
कॉंग्रेसमध्ये नारायण राणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये छगन भुजबळ आणि

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजप महाराष्ट्रात किती मजबूत आहे?
- लोकसभेच्या दृष्टीने भाजप एक क्रमांकाचा पक्ष आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत 13 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकांमध्ये केंद्रात व राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता निश्चितच येईल.
तुम्ही भाजपला बहुजनांमध्ये नेले. मात्र तुम्हाला पदांचे राजीनामे द्यावे लागले आणि राज्यात व देशात वादळ निर्माण झाले. नेमके काय झाले होते?
- महाविद्यालयीन जीवनापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होतो. विचारांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची माझी पध्दत आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग येतात. पक्षाच्या कार्यपध्दतीबाबत माझी काही नाराजी होती.
प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर पक्षात तुमची मानखंडना झाली का?
- ते असताना कोणताही प्रश्न मला आडवा आला नाही. मला कुठलाही त्रास जाणवला नाही. ते माझ्या पाठीशी ताकदीने उभे होते. ते गेल्यावर केंद्रात व राज्यात काही लोकांशी संवाद करताना निश्चितच काही अडचणी निर्माण झाल्या होत्या.
लढाऊ व बलदंड नेते गोपीनाथ मुंडे व छगन भुजबळ यांच्यात काही गुफ्तगू सुरू आहे का?
- आमच्यात काहीही गुफ्तगू सुरू नाही. आम्ही व्यक्तिगत मित्र आहोत. एकमेकांच्या दुःखात सहभागी होतो. कुठलेही राजकीय व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार नाही. आम्ही एकत्र येण्याची कोणतीही शक्यता नाही. पण आलो, तर राज्यात आम्हाला कोणीही पराभूत करणे शक्य नाही.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रतिभा पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा देण्याचा प्रश्न ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी होती का?
- त्यांनी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिल्यावरच प्रश्न निर्माण झाला. एवढा मोठा संघर्ष कधीच निर्माण झाला नव्हता. युती तुटण्यापर्यंत वेळ आली होती. पण सुदैवाने ती वाचली.
निवडणुकीत शिवसेनेला जास्त जागा द्याव्या लागतात. नवीन प्रयोग करण्याची धारणा का ठेवत नाही?
- राजकारण ही नवीन प्रयोग करण्यासाठी रंगभूमी नाही. राजकारण हे समाजाच्या परिवर्तनासाठी आवश्यक आहे. राज्यात भाजप किंवा शिवसेना एकट्याच्या ताकदीवर सत्ता मिळविण्याच्या परिस्थितीत सध्या नाही. लोकांना नको असलेले हे सरकार बदलण्यासाठी समविचारी पक्षांना बरोबर घेणे आवश्यक आहे.
केंद्रात मोठा भाऊ भाजप व राज्यात मोठा भाऊ शिवसेना, असेच जागावाटपाचे सूत्र असताना तुम्ही मुख्यमंत्री होणार कधी?
- केंद्रात भाजपच मोठा भाऊ आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची शक्ती थोडी अधिक असल्याने तो मोठा भाऊ आहे. मी मुख्यमंत्री होणे महत्वाचे नाही. राज्यात परिवर्तन व्हावे, हा महत्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्राला वैभवशाली राज्य घडविण्यासाठी ते आवश्यक आहे.
बहुजन समाजातील मोठ्या गटाला वाटते तुम्ही मुख्यमंत्री व्हावे? जागा कमी लढविल्या, तर तुम्ही कधीच मुख्यमंत्री होणार नाही...
- भाजप कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटणे साहजिक आहे. राजकारणात महत्वाकांक्षा ठेवणे गैर नाही. मलाही आपण मुख्यमंत्री व्हावे, असे वाटणे चुकीचे नाही. पण राजकारणात नुसते वाटण्यावरून यश मिळत नसते. त्यावेळची परिस्थिती, पक्षाची ताकद यावर अवलंबून असते. भाजप व शिवसेनेत 1995 मध्ये पाचसहा जागांचे अंतर होते. तरी त्यावेळी ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, असा निर्णय घेतला होता.
शिवसेनेचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उध्दव ठाकरे असण्याची शक्यता आहे. पण मुख्यमंत्रिपदासाठी प्रशासकीय अनुभव, वय, राजकारणातील कारकीर्द, समज यादृष्टीने तुम्ही ज्येष्ठ आहात. युतीचा उमेदवार तुम्हीच असला पाहिजेत?
- राजकारणात वय, ज्येष्ठता यानुसार काही मिळत नसते. ताकदीवर व कर्तृत्वावर ते मिळत असते. मुख्यमंत्रीपद मिळायला आमच्या पक्षाचीही तेवढी ताकद पाहिजे. आमचा पक्ष राज्यातील चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. एकेकाळी भाजप हा मूठभरांचा पक्ष म्हणून हिणवला जायचा. आता तो सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
वीज, शेतकरी आत्महत्या, सिंचन, औद्योगिक प्रगती, ढासळती कायदा व सुव्यवस्था स्थिती आदींना तोंड देण्यासाठी विरोधक म्हणून तुमचे नियोजन काय?
- देशात कोणत्याही राज्यापेक्षा सर्वाधिक म्हणजे एक लाख 56 हजार कोटी रूपयांचे कर्ज आपल्या राज्यावर आहे. राज्याला कर्जमुक्त करणे हे आपल्यापुढील आव्हान आहे. कुठलेही सरकार आले तरी त्याला कडवे निर्णय घ्यावे लागतील. करांची चोरी थांबविणे, उत्पन्नातील चोरी थांबविणे व राज्यात अधिकाधिक गुंतवणूक वाढवून कररूपाने उत्पन्न वाढविणे, याचा विचार करावा लागेल.
वीजेच्या प्रश्नाची जी फळे भोगत आहोत, त्या एन्रॉन प्रकरणाला मुंडे जबाबदार आहेत, असे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले आहे?
- हे सफेद झूट आहे. गोबेल्स तंत्राचा हा प्रचार आहे. मी जेव्हा उर्जामंत्री होतो, तेव्हा वीजटंचाई नव्हती व भारनियमन नव्हते. ज्यावेळी मी कारभार हातात घेतला, तेव्हा वीजमंडळाचा तोटा 1250 कोटी रूपयांचा तोटा होता. मी कारभार सोडला तेव्हा मंडळाला 250 कोटी रूपयांचा फायदा होता. आपण तमिळनाडूला 100 मेगावॉट, गोव्याला 50 मेगावॉट व कर्नाटकला रात्रीची वीज विकत होतो. त्यावेळी एका वर्षी वीजविक्रीतून 465 कोटी रूपये राज्याला मिळाले होते. मात्र सर्वाधिक वीजमागणीच्या काळात म्हणजे सायंकाळी 5 ते 8 यावेळेत मागणीपेक्षा उपलब्धता थोडी कमी होती. मागणी व पुरवठ्यात 500 मेगावॉटचे अंतर होते. त्यामुळे आठवड्यात एकदिवस भारनियमन केले जात होते. आता दिवसाला 18 तासांपर्यंत भारनियमन करावे लागत आहे. याला आपले पाप दुसऱ्याच्या डोक्यावर मारणारे नाकर्ते राज्यकर्ते जबाबदार आहेत. मी एन्रॉनला विरोध केला होता. पुन्हा चर्चा करून प्रकल्पातील वीज आणली व आठ महिने एन्रॉनची वीज वापरली. त्याचे बिल दिले. या राज्य सरकारने एन्रॉन प्रकल्प बंद केला. सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे की, एन्रॉनच्या वीजेची गरज नाही, म्हणून तो बंद करत आहोत. राज्यात वीजेची मागणी दरवर्षी 10 टक्क्याने वाढली. त्यांनी 9 वर्षात एक हजार मेगावॉटही वीजनिर्मिती न केल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य अंधारात गेले आहे.
भाजपवर संघाचा पगडा आहे आणि संघाचा चेहरा ब्राम्हणी व बनियांचा आहे...
- वास्तवात चित्र वेगळे आहे. आताचे सरकार दलित, आदिवासी व ओबीसीविरोधी आहे. या राज्यात खैरलांजी झाले. आई व मुलीची नग्न धिंड काढण्यात आली. नायगावमध्ये दलिताने सवर्णावर प्रेम केले, म्हणून त्याचे डोळे काढले. रामदास आठवले यांना मंत्री करू शकत नाही.? दलिताला 13 टक्के व आदिवासींसाठी 7 टक्के पैसे अर्थसंकल्पात राखून ठेवावे, हे गेल्या 9 वर्षात झालेले नाही. या सर्वांना न्याय देऊन आम्ही भटक्या विमुक्तांसाठी वेगळे खाते व ओबीसी महामंडळ निर्माण केले. आता मराठ्यांचे सरकार असून त्यात अन्य वर्गांना न्याय नाही. भुजबळांना स्थान नाही. सामाजिक न्याय नाकारला जात आहे. मागासवर्गीयांचे प्रश्न आतापर्यंत कधीच नव्हते. लोकांच्या मनात किती राग आहे, हे भुजबळांना विचारा.
पाडापाडीचे राजकारण याला तुम्ही निवडणुकीत कसे सामोरे जाणार?
- पक्षात यावे, ध्येयवादासाठी काम करावे, उमेदवारी करावी व नंतर पद मागावे, ही धारणा आता सर्व पक्षात संपली. पण भाजप हा केडरबेस्ड पक्ष आहे. निवडणूक न लढविता ध्येयवादासाठी काम करणारे असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत. देशात कॉंग्रेस व भाजपमध्ये सामना होईल. पण महाराष्ट्रात बहुरंगी लढत होईल. आताच पाच पक्ष असून त्यात एक-दोघांची भर पडेल. कॉंग्रेस-राष्ट्रवादीला बहुमत असताना विरोधकांना फोडून मंत्री करण्याची काय आवश्यकता होती. केंद्रातही पैसे देऊन खासदार फोडण्याची काय गरज होती. ?राजकारणाचे शुध्दीकरण करण्याचा विचार सर्वांनीच करण्याची वेळ आहे. तिकीटे न मिळाली, तर इकडून तिकडे जाण्याचे प्रमाण वाढेल.
नारायण राणे भाजपच्या मार्गावर आहेत का?
- ते कॉंग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. त्यांना मुख्यंत्रीपदाचे आश्वासन दिले होते का, ते सोनिया गांधी व राणे यांनाच माहीत असेल. तसे दिले असेल तर ते पाळावे लागेल. त्यांना सन्मानित केले नाही तर राणे कॉंग्रेस सोडतील. ते अपरिहार्य आहे. त्यांना भाजपमध्ये घेण्याचा प्रश्नच नाही. आम्ही शिवसेनेबरोबर आहोत.
राणे, भुजबळ व तुम्ही एकत्र येण्याची शक्यता आहे का?
- ही कविकल्पना आहे. शक्यता तशी वाटत नाही. भुजबळ व राणेंना वाटले, की पक्षात श्वास कोंडला आहे, ते बाहेर पडतील. तेव्हा कॉंग्रेस व राष्ट्रवादी एक होईल. आम्ही राणेंना पक्षात स्थान देणार नाही. शिवसेना-भाजप भुजबळांच्या बाबतीत मात्र विचार करू शकेल. पण ते येतील असे वाटत नाही.
शिवसेना- भाजप युतीला निवडणुकीत यश मिळणार का?
- त्रिशंकू विधानसभा ठेवावी, असा जनतेचा मानस राहिलेला नाही. आता स्पष्ट बहुमत देण्याकडे लोकांचा कल आहे. कर्नाटक, मायावती यांच्या उदाहरणावरून हे दिसून येते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 10 वर्षांच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. त्यामुळे आम्हालाच स्पष्ट बहुमत मिळेल, असा मला विश्वास आहे.
उत्तरप्रदेश, बिहार येथून मोठे लोंढे येतात. जैनांचा गट शाकाहाराच्या नावावर मराठी लोकांना घरे नाकारतो. यावर तुमचे मत काय?
- महाराष्ट्रात घर नाकारल्यास त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. परप्रांतियांचे लोंढे थांबविलेच पाहिजेत. नाहीतर, राज्याची प्रगती खुंटेल. मुंबईच काय दिल्लीत थडकणारे लोंढेही थांबविले पाहिजेत. सर्वांना आपण पाणी, रस्ते पुरवूच शकणार नाही. आधी 1995 पर्यंतच्या झोपड्या, आता 2000 च्या झोपड्यांना संरक्षण हे कधी ना कधी थांबविले पाहिजे.
खासगी सुरक्षा एजन्सीमध्ये अवैध परवाने घेऊन आलेल्या परप्रांतियांचा भरणा आहे. आयुक्तांनी आदेश काढूनही मराठी भाषेत पाट्या लावायला गुर्मीने नकार, याला तोंड कसे द्यायचे?
- ज्यांना सुरक्षा हवी आहे, त्यांना ती देण्यासाठी सरकारने स्वतः महामंडळ किंवा सुरक्षा एजन्सी सुरू करायला हवी. निवृत्त पोलिस, लष्करी किंवा निमलष्करी दले यातील लोकांचा त्यात समावेश केला पाहिजे. सुरक्षा एजन्सीसाठी गृहखातेच परवानगी देते. या एजन्सीत मराठी माणसे फारशी नाहीत. त्यात 80 टक्के स्थानिक लोकांना नोकरी देण्याची अटच घातली पाहिजे. मुंबईला बॉंबे म्हणत होते.आम्ही सत्तेत आल्यावर मुंबई केले.
मराठवाड्यात पावसाने ओढ दिली व 41 टक्के कमी पाऊस झाला. या संकटाला सामोरे कसे जाणार?
- मराठवाड्यातच नव्हे, तर विदर्भातही कमी पाऊस आहे. राज्यातील सुमारे 250 तालुक्यात दुष्काळ आहे. यंदा 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ आहे. तेव्हा रोजगार उपलब्ध नव्हता व अन्नधान्य नव्हते. यावेळी पिण्याच्या पाण्यावरून दंगे होतील. नद्या, धरणे कोरडी आहेत. आपल्याकडे 300-400 फूट खोल बोअरिंग खोदणारी मशीन आहेत. बिहारमध्ये 1200 फूटांपर्यंत खोल बोअरिंग करू शकणारी मशीन आहेत. आपल्याकडे आताच पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. एप्रिल-मे मध्ये वाईट परिस्थिती येईल. त्याचा आत्ताच विचार केला पाहिजे. या संधीचा फायदा घेऊन गाव तिथे तळे योजना करा. रेल्वेमार्ग टाकायचा आहे, ती कामे सुरू करा. नाहीतर पैसे वाया जातील. रस्त्यांची कामे करा, जनावरांच्या छावण्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने चाऱ्यासाठी थेट शेतकऱ्यांना पैसे द्या. अर्थसंकल्पात कपात लावून हा पैसा दुष्काळासाठी द्या. या विषयावर राजकारण न करता आम्ही व सरकारने केंद्राकडे एकत्रितपणे मदत मागितली पाहिजे.
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मदत झाली?
- ही शुध्द बनवाबनवी आहे. कर्जमाफीमुळे महाराष्ट्रातील 18-19 टक्के शेतकऱ्यांना फायदा झाला. दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांचेच कर्ज माफ झाले. एकरकमी माफी योजना सर्व बॅंकांमध्ये आहे. ही रक्कम भरायला शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत. प्रत्येक शेतकऱ्यावर कर्ज आहे. त्यांनाही कर्जाच्या प्रमाणात माफी मिळणे आवश्यक होते. चार-पाच वर्षात 71 हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. सरकारी खजिन्यातून बॅंकांना रक्कम दिलेली नाही. हा कागदोपत्री निर्णय असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना झालेला नाही. शेतकरी नाराज असून ती मतपेटीद्वारे प्रगट होईल.
तुमच्या आयुष्यात संघर्षाचे प्रसंग, द्विधा मनस्थिती होते, तेव्हा प्रमोद महाजन यांची आठवण येते का?
- होय. आमच्यावर जे संकट आले, ते कोणावरही येऊ नये. महाजन तरूण वयात गेले. ते धक्कादायक होते. हे संकट सांगून आलेले नाही. मोठ्या संकटातून बाहेर येण्यास वेळ लागतोच. या धक्क्यातून आम्ही आत्ताच वर येत आहोत. त्यांची उणीव क्षणोक्षणी जाणवते. त्यांच्यामुळेच मी राजकारणात आलो. नाहीतर मी कदाचित राजकारणात आलो नसतो. सामान्य शेतकऱ्याचा मुलगा राज्यात नेता म्हणून पुढे आलो. त्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. दुःख मनात ठेवून मुंडे-महाजन कुटुंब आता बाहेर आलो. त्यांचे अधुरे कार्य आम्ही पूर्ण करणार. महाराष्ट्र उभा करण्यासाठी आम्ही योगदान देऊ.
प्रमोद महाजन यांचे पक्षाला विस्मरण होत आहे का? संघाला त्यांच्याबद्दल आकस होता?
- अजिबात नाही. त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये श्रध्दा व प्रेम आहे. त्यांची आठवण रहावी म्हणून पक्ष व आम्ही प्रमोदजींच्या नावे काही योजना आखत आहेत. पुढच्या पिढीला त्यांची आठवण रहावी, यासाठी प्रमोद महाजन ऍकॅडमी सुरू करणार आहोत. महाजन व संघात मतभेद होते. पण ते संघाचे कट्टर स्वयंसेवक होते. आपल्या विचारांशी त्यांनी कधीही प्रतारणा केली नाही. राष्ट्र चालविताना ज्या भूमिका घ्याव्या लागतात, त्या त्यांनी घेतल्या.
प्रमोद महाजन व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध वेगळे होते. महाजन हयात असते, तर उध्दव ठाकरे यांच्याबरोबर ते समीकरण टिकू शकले असते?
- महाजन व बाळासाहेबांचे नाते पितापुत्राचे होते. महाजन बाळासाहेबांचे ऐकायचे. संकटात असताना बाळासाहेबही त्यांचे ऐकायचे. ते अनोखे नाते होते. एका नात्याची दुसऱ्या नात्याशी तुलना होऊ शकत नाही. बाळासाहेबांऐवढे नाते नसले तरी उध्दवजींबरोबर संबंध चांगले रहावे, असा प्रमोदजींचा प्रयत्न होता. उध्दवजीही त्यांना आदर ठेवून मानत होते.
तुमचे उध्दव ठाकरेंशी संबंध कसे आहेत?
- चांगले आहेत. आम्ही एकमेकांना समजून घेऊन संवाद करू शकतो. एकमेकाला एखादी गोष्ट ऐकायला लावू शकतो.
कोण कोणाचे मार्गदर्शक आहे?
- कोणीही कोणाचे मार्गदर्शक नाही. आम्ही बरोबरीचे आहोत. ते एका संघटनेचे प्रमुख आहेत. नारायण राणे व राज ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेचे नेतृत्व बाळासाहेबांनंतर उध्दव ठाकरे करणार आहेत. ते एक शक्ती म्हणून आम्ही पहात आहोत.
तुम्ही राजकारणात व्यवहारी आहात की स्वप्नांसाठी जुगार खेळू शकता?
- मी व्यवहारी आहे. मला जुगार खेळायला आवडेल. माझ्या निर्णयावर लाखो कार्यकर्त्यांचे भवितव्य आहे. त्यांना संकटात टाकून कोणताही निर्णय मी घेणार नाही. व्यवहार पाहून मी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो. टोटल रिस्क घेत नाही. ते नेत्याचे कर्तव्य आहे.
तुम्ही मध्यंतरी अशी रिस्क घेतली होती व दिल्लीला गेला होता. तिथे काय झाले?
- मी पक्ष सोडण्याची भूमिका घेतली नव्हती. मुलगा आईवडिलांवर रागावतो, याचा अर्थ तो घराबाहेर गेला असा होत नाही. पक्षापासून तसूभरही दूर होण्याचा विचार मी केला नव्हता. पद सोडेन असे मी म्हटलो नव्हतो.
काय प्रॉब्लेम झाले होते?
- मला भरलेली जखम पुन्हा वाहायला लावायची नाही. झालेले विसरून मी जोमाने कामाला लागलो आहे. पक्षात सामुदायिक निर्णय व्हावेत, बहुजनांचे राजकारण व्हावे व जनतेचा पक्ष करावा, असे मला वाटत होते. कुटुंबातील मतभेद वडील सोडवितात. अडवाणींनी आमचे ऐकले व मतभेद दूर केले. सर्व शंका दूर झाल्या असून आम्ही कामाला लागलो आहोत.
शिवसेनेबरोबर युती तोडण्याची वेळ आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती होण्याची शक्यता होती. त्यावेळी पंतप्रधानपद मिळविण्याची फिकीर असल्याने अडवानींनी तुम्हाला नमते घ्यायला लावले व युती टिकविली?
- युती तोडण्याबाबत एक क्षण आला होता. तेव्हा मनसेबरोबर जावे, असे आमच्या सहकाऱ्यांचे मत होते. पण अडवाणींनी मी व नितीन गडकरी यांच्याशी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत अडीच तास चर्चा केली होती. हिंदुत्वावर शिवसेना हा देशात एकमेव पक्ष विचारसरणीच्या जोरावर आपल्याबरोबर आहे. देशात सर्वाधिक काळ टिकलेली युती शिवसेनेशी आहे. ती एखाद्या गोष्टीसाठी तोडायची का? असा त्यांचा मुद्दा होता. त्यामुळे पंतप्रधानपदाचा विचार करून युती टिकविलेली नाही. राजकीय स्वार्थामुळे युती टिकविली नसून ध्येयवादासाठी, हिंदुत्वासाठी टिकविली आहे.
हिंदुत्ववादाचा ब्रँड संपलाय का, तसे काही उरले आहे का?
- हिंदुत्व संपलेले नाही. गुन्हेगार हा गुन्हेगार आहे. आतंकवादी हा आतंकवादी आहे. त्याचा जातधर्म नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष स्वतःला ख्रिश्चन मानतो व चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतो. भाजपने देशात व राज्यात सरकार चालविले, ते घटनेनुसार चालविले. आमचा मूलभूत विचार हिंदुत्व आहे. हिंदुत्व व बहुजन वेगळे नाही. ब्रिटीशांनी "फोडा व राज्या करा', हे तत्व राबविले. आम्हाला जातींचा अधिक अभिमान आहे. हिंदुत्व संपलेले नाही. रामजन्मभूमीबाबत जात, पंथ, प्रदेश सोडून सर्व एक झाले होते. अमरनाथच्या प्रश्नी आता तसे होत आहे. तो जम्मूचा प्रश्न आपण मानत नाही. हिंदू एक झाले आहेत. लोकांनी धर्म सोडलेला नाही. राज्य एका धर्माप्रमाणे चालावे, असा अर्थ आम्ही काढत नाही. हिंदुत्व ही एक संकल्पना आहे. राम जन्मभूमी, अमरनाथ याबाबत आमचे एकमत आहे. कोणाचेतरी लांगूलचालन करायचे, तेव्हा हे आम्ही दृष्टीआड करतो. सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या केली होती. हा देश लोकशाही असलेला आहे. आमच्या मनात असलेले हिंदुत्व जागृत होऊन देश एकत्र येऊ शकतो. रामजन्मभूमी बाबत ते झालेले आहे, रामसेतू, अमरनाथच्याबाबतीतही ते होऊ शकते.
गोपीनाथ मुंडे कधी मुख्यमंत्री होणार?
- महाराष्ट्र वाचवायचा असेल, तर सरकार बदलले पाहिजे. व्यक्तिगत आशाआकांक्षा बाजूला ठेवल्या तरच ते होईल. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर चालेल, मला संधी मिळाली, तर निश्चितच आवडेल.
-------------------------------------------------------------------------
यानंतरची मुलाखत १ तारखेला रात्री ९.३० वाजता.
---------------------------------------------------------------------------
शनिवारी रात्री ११.३० वाजता साम मराठीवर पाहा -
विलासराव देशमुख यांची मुलाखत (पुनर्प्रक्षेपण)
No comments:
Post a Comment