Thursday, August 28

''समता परिषदेला इतरांनी घाबरण्याचे कारण नाही!''




छगन भुजबळ म्हणजे एकूणच वादळी व्यक्तिमत्त्व! शिवसेना ते राष्ट्रवादी व्हाया कॉंग्रेस असा तीन राजकीय पक्षांतला त्यांचा प्रवास! राजकारणातले अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले! यशाइतकेच अपयशही पचविलेले! राजकारणाइतकेच समाजकारणातले एक मातब्बर नेते म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो. 'महाराष्ट्र कोणाचा' या प्रश्नाला त्यांचे काय उत्तर आहे? पत्रकार राजू परूळेकर यांनी त्यांच्याशी साधलेला हा 'साम'संवाद...

तुम्ही ज्या पक्षांमध्ये होता, त्या साऱ्या पक्षांनी सर्वोच्च पद देण्याच्या वेळी तुम्हाला बाजूला ठेवले. बहुजन समाजाला मिळालेला हा शाप आहे का?
- मला तसे वाटत नाही. पक्षाला काही मर्यादा असतात. काही वेळा अन्याय झाला, असे वाटण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना उपमुख्यमंत्रीपद हे पक्षाकडे असलेले सर्वोच्च पद होते. ते त्यांनी मला दिले. अनेक चांगले कार्यकर्ते होते. त्यांना माझ्याएवढी चांगली संधी मिळाली नाही. पक्षात सर्वांना मिळतेच असे नाही. सर्वस्व पणाला लावलेल्या काहींना अजिबात काही मिळाले नाही. तर काहीही न केलेल्यांना अनेकदा सर्वकाही मिळाले. काहीजण "तुम लढो, हम कुर्सी संभालते है,' असे असतात.

राज्यात अनेक प्रश्‍नांनी उग्र रूप घेतले असताना या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विजय मिळेल?
- निश्‍चितच. जेवढे रंगविले जाते, तेवढे राज्यातील चित्र वाईट नाही. अन्य राज्यांच्या तुलनेत मोठी परकीय गुंतवणूक, उद्योगधंदे महाराष्ट्रात आले आहेत. राज्यात सुमारे 15 हजार कोटी रूपयांची चारपदरी रस्त्यांची कामे सुरू आहेत व ती आठ-दहा महिन्यांत पूर्ण होतील. राज्यात गोदी, रस्ते, विमानतळ, आदी उत्तम पायाभूत सुविधा आहेत व त्या वाढविल्या जात आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये अन्य राज्यांपेक्षा अधिक आहेत. शेतकऱ्यांसाठी दोन टक्के व्याजाचा भार उचलून राज्य सरकारने चार टक्के दराने पीककर्ज उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी पाहिली, तर महाराष्ट्राचा 13 वा क्रमांक आहे. हे काही भूषणावह नाही! एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, अशी आमची भूमिका आहे. पोलिस, कामगार व अन्य लोकही आत्महत्या करतात. मग त्यांच्या व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये काय फरक आहे? शेतकऱ्यांचे प्रमाण थोडे जास्त आहे. त्यावर उपाययोजना सुरू असून केंद्रानेही पॅकेज दिले आहे.

तुमच्या गृहमंत्रीपदाच्या कारकीर्दीत टोळीयुध्द, खंडण्या खुलेआम सुरू होते. ते मोडून काढूनही तुमच्यावर अन्याय झाला?
- खंडणीसत्र सुरू असल्याने मुंबईत थाटामाटात विवाह होत नव्हते, नवी गाडी घेतली की धमक्‍या, बॉलिवूडलाही धमक्‍या दिल्या जात होत्या. बॉलिवूडमधली मंडळी हैदराबादला जाण्याच्या तयारीत होती. मला तीन-चार महिन्यांचा अवधी द्यावा, असे मी त्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा राहिलो. देशाचे अर्थकारण मुंबईवर अवलंबून असल्याचे मी त्यांना सांगितले. सर्वांनी आव्हान स्वीकारून कठोर पावले उचलली. भरत शहासारख्या मोठ्या व्यक्तीला पुरावे मिळाल्यावर अटक केली. माफियांबरोबर संधान बांधले, तर त्याला माफ केले जाणार नाही, असा संदेश त्यातून दिला. त्यामुळे खंडणीसत्र तीन-चार महिन्यांत थांबले.

पण तुम्हाला पक्षाने गृहमंत्रीपदावरून हटविले व भरत शहाने फटाके वाजविले. तुमच्या पक्षानेच त्याला ही संधी मिळवून दिली?
- त्यावेळच्या परिस्थितीत निर्णय घ्यावा लागला. पण नंतर पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळात परत आणले व मानसन्मान दिला.

समता परिषदेच्या बिहार, दिल्ली, हरयाणात प्रचंड सभा झाल्या. ही गोष्ट एका मोठ्या गटाला खुपते आहे का?
- समता परिषदेचे कार्य जोमाने सुरू आहे व जाहीर सभा चांगल्या होत आहेत. मंडल आयोगाच्या कारणावरून मी शिवसेनेतून बाहेर पडलो. कॉंग्रेसमध्ये असताना मंडल आयोगाच्या अंमबजावणीची मागणी केली व त्यांनी ती मान्य केली. ओबीसींचा प्रश्‍नही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. मी माझे काम करीत आहे.

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात उद्योगांना 24 तास वीज न देण्याबद्दल जनतेला काय सांगणार?
- येथे 24 तास वीज मिळत होती. आम्ही दाभोळ वीजप्रकल्प आणला. शिवसेना-भाजपने अरबी समुद्रात बुडविला व नंतर बाहेर काढला. नवीन करार केला. संपूर्ण वीज तुलनेने स्वस्त मिळत होती व कमी घेतल्यास जादा दर पडत होता. राजकारण झाल्याने एन्रॉन प्रकल्पात अडचणी निर्माण झाल्या. वीजेची गरज वाढणार असल्याचे पवारसाहेब सांगत असताना काही अधिकारी प्रकल्पांची गरज नसल्याचे सांगत होते. आता नवीन वीजप्रकल्प उभे करण्यास चार-सहा वर्षे जातील. तोपर्यंत अडचण सोसावीच लागेल. वीजप्रकल्प गाळात घालण्याचे काम आमच्याकडे बोट दाखविणाऱ्या विरोधकांनीच केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात, तर आमूलाग्र परिवर्तन करता येईल का?
- हा जर-तरचा प्रश्‍न आहे. मुख्यमंत्रीपद हे जास्तीतजास्त काम करण्याचे शक्तीस्थान आहे. त्यांना सर्वांनी चांगली साथ दिली, तर काहीही करून दाखविणे अशक्‍य नाही.

सरंजामदार बहुजन समाजाला साथ देऊन पुढे जाऊ देत नाहीत?
- राजकारणात काहीही होऊ शकते. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होतील, हे दोन वर्षांपूर्वी कोणी सांगितले असते, तर ते कोणाला खरे वाटले असते का? अ. र. अंतुले, कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक असे मुख्यमंत्री राज्यात या पदावर बसलेले आहेत, हा इतिहास आहे.

मानखंडना झालेल्या व जनशक्ती असलेल्या गोपीनाथ मुंडे, नारायण राणे व तुम्ही यांचे वेगळे समीकरण निवडणुकीच्या तोंडावर निर्माण होईल?
- मला तसे वाटत नाही. निवडणुकीत युती होतात. पण कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप यांच्यातच लढत होईल.

समता परिषदेच्या ताकदीला अनेकजण भीतात. तुम्ही या शक्तीकडे कसे पाहता?
- ही शक्ती विघातक नाही. महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्या मार्गाने जाणारी आहे. हे राजकीय व्यासपीठ नसून सामाजिक संघटना आहे. ज्या गोष्टींची कमतरता लहान समाजात आहे व राज्यकर्त्यांनी काही करावयाचे आहे, ते या शक्तीच्या जोरावर मिळेल. पण घटनेच्या पलीकडे जाऊन आम्ही काही मागणार नाही. इतरांनी घाबरण्याचे कारण नाही.

समता परिषदेच्या जोरावर काय आमूलाग्र परिवर्तन आणायचे आहे?
- आदिवासी, दलित समाजासाठी विधानसभेत व लोकसभेत आरक्षण आहे. या समाजाचे प्रतिनिधी सरकारशी भांडून आवश्‍यक त्या गोष्टी मिळवत आहेत. त्याबद्दल आनंद आहे. पण सुमारे 55 टक्के ओबीसींना लोकसभा व विधानसभेत आरक्षण नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी लढणारे कमी आहेत. या समाजाचा उमेदवार खुल्या जागेवरून निवडणूक लढवितो. अन्य मते हवी असल्याने तो समाजासाठी जास्त भांडत नाही. आयएएस, आयपीएसमध्ये फारसे ओबीसी सापडणार नाहीत. कारण त्यांच्यासाठी एक शक्ती एकत्र आलेली नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांवर दबाव टाकण्यासाठी ओबीसींना रस्त्यावर एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे.

तुम्ही शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या तीनही पक्षांमध्ये होता. त्यामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या दिसल्या?
- या तीनही पक्षात ज्या भूमिका मला देण्यात आल्या, त्या चांगल्या रीतीने पार पाडल्या. शिवसेनेत महापौर, विधानसभेत एकाकी आमदार ही भूमिका पार पाडली. कॉंग्रेसमध्ये असताना शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मी विरोधी पक्षनेतेपदी सर्वशक्तीनिशी काम केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आल्यावर गृहमंत्रीपद व आता सार्वजनिक बांधकाम खात्यात चांगले काम करीत आहे. शिवसेनेचा जन्म मराठी माणसासाठी झाला व तो पक्ष हिंदुत्वाकडे झुकला. कॉंग्रेस देशव्यापी पक्ष असून वेगळी विचारसरणी आहे. राष्ट्रवादीची विचारसरणी कॉंग्रेसपेक्षा फार वेगळी नाही. पण शरद पवार यांच्या माध्यमातून आम्हाला चांगला नेता मिळाला आहे. बाळासाहेब ठाकरे हे लोकांच्या भावनेला हात घालणारे, महाराष्ट्रावर, कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे प्रामाणिक नेते आहेत. शरद पवार हे उत्तम प्रशासक, शेतकऱ्यांचे प्रश्‍न माहीत असलेले आणि क्रिकेट, विज्ञान आदी सर्व विषयांवर अविश्रांत काम करणारे नेते आहेत. प्रत्येकाची वेगळी खासियत आहे.

दांडगे कर्तृत्व व अनुभवामुळे स्वयंभू नेतृत्व घोषित करावे, असे तुम्हाला वाटत नाही का?
- महाराष्ट्रात व देशात राजकीय पक्ष खूप आहेत. आणखी एक पक्ष काढून राज्याचे नेतृत्व करावे, असे मला अजिबात वाटत नाही.

कोणाला तरी बॉस मानण्याची किंवा असण्याची गरज नाही, असे आहे का?
- मला तसे वाटत नाही. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केले, ते श्रेष्ठच आहेत. त्यांचे कर्तृत्व व अनुभव श्रेष्ठ आहे. एवढ्या लवकर माझ्या डोक्‍यात अजून हवा गेलेली नाही. जनतेची, राज्याची व ओबीसींची सेवा करण्याचे ध्येय पार पाडण्यासाठी पक्षात संधी मिळते आहे. दुसरा विचार करण्याची गरज नाही.

अफाट कर्तृत्व असताना पक्षाने अजून काही जबाबदाऱ्या सोपवाव्यात, असे वाटते का? हायकमांड करते तोच न्याय आहे का?
- शरद पवार प्रत्येकाची शक्ती, वकूब ओळखून आहेत. महाराष्ट्रात काय चालले आहे, याची त्यांना माहिती असते. अन्य पक्षात दिल्लीला जाऊन येथे काय घडते ते सांगावे लागते. येथे काय काम करतो आहे, ते बरोबर आहे की चुकीचे करतो आहे, हे आम्हाला सांगावे लागत नाही. बिग बॉसची प्रत्येक गोष्टीवर, कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर नजर आहे. कोणावर काय काम, जबाबदारी द्यायची याची जाण त्यांना आहे. काही वेळा मनात असूनही काही गोष्टी करता येत नाहीत. राजकीय अपरिहार्यता काही वेळा असते. त्यामुळे या गोष्टी नेत्यांवर सोपवून आपले काम केले पाहिजे, त्यानुसार मी काम करीत आहे.

शहरांमध्ये येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांबाबत मत काय?
- अ. र. अंतुले मुख्यमंत्रीपदी असताना अनधिकृत झोपड्या काढण्याचे काम सुरू होते. एका पत्रकाराने सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहीले व कारवाईला स्थगिती देण्यात आली. तीन-चार वर्ष स्थगिती होती व नंतर ती उठविण्यात आली. नवीन झोपड्यांसाठी वास्तविक स्थगिती नव्हती. तरी या काळात कारवाई थांबली व प्रकरण हाताबाहेर गेले. अन्य राज्यांत फारशी प्रगती झाली नसल्याने पोट भरण्यासाठी लोक येथे येतात. अवघे विश्‍वचि माझे घर, असे आपल्या संतांनी सांगितले आहे. पण शहराच्या आरोग्याला बाधा येणार नाही, हेही पहायला पाहिजे. येथे येणाऱ्याला मताचा अधिकार असतो. एका फ्लॅटमध्ये दोन मते असतात व झोपडीत 10 मते असतात. राजकारण्याला निवडून यायचे असते. तरीसुध्दा या प्रश्‍नी मार्ग काढला पाहिजे. इतर राज्यांमध्ये प्रगती होईल, तसे लोंढ्यांचे प्रमाण कमी होईल.

तुम्ही मुख्यमंत्री झालात, तर यातून कसा मार्ग काढाल?
- न्यायालयीन अडथळे दूर करून एसआरए योजना मार्गी लावल्या पाहिजेत. महापालिका, पोलिस आदींनी नवीन बेकायदा झोपड्या रोखल्या पाहिजेत. मुंबईत घोडा बाळगायचा असेल, तर तबेला आहे, याचा पुरावा द्यायला लागतो. पण माणसाला रहायला घर आहे की नाही, हे पहायची गरज वाटत नाही. त्यामुळे हा प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्र सरकार, महापालिका, न्यायालय व अन्य राज्यांनीही सहाय्य केले पाहिजे.

कॉंग्रेसमध्ये दिल्लीला महाराष्ट्राबद्दल आकस आहे का?
- खात्रीपूर्वक म्हणणे कठीण आहे. आकस असू शकेल, किंवा दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असू शकेल. नेता अन्य प्रांतातून आला असेल तर आपल्या भागाकडे पाहतो. त्यामुळे तो आकसाने पाहतो, असे वाटू शकते. आपल्या खासदारांनी राज्यासाठी भांडले पाहिजे. पवार साहेबांनी 70 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली. इतरांनाही सुचले असेल, पण पवार साहेबांनी मंत्रिमंडळात मांडून ते मंजूर करून घेतले. अन्यही बऱ्याच गोष्टी केल्या आहेत.

तुम्ही मुख्यमंत्री कधी व्हाल? नियतीवादी आहात का?
- प्रत्येकाला आपण मोठे व्हावे, असे वाटत असते. पण कोण मोठे होईल किंवा छोटे होईल, हे राजकारणात सांगता येत नाही. मी नियतीवादी नाही. ज्योतिषांवर फार विश्‍वास ठेवतो किंवा कुडमुड्या ज्योतिष्यांकडे कुंडल्या मांडून बसतो, असे नाही. माझ्याकडे अजून वेळ आहे. प्रत्येकाने आहे त्यापेक्षा मोठ्या भूमिकेत बसविले जाईल, हे स्वप्न पाहिलेच पाहिजे. तरच चांगले काम करू शकाल.

---------------------------------------------------------------------------

उद्याची मुलाखत - गोपीनाथ मुंडे


""मला मुख्यमंत्रिपदाची व्यक्तिगत आकांक्षा नाही, पण संधी मिळाली, तर निश्‍चितच आवडेल.''
- गोपीनाथ मुंडे

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, भाजपमधील लोकनेते. राज्याच्या राजकारणातील खाचाखोचांपासून ते प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधांपर्यंतच्या प्रश्‍नांना त्यांनी दिलेल्या दिलखुलास उत्तरांमुळे "साम' वाहिनीवर ही मुलाखत रंगली.
ता. 29 ऑगस्ट ः रात्री 9.30
..

------------------------------------------------------------

गोपीनाथ मुंडे यांना प्रश्‍न विचारण्यासाठी आम्हाला "एसएमएस' करा. "मेसेज'मध्ये टाइप करा pun1, (आपला प्रश्‍न) आणि पाठवा 54321 वर (एअरटेल मोबाईलधारकांनी 56666 ला "एसएमएस' करावा.)
("एसएमएस'साठी ऑपरेटरनुसार एक ते तीन रुपये खर्च येईल)

1 comment:

Anonymous said...

No doubts that Bhujbal is one of the top leaders that maharashtra has. He is a true fighter and brave else no one would have ever dared to issue warrent agaist Bal Thakray.
But he is not speaking the truth when he says injustice was not done with him in NCP.It is due to the Maratha lobby that he does not get what he desrves.In current political scenario he has the best organizational skill. Remeber the way made Shiv Sen, NCP and Samta Parishad strong. Even Sharad Pawar knows Bujbal's skills but is helpless in front of the strong Maratha lobby in his party.
After all majoritism is one bad aspect of democracy.
But I think this generation of self made mens of Maharashtra(Pawar,Bhujbal,Thakary and Munde) politics should ensure that they never hampper the growth of the state in the political game.
-Marathi Manus