+f.jpg)
स्वार्थ आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या वातावरणात राज्य आणि देश भ्रष्टाचारमुक्त

महाराष्ट्रासंबंधी तुमची स्वप्नं काय?
- महाराष्ट्रातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी व्हावी. काही माणसं खाण्यासाठी जगतात आणि काही माणसं जगण्यासाठी खातात. काही माणसं काय काय खावं, यासाठी जगतात आणि काही माणसांना जगण्यासाठी काय खावं, हा प्रश्न असतो. आर्थिक आणि सामाजिक विषमतेची दरी वाढत चालली आहे. ती महाराष्ट्राला धोकादायक आहे. विषमता कमी करायची असेल, तर राजकारणी, समाजातील घटक सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. स्वातंत्र्याची ६१ वर्षे झाली. हा कृषीप्रधान देश आहे. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना काय कारणं असतील? शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतीवर खर्च केला, तेवढी किंमत तरी मिळावी. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती किती वाढल्या आहेत. तेवढ्या पटीने शेतीमालाच्या किंमती का वाढत नाहीत?
तुम्ही नुकत्याच बाळगलेल्या मौनव्रताचं कारण काय होतं?
- सरकारच्या विरोधात मौन नव्हतं. शरीरस्वास्थासाठी दीड महिना मौनात गेलो. अनेकदा पत्रव्यवहार झाले. पण सरकारमधील विविध खाती, अधिकारी, पदाधिकारी यांना जाणीव झाली नाही. म्हणून १५ ऑगस्टपासून उपोषण करायचं ठरवलं आणि सरकार जागं झालं. नद्यांमधील अमर्याद वाळू उपशाचा पर्यावरणाला धोका आहे. पण कोणी विचार करायला तयार नाही. हा प्रश्न बैठकीत आल्यावर याप्रकरणी धोरणात्मक निर्णय होईपर्यंत नवीन परमीट कोणाला द्यायचं नाही, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. नद्याकाठच्या गावांमधील वाळूत पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे. नद्याकाठची गावं हिरवीगार होती, ती सुकत चालली आहेत. जलसंधारणावर कोट्यावधी रूपये खर्च करतो. वाळूत नैसर्गिक जलसंधारण होतं. पण कोणाचं लक्ष नाही. प्रत्येक अधिकाऱ्याने आपली संपत्ती वेबसाईटवरून जाहीर करावी, अशी एक आमची मागणी होती. भ्रष्टाचार वाढत चालला आहे. अधिकारी बंद पाकिटातून हा तपशील सरकारला देतात. तो खुला केला पाहिजे. पतसंस्थांमध्ये गरीब, कष्टकरी, मोलकरीण यांच्या घामाचा पैसा आहे. पण पतसंस्थांच्या संचालकांनी हा पैसा दिवसाढवळ्या लुटला. आपसात पैसे वाटून घेतले. सरकारने लायसन दिलं, म्हणून लोकांनी ठेवी ठेवल्या. त्यामुळे तुम्ही ती रक्कम द्या, असं आमचं म्हणणं आहे.
कोणत्या मंत्र्यांवर तुमचा आक्षेप आहे?
- सहकारामध्ये १३ महिने आमचं आंदोलन झालं. प्रत्येक तालुक्यात सहकार खात्याचे अधिकारी आहेत. हजारो कोटी रूपयांचा गैरव्यवहार त्यांना दिसला नाही का?अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. प्रत्येक खात्यात काही ना काही गोंधळ आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बऱ्याच मंत्र्यांवर नाराजी आहे?
- सहकार खातं कॉंग्रेसचं आहे. जलसंधारण खातं कॉंग्रेसच्या थोरातांकडे आहे. कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी असा प्रश्न नाही. समाज, राज्य व राष्ट्र यांच्यासाठी विघातक कार्य करणारं कुठलंही खातं, अधिकारी किंवा मंत्री असेल... मी त्याविरूध्द बोलत आहे.
मंत्रालयात सामान्य माणसाला प्रवेशासाठी खूप कष्ट करावे लागतात. तुम्हाला दाद मिळते का?
- हो. सुरवातीला मिळत नव्हती. पण आता महाराष्ट्रात जनशक्तीचा दबाव निर्माण झाला आहे. जनतेला आंदोलनाचे महत्व कळले. जनता एकत्र येत गेली आणि संघटन झालं. पाच कायदे सरकारला करावे लागले. माहितीचा अधिकार, दफ्तरदिरंगाई, बदल्यांचा कायदा हे कायदे लोकशाहीसाठी व राज्यासाठी महत्वाचे आहेत. माहितीच्या अधिकाराचा कायदा महाराष्ट्रात आला आणि भारत सरकारलाही करावा लागला.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे तुम्ही कसे बघता?
- या दोघांच्याबद्दल माझ्या कानावर वेड्यावाकड्या गोष्टी आल्या नाहीत. पण सरकार चालवायचं म्हटलं तर "पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाए जैसा'... सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत वैयक्तिक भ्रष्टाचार किंवा चारित्र्याबद्दल माझ्यापर्यंत तक्रारी आल्या नाहीत. समाजाचं हीत साधायचं असेल, तर काही वेळा कठोर बनावं लागतं. दोघांवर माझा विश्वास आहे. सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे. पण ते वैयक्तिक सहभागी असल्याचे मला दिसलं नाही.
राज ठाकरे यांच्या मराठीच्या मुद्द्यावरील आंदोलनाबाबत तुमचं मूल्यमापन काय?
- राज ठाकरे यांना तरूणांची भाषा कळते. त्यामुळे महाराष्ट्रातील तरूण उभा राहत आहे. राज्याचे भवितव्य तरूणच घडवितील. काही गोष्टींचं तारतम्य ठेवावं लागेल. वैयक्तिक चारित्र्याला जपावं लागेल. शुध्द आचार, शुध्द विचार, निष्कलंक जीवन असेल, त्याला महत्व येते. महाराष्ट्राबद्दल ज्यांना तळमळ आहे, त्यांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात येऊन तोडफोड करणाऱ्यांचा व राज्याचं नुकसान करणाऱ्यांचा नाही. एकसंघ भारत निर्माण करायचा मग महाराष्ट्र माझा म्हटलाच पाहिजे. राजचं आंदोलन काही प्रमाणात बरोबर आहे. मात्र त्याला तोडफोड, जाळपोळ याबाबतीत बंधन घालावं लागेल. शेवटी स्वातंत्र्य मिळविताना जहाल व मवाळ असे दोन गट होते. मवाळांना वाटत होते, जहाल गटाचा मार्ग बरोबर नाही. जहाल वागल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, हे दुसऱ्या गटाला वाटत होते. त्यानुसार ते वागले.
राजबद्दल विश्वास आहे का?
- राजबद्दल विश्वास आहे. त्याला थोडी सुधारणा करावी लागेल. कार्यकर्ते आणि तोडफोड-जाळपोळ या भूमिकेत सुधारणा झाल्यावर अशा तरूणांच्या पाठीशी उभं राहिल्यास दोष नाही. देशाच्या व राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा तरूणांच्या पाठीशी उभं राहावं लागेल.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आर. आर. पाटील आणि छगन भुजबळांबाबत तुमचे ऍनालिसीस काय?
- छगन भुजबळ यांच्याशी जवळून परिचय आला नाही. आर.आर. पाटील यांच्याबाबत जवळून परिचय आला. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदेंबाबत मला जे जाणवतं, तसंच आर. आर.... ते चांगले कार्यकर्ते आहेत. देश, राज्य चांगलं चालवायचं असेल, तर अशा लोकांनी विधानसभेत, लोकसभेत गेलं पाहिजे. गुंड, भ्रष्ट लोक तिथं गेले आहेत.
नावं सांगा?
- ते माझ्यावर न्यायालयात बदनामीचे खटले भरतील. मी घाबरत नाही. पण ज्यावेळी वेळ येईल, तेव्हा मी सांगेन. लोकसभेत काही लोकांना अटक झाली. नोटांचं पुडकं टीव्हीवर पाहिलंत ना?
भाजपमधील गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्याबाबत मत काय?
- भाजपमधील काही नेते चांगले आहेत. या दोन नेत्यांशी जवळचा संबंध आला नाही. युती सरकार असताना उणीव दिसली होती, ती दूर करण्याचा प्रयत्न केला. तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे की, पुढारी गावी जे जे करी, ते लोक करती घरोघरी. मला समाजाला घेऊन जायचे आहे, हे पुढाऱ्याने समजले पाहिजे.
शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांच्याबद्दल मत काय?
- त्यांच्याशी माझी भेटही झाली नाही.
उध्दवजींचे एकंदर राजकारण, समाजकारण याबद्दल अंदाज काय?
- बाळासाहेबांची पुण्याई आहे, त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्याचा लाभ उध्दवजींना मिळत आहे. त्यांची परंपरा पुढे चालविण्याची आवश्यकता आहे. राज पूर्वी बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला. बाळासाहेबांना तरूणाईची भाषा कळते, ती त्याला कळते. उध्दवजींशी भेटायचं ठरलं होतं. पण झाली नाही. तरूणांना दिशा मिळाली, तर राज्याला व समाजाला उज्ज्वल भविष्य आहे. तरूणांना कार्यक्रम देणं गरजेचं आहे.
उर्जा, शेतकरी, औद्योगिक विकास, सेझ आदी प्रश्नांबाबत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार यशस्वी झालं आहे?
- पक्षाला धोरण असलं पाहिजे आणि पक्षातील प्रत्येकात ते भिनले पाहिजे. उदाहरणार्थ पर्यावरण. आज प्रत्येक पक्ष मताचा विचार करतो, समाज आणि राष्ट्राचा नाही. सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता याभोवती ते फिरत आहेत. हिंदू व्यक्ती मेली, की चार लोक तिरडीवर नेतात. मुसलमानाला पेटीतून नेतात. ख्रिश्चनाला बॉक्समधून नेतात. बऱ्याच राजकारण्यांना आज वाटतं, की स्मशानात जातानाही खुर्चीत बसून गेलं पाहिजे!
हिंदुत्वाबद्दल मत काय?
- सर्व धर्माच्या मुळाशी गेलं, की एकच धर्म सांगतो, मानवता धर्म. तो शेजारधर्मापासून सुरू होतो. स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे कट्टर अनुयायी होते. त्यांनी अमेरिकेत प्रचार केला. जो धर्म विधवांचे अश्रू पुसत नसेल, भुकेल्याची भूक मिटवत नसेल, तो धर्म मी मानत नाही, असं ते म्हणत असत.
उत्तरप्रदेश व बिहारी लोक महाराष्ट्रात दादागिरी करतात. जैन लोक महाराष्ट्रीयन लोकांना घरे नाकारतात,याबाबत मत काय?
- महाराष्ट्रात राहणाऱ्या, कुठल्याही जातीधर्माच्या प्रत्येकाला राज्याबद्दल आपुलकी पाहिजे. त्यात राष्ट्र सामावलं आहे. मतभेद देशाला घातक आहेत. उत्तरप्रदेश, बिहारी लोंढ्यांनी इथं दादागिरी करणे चुकीचे आहे. मोठ्या संख्येने एका भागात रहायचं, निवडणूक लढवायची आणि निवडून यायचं आणि कब्जा मिळवायचा, हे घातक आहे.
भ्रष्टाचाराविरूध्दचा तुमचा लढा म्हणजे दगडावर डोके आपटण्याचा प्रकार नाही का?
- शंभरटक्के भ्रष्टाचारमुक्ती होणार नाही. प्रभू रामचंद्र, ज्ञानेश्वर- तुकारामांच्या काळातही भ्रष्टाचार होता. पण प्रयत्न केला तर ७०-९० टक्के मुक्तीपर्यंत जाता येईल. आज २५-३० टक्क्यांपर्यंत गेलो आहोत. माहितीच्या अधिकारामुळे भ्रष्टाचाराला मोठा ब्रेक लागला आहे. मला खात्री आहे, पाच कायदे केले आहेत. आणखी काही कायदे झाले, तर ७० टक्क्यांपेक्षा अधिक भ्रष्टाचार मोडून काढता येईल.
गरीब राजकारणी आहेत का? बरेच श्रीमंत राजकारणी असून त्यांचा व्यवसायही कळत नाही?
- हे गणित सुटू शकतं. अधिकाऱ्यांनी मालमत्ता जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. नेत्यांनी निवडणुकीच्या वेळी कागदावर मालमत्ता जाहीर केली. पण लोकशिक्षण झालं नाही. त्यांची मालमत्ता कशी वाढते, याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जनतेचे सेवक आहेत, जनता देशाची मालक आहे, हेच कळलेलं नाही. त्यामुळे मालक सेवक बनले आणि सेवक मालक बनले!
मोठ्या शहरांमध्ये जमिनींचे मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत आहेत. नेत्यांना त्यात पैसे मिळतात. या शक्तीपुढे सामान्य माणूस काय करणार?
- सामान्य माणसाला संघटित केलं तर फार मोठं काम करू शकेल. मला एक दिवस सोडून जायचंय, माझ्याबरोबर काही येणार नाही, हे राजकीय नेते विसरले. सत्ता आणि पैशांच्या नशेत एवढे बेहोश झाले आहेत, की लोक काय म्हणतात, त्याकडे लक्ष नाही. त्यासाठी जनतेला संघटित करणं गरजेचं आहे.
जनता हतबल आहे...
- हे आतापर्यंत वाटत होतं. पण मला अनुभव आहे. आंदोलन सुरू केलं. मी आठ बाय दहाच्या खोलीत राहतो. माझ्याकडे धन, संपत्ती, पैसाअडका, सत्ता नाही. राज्यातील प्रत्येक तालुक्यात चांगले कार्यकर्ते उभे राहिले आहेत. सरकारचं नाक दाबलं की तोंड उघडेल. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार करीत असतील, तर जनमताचा दबाव वाढविला पाहिजे. हा एकच पर्याय शिल्लक आहे.
तुम्हाला सर्व सुखांचा त्याग करून आयुष्य जगावं लागलं...
- ही भारताची संस्कृती आहे. ती नेहमी त्याग शिकवत आलेली आहे. त्यात खरा आनंद आहे. धनदौलत नाही, पण मला आनंद अनुभवता येतो.
तुम्हाला आमिष दाखविण्याचा प्रयत्न झाला होता का?
- मी पहिल्यापासूनच चारित्र्याला जपले आहे, त्यामुळे लाच देण्याची कोणाला हिंमत झालेली नाही.
महाराष्ट्र कोणाच्या हाती सुरक्षित राहील?
- महाराष्ट्रातील जनतेने संघटित होणं गरजेचं आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार म्हणून वागत असतील, तर जनतेने त्याविरोधात उभं राहिलं पाहिजे. तरच महाराष्ट्र वाचेल.
असं कोण करू शकतं?
- आम्ही काही नसताना थोडं काही उभं करू शकलो. महाराष्ट्रात तरूण पुढे येत असून आशेचा किरण दिसत आहे. पुढाऱ्यांवर वचक निर्माण करू शकतो.
तुमचा उत्तराधिकारी कोण?
- पुढं आलेली खूप मुलं आहेत. राज्यातील गावांगावांतून दुसरी फळी उभी आहे. अण्णा हजारे यांच्यानंतरही हे काम सुरू राहील, यासाठी प्रशिक्षण सुरू आहे.
तुम्हाला परिस्थितीचं शल्य वाटतं का?
- कधीच नाही. तुम्ही जीवनात ध्येय ठेवत नाही, तेव्हा शल्य वाटतं. कुणीतरी करतं म्हणून आपण करायचं. अपयश आलं, की शल्य येतं. कर्मण्येवाधिकारस्ते... ही ईश्वराची पूजा आहे. त्यात यश येवो की अपयश.... विचाराने काम करतो. अनेक यशापयशाचे प्रसंग गेल्या ७० वर्षात आले. तरी थकवा नाही, नैराश्य नाही. जगायचं ते जनहितासाठी आणि मरायचं तेही जनहितासाठी, हे ध्येय मी ठरविलं आहे.
तुमचा बॅंकबॅंलन्स किती?
- तीन हजार रूपये पेन्शन मिळते. ती वाटून टाकतो. आतापर्यंतचा ३० ते ३२ हजार रूपये बॅंक बॅलन्स आहे. मला २५ लाख रूपयांचे पुरस्कार मिळाले, त्याचा ट्रस्ट केला. त्याचे वर्षाला दोन लाख रूपये व्याज येते. ते समाजाच्या कामासाठी खर्च करतो.
जगायला किती पैसे लागतात?
- काही पैसे लागत नाहीत. ते राजकारण्यांना कळत नाही. हे कळलं असतं, तर महाराष्ट्र देशाचा हेडमास्तर झाला असता! पैसा आणि सत्ता यात राजकारणी गुरफटून गेले आहेत. देश नेहमी त्याग शिकवत आला आहे. दाण्याने भरलेले कणीस पहायला एका दाण्याला त्याग करावा लागतो, जमिनीत गाडून घ्यावे लागते. त्यांना वाटते दाणा नष्ट होतो. मी माडीत आणि गाडीत फिरतो, मग गाडून कशाला घ्यायचं, असं त्यांना वाटतं. स्वतःसाठी जगणारी माणसं कायमची मरतात, इतरांसाठी मरणारी माणसं कायमची जगतात!!
प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अनुभव काय?
- राजकारणी आणि अधिकारी यांची युती झाली आहे. राष्ट्रपतींनी निवड केल्यावर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी राष्ट्र बलवान करण्याची शपथ घेतली आहे. पण ते विसरले. हे एकत्र आले, तर ६१ वर्षात जे झालं नाही, ते घडविता येईल. काही अधिकारी चांगले आहेत. समविचारी एकत्र आले, तर चांगलं काम होईल.
महाराष्ट्रात तातडीने कोणता बदल हवा वाटतो?
- प्रशासकीय अधिकाऱ्यांना दंडात्मक अधिकार आहेत. तलाठी किंवा ग्रामसेवकाचा गैरव्यवहाराबद्दल पुरावे दिल्यावरही तहसीलदार कारवाई करीत नाही. वरिष्ठ स्तरावर जायला सांगतो. आपली जबाबदारी पार न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचण्याचा अधिकार जनतेला देण्याचा कायदा करावा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत त्यांनी मागितली आहे. दुसरा रस्त्यांचा प्रश्न. एक वर्षात रस्ता वाहून जातो. कंत्राटदारांशी पाच-सात वर्षांचा करार करा आणि त्यांच्यावर खड्ड्यांच्या दुरूस्तीची जबाबदारी काम देतानाच टाका. सत्तेचं विकेंद्रीकरण होणंही गरजेचं आहे.
तुम्ही समांतर सरकार आहात का?
- त्याने काहीही उपयोग नाही. समांतर सरकारमध्ये धोके आहेत. राज्य आणि देशाबद्दल तळमळ असलेल्या कार्यकर्त्यांचं संघटन झालं पाहिजे. नाहीतर रिमोट कंट्रोलसारखं होईल. ते धोकादायक आहे! राष्ट्रापेक्षा पक्षाला आणि पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व आलं. पुढील काळात त्याने संस्थानिक तयार होतील. हा राष्ट्राला धोका आहे. व्यक्तीपेक्षा पक्ष आणि पक्षापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे.
महाराष्ट्र कोणाचा?
- महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्याला राज्याबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आहे, त्या प्रत्येक नागरिकाचा हा महाराष्ट्र.
सध्याचे राज्यकर्ते राज्य करायला लायक आहेत का?
- मी राज्यात फिरत असताना लोक बोलतात, असल्या सरकारांपेक्षा इंग्रजच बरे! हे दुर्देव आहे! पुढाऱ्यांबद्दल तिरस्कार निर्माण होणे, हा फार मोठा दोष आहे.
मतदारांचं शहाणपण आणि त्यांच्याबद्दलच्या आशा जिवंत आहेत का?
- होय. गुंडांना, व्यभिचा-यांना, भ्रष्टाचाऱ्यांना मत देऊ नका, असं आवाहन मी नेहमी निवडणुकीच्या वेळी करत असतो आणि त्यासाठी राज्यात फिरत असतो. ते त्यांना पटत आहे. जीवनात नैराश्य पत्करण्यापेक्षा मरण हातावर घेऊन परिस्थितीशी झगडत राहिलं पाहिजे. तरच पुढं जाऊ शकू.
(शब्दांकन -उमाकांत देशपांडे)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
उद्या पाहा - राजू परुळेकर यांनी केलेले विश्लेषण.