post a Comment