
गेल्या निवडणुकीच्या वेळी दलित समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्रिपदी आणून कॉंग्रेसने

राज्यात वीज भारनियमनाचा प्रश्न गंभीर असून, त्याबाबत केंद्रीय ऊर्जामंत्री म्हणून आपले काय म्हणणे आहे?
- प्रथमतः मी स्पष्ट करू इच्छितो, की मी सामान्य कार्यकर्ता असून दिग्गज नेता नाही. तळागाळातील कार्यकर्त्यांबरोबर मी फिरत असतो. त्यामुळे लोक मला निवडून देतात. आपण दिग्गज समजलो, तर लोक जागा दाखवून देतात. वाहतूक पोलिसाचा डगला-पट्टा असतो, तोपर्यंत त्याचा रूबाब असतो. तो गेल्यावर कोणी विचारत नाहीत. तसे राजकीय लोकांचे आहे. सत्ता गेल्यावर कोणी विचारत नाही. त्यामुळे आपले पाय सत्ता असो की नसो, जमिनीवर असले पाहिजेत. आपण लोकांमधील आहोत, याचे भान ठेवले पाहिजे. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यासारख्या नेत्यांनी आमच्यासमोर आदर्श ठेवला आहे. त्या चाकोरीच्या बाहेर आम्ही जात नाही. ऊर्जेच्या बाबतीत पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी लाल किल्ल्यावरून ऊर्जेच्या बाबतीत काय केले पाहिजे, याबाबत सांगितले आहे. गेल्या 15 वर्षांत देशात ऊर्जानिर्मितीचे काम ठप्प झाले होते. हे काम कन्करंट सूचीमध्ये आहे. ही राज्याची जबाबदारी असते. मी दिल्लीत बसलो म्हणून राज्याला दोष देणार नाही. आठव्या, नवव्या व दहाव्या पंचवार्षिक योजनेत 56 हजार मेगावॉट वीजनिर्मिती झाली. यावर अभ्यास केला. तीन गोष्टी लक्षात आल्या. महाराष्ट्रासह देशातील राज्यांनी विजेच्या बाबतीत काम केलेले नाही. वीजनिर्मिती यंत्रसामग्री निर्माण करणाऱ्या भेलची क्षमता फक्त पाच हजार मेगावॉटची आहे. दरवर्षी 25 हजार मेगावॉट वीजनिर्मिती वाढविण्याची तयारी आहे; पण देशात मशीनरी आहे कुठे? त्यामुळे जगभरातील कंपन्यांना ऑर्डर दिल्या. आम्ही लार्सन टुब्रो- एमएचआय, भारत फोर्ज- एनटीपीसी, बीएचएल-आर्मस्ट्रॉंग यांच्याशी संयुक्त करार केले. पंतप्रधानांनी सांगितले 2012 पर्यंत देशात प्रत्येकाच्या घरात वीज जाईल. देशात 78,755 मेगावॉट एवढी वीजनिर्मिती करण्याचे काम सुरू केले आहे व कॅप्टिव्हमध्ये 11 हजार मेगावॉट वीजनिर्मिती होईल. म्हणजे गेल्या 15 वर्षांत 56 हजार मेगावॉट, तर या पंचवार्षिक योजनेत 90 हजार मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे.
निवडणुकीत वीजेच्या प्रश्नाचा किती परिणाम होईल?
- देशातील सर्व मुख्यमंत्री व वीजमंत्र्यांची बैठक घेतली. प्रत्येक राज्यातील तुटवडा किती आहे हे पाहून प्रत्येक राज्याला टार्गेट दिले. त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. एक महिन्यापूर्वी मी महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेतला.
मागच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना-भाजपचा पराभव करून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेवर आली. त्या यशाची गुरूकिल्ली काय होती?
- त्या वेळी राज्यात दुष्काळ होता, जनावरांच्या छावण्या उभ्या केल्या. कृत्रिम पाऊस पाडला होता. ज्या समाजातून मी आलो आहे, त्या समाजाच्या वेदना मला माहीत होत्या. म्हणूनच समाजातील खालच्या स्तरावरील लोकांना फायदा द्यायचा प्रयत्न आम्ही केला. बजेटमध्ये मांग, गारूडी, माकडवाला यांचाही समावेश होता. त्यांच्याकरिता 1100-1200 कोटींचा खर्च केला. सामाजिक बांधिलकीचा अर्थसंकल्प होता. विद्यार्थ्यांसाठी गटविमा केला. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. जिचकार यांच्या मदतीने करिअर गायडन्स उपक्रम राबविला.
लोकांनी तुम्हाला का सत्तेवर आणावे?
- विलासरावांच्या मनात गरिबांसाठी विशेष योजना आहेत. मोठ्या शहरांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांत ते लक्ष घालत आहेत. सोनिया गांधी आमची दर सहा महिन्यांनी हजेरी घेतात, त्यात आम्हाला कामगिरी सांगावी लागते. जाहीरनाम्यानुसार आम्ही काम करतो की नाही, हे त्या तपासून पाहत असतात.
सोनिया गांधींना महाराष्ट्र किंवा देश समजत नाही, असे विरोधक समजतात...
- महाराष्ट्रात कॉंग्रेस येणार नाही, असे वातावरण असताना माझ्यासारख्या दलित व्यक्तीला मुख्यमंत्रिपदी पाठविले आणि सत्ता मिळाली. ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी नव्हती का? आता म्हणाल का, सोनिया गांधींना महाराष्ट्र कळत नाही?
मग या वेळी तसा मुख्यमंत्री आणला नाही, तर सत्ता मिळणार नाही का?
- आमचा मुख्यमंत्री समर्थ आहे व आम्ही मदत करीत आहोत.
बाहेरून आलेल्या नेत्यांमुळे अनेक अडचणी उभ्या राहिल्याची उदाहरणे आहेत. नारायण राणे आल्यापासून कॉंग्रेस दुभंग झाली आहे, असे चित्र आहे. या पद्धतीने निवडणुकीला सामोरे कसे जाणार?
- बाहेरून आलेल्या नेत्यांच्या बाबतीत काही वेळा पराभव होतो व काही वेळा सफलता मिळते. यशवंतराव चव्हाण यांनी शेकापमधून यशवंतराव मोहितेंना व रिपब्लिकन नेत्यांना आणले होते आणि कॉंग्रेस मजबूत झाली. भाजप व शिवसेनेच्या बाबतीतही हे काही वेळा झाले. हे नेते ज्याअर्थी त्या पक्षातून फुटून निघतात, तेव्हा एकसंघ वाटणारा पक्ष काहीसा खिळखिळा झाल्यासारखा वाटतो; पण वादविवाद, भांडणे हे पक्ष जिवंत असल्याचे लक्षण आहे किंवा लोकशाही असल्याचे दिसून येते. खुर्च्यांच्या फेकाफेकीचे मी समर्थन करणार नाही; पण पक्षाचे कार्यकर्ते नेतृत्वाला जाब विचारतात. त्यातून नेतेमंडळी सुधारतील.
कॉंग्रेसमधील नेत्यांमध्ये सैद्धांतिक वाद नाही; पण सध्या अतिशय हास्यास्पद किंवा आश्चर्यकारक असे प्रकार सुरू आहेत?
- हे सर्वच पक्षात चालले आहे. आदर्श विचारसरणी कुठे राहिली आहे. मधू दंडवते, बॅरिस्टर नाथ पै यांच्यासारखे नेते होते. त्यांचे विचार ऐकून मी फार भारावून जात होतो आणि समाजवादी पक्षात जाण्याचा विचार करीत होतो. मी कॉंग्रेसमध्ये आल्यावर फोरम फॉर सोशल ऍक्टिव्हिस्टचा निमंत्रक होतो. परंतु सध्या विचारसरणी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळते आहे. कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी कम्युनिस्ट व भाजप एकत्र आले. मायावतींनी अडवानींना सांगितले, तुम्हाला पंतप्रधान करू. सीपीएमने मायावतींना पंतप्रधान करू सांगितल्यावर अडवानींना बाजूला केले.
महाराष्ट्रात मूल्यांचे पतन होताना दिसत आहे. नारायण राणे यांच्यासारख्यांच्या वागण्याचे समर्थन कसे करणार?
- राणे यांनी पक्ष सोडला. त्यांना मंत्री म्हणून संधी दिली. त्यांच्या वादाच्या चर्चेत मी नव्हतो. शिवसेनेतून आलेले छगन भुजबळ दुसऱ्या पक्षात आले. स्थिर झाले. राणे यांच्याबाबतीतही तसे होईल.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न बिकट आहे. कॉंग्रेसपुढे याबाबत संभ्रम आहे?
- शेतीकडे लक्ष दिलेच पाहिजे. शेतकऱ्यांना शेतीमालाचे भाव वाढवून दिले. त्यांचा खर्च नीट वसूल होईल, असा योग्य भाव दिलाच पाहिजे. दलालांच्या साखळीमुळे अडचण असून शेतीमाल थेट विकला गेला पाहिजे.
मुख्यमंत्री आहेत की नाहीत, याबाबत कायम चर्चा..., पक्षनेतृत्व काही बोलत नाही. याचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही का?
- आघाडी सरकारमध्ये असे होते. पूर्ण सत्ता असतानाही मुख्यमंत्री अस्थिर करण्याचे काम पक्षांतर्गत लोक करीत असत; पण आता कोणी काहीही सांगू शकत नाही. जरा काही झाले तर इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे येतील. केंद्रात विश्वासदर्शक ठरावावर 19 लोकांनी आमच्या बाजूने मत दिले. आज कोणाचीही खात्री देता येत नाही. म्हणून जनतेने संमिश्र कौल दिला नाही पाहिजे. पाच वर्षे काम नाही केले, तर सरकार खाली खेचा.
शरद पवार हे विरोधक असण्यापेक्षाही मित्र असताना अधिक धोकादायक असतात?
- त्यांच्याबाबतीत हा गैरसमज आहे. तसे ते कधीच वागत नाहीत. त्यांना कोणी डिवचले तर मग ते धोकादायक ठरतात. त्यांच्याबाबतीत कॉंग्रेसमध्ये काही चुकलेले होते. मी 1977 च्या आधी साक्षीदार होतो. सगळ्याच वेळा धोका देतात असे नाही, अनेकदा पाठिंबाही देतात. ही राजकीय गणिते असतात. कोणीही स्वतःचे भविष्य बघणारच. लोक टिकवून ठेवण्यासाठी क्लृप्त्या कराव्या लागतात. कॉंग्रेस देशभरात असल्याने अशा गोष्टी आम्हाला कराव्या लागत नाहीत.
मायावती फॅक्टरबाबत तुमचा विचार व उत्तर काय?
- जातीव्यवस्थेवर निवडणुका लढविणे हे घटनाविरोधी आहे. अन्याय झाला हे खरे. बहुजन समाज पक्ष पुढे आला. उत्तर प्रदेशात विशिष्ट समाज दलितांना खाली दाबण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे रिऍक्शन आली. हे निरनिराळ्या प्रांतात झाले, तर देश विस्कळित होईल. मी दलित आहे, आपले नेतृत्व सर्वांना दिले पाहिजे व तो साऱ्यांनाच तो आपला माणूस वाटला पाहिजे. मी राखीव जागांवर आधी निवडणूक लढवीत होतो व नंतर खुल्या जागेवरून लढलो. चार वेळा निवडून आलो. हे असे झाले पाहिजे. महाराष्ट्रात मायावती फारशा प्रभावी होऊ शकणार नाहीत. कारण इथे महात्मा गांधी, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आदी लोकांची शिकवण आहे. एखाद्या जातीचे राजकारण किंवा जातींचा प्रश्न इथे टिकू शकणार नाही. समाज एकत्रित झाला पाहिजे, अशी भूमिका घेऊन आपण चाललेलो आहोत.
तुम्ही राज्यात सत्ता आणल्यावर कॉंग्रेसने तुम्हाला राज्यपाल केले व नंतर घाबरून जाऊन पुन्हा केंद्रात ऊर्जामंत्री केले, असे मायावतींचे वक्तव्य होते...
- ते त्यांचे राजकीय भाषण होते. राजकारणात या सगळ्या गोष्टी होत असतात; पण जाती, धर्म, नेत्यांच्या नावावर महाराष्ट्राचा समतोल बिघडू देऊ नये. आडनाव काढून टाकावे, जात ओळखू आली नाही पाहिजे, अशी सामाजिक समतेची भूमिका येथे होती. आज शरमेने मान खाली घालावी लागते.
सर्व पक्षांना एकेका जागेसाठी लढावे लागणार. निवडणुकीत जिंकून येण्याची क्षमता नेहमी महत्त्वाची ठरते. काळा पैसा, गुंड यांच्याकडे ती अधिक असते. गांधी, नेहरू यांचा वारसा असलेल्या कॉंग्रेसमध्ये काय चालले आहे?
- हे सर्व कॉंग्रेसनेच पंचा नेसून करावे, अशी तुमची अपेक्षा आहे? बाकीच्या पक्षांमध्ये गुंड, पैसेवाले पाहिजेत? भाजपचे उत्तर प्रदेशात काय चित्र आहे? गुंड, खुन्यांना किती तिकिटे दिली? कॉंग्रेसनेच नेहमी त्याग करायचा? कॉंग्रेस गेली, की मग कुठल्या कॉंग्रेसचे नाव घेणार तुम्ही? एकदा साहित्य संमेलनात श्रीराम लागू यांच्याबरोबर परिसंवाद झाला होता. ते म्हणाले होते, यथा राजा तथा प्रजा. मी म्हणालो, यथा प्रजा तथा राजा. मतदारांनी ठरविले की भ्रष्टाचाऱ्यांना, गुंडांना निवडून देणार नाही. मग त्यांची निवडणुकीला उभे राहण्याची हिंमत होणार नाही.
मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर तुमच्या जागेबाबतचे काय?
- मी राज्यसभेवर असून, अजून चार वर्षे आहेत. माझे वय 67 वर्षे असून, आम्ही किती काळ राजकारणात राहायचे? मी पोलिस सबइन्स्पेक्टर होतो, त्यानंतर कॉंग्रेसमध्ये आलो. रात्रंदिवस राज्यात फिरत होतो. आता तेवढे हिंडू फिरू शकत नाही. त्यामुळे आपण बाजूला कधी व्हायचे, हे आपण ठरविले पाहिजे; पण लगेच उद्यापासून मला हा प्रश्न विचारू नका.
राजकारणातील घराणेशाहीबाबत तुमचे मत काय?
- हे सगळ्याच पक्षांमध्ये आहे. काहींची नावे प्रसिद्ध झाली आहेत व काहींची नाही.
राणे पुत्रप्रेमाचा आरोप करून पक्षाबाहेर पडले; पण कॉंग्रेसच्या लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांमध्ये राणेंच्या पुत्राचे नाव आहे. याबाबत तुमचे मत काय?
- हे असे होते आहे. ते थांबवायचे असेल, तर विचारांची बैठक पाहिजे. 1977 पूर्वीच्या काळी रचनात्मक भूमिकेतून काम करणारी मंडळी होती. तुम्ही कसे उमेदवार निवडून देता, याबाबत जनतेला शिक्षण देण्याची गरज आहे. अमेरिकेत बराक ओबामा या कृष्णवर्णीय उमेदवाराला चांगले मताधिक्य मिळते, याबद्दल मला आनंद आहे. लोकशाहीचा हा विजय आहे. आमच्याही देशात असे चांगले प्रभाव निर्माण झाले आहेत. कॉंग्रेसशिवाय अन्य पक्षांनी किती दलित मुख्यमंत्री दिले? भाजपने नाही दिले. आता मायावतींची साथ करू म्हणतात. मग अडवानींचे काय होईल?
महाराष्ट्र कोणाचा?
- महाराष्ट्र आमचा सर्वांचा आहे. महाराष्ट्रावर जे जे प्रेम करतात. जे येथे रात्रंदिवस काम करून, घाम गाळून महाराष्ट्राला मोठे करतात. त्यांचा सर्वांचा महाराष्ट्र आहे.
कॉंग्रेसचाच पुन्हा मुख्यमंत्री होणार का? त्यावर तुमचा हक्क आहे ना?
- कॉंग्रेसलाच पुन्हा सत्ता मिळणार हे माझे निरीक्षण आहे. वादविवाद झाले तरी लोकांसाठी, समाजासाठी नेहमी कॉंग्रेसच काही करीत आहे. पक्षात लोकशाही आहे. निरीक्षक येऊन आमदारांचा कल लक्षात घेतात आणि त्यानुसार पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात. मी मुख्यमंत्रिपदावर दावा किंवा हक्क सांगू इच्छित नाही. महाराष्ट्राने मला सर्व काही दिले आहे. एका छोट्या माणसाला इथपर्यंत आणून पोचविले आहे. मी महाराष्ट्राचा जन्मभर ऋणी राहीन.
(शब्दांकन - उमाकांत देशपांडे)
---------------------------------------------------------------------
उद्याची मुलाखत - आर. आर. पाटील
"माझे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजितदादा पवार यांच्यात वाद असल्याचे चित्र कल्पनेने रंगविण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सौहार्दाचे वातावरण असून इतर कोणत्याही राजकीय पक्षांपेक्षा भांडणे फारशी नाहीत. मी अतिशय तळमळीने कष्ट करीतच राहणार असून मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, तरी फिकीर नाही!"
"एका गरीब कुटुंबातून आलेल्या आणि रोजगार हमीवर काम केलेल्या माझ्यासारख्या तरूणाला आमदारकीची संधी मिळेल, असेही वाटले नव्हते. नंतर मंत्री व उपमुख्यमंत्रीपद मिळाले. या पक्षात तिकीट देताना धर्म, जात आणि पैसे खर्च करण्याची क्षमता हे प्रश्न विचारले जात नाहीत. पक्षाचे अनेक नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हे माझ्यासारखे गरीब घरातून आलेले आहेत आणि त्यांना सन्मानाने पक्षाने संधी दिली आहे. यात अतिशयोक्ती नाही!"
- इति उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर.आर. पाटील.
आरआरआबांची ही मुलाखत पाहा उद्या रात्री साडेनऊ वाजता... फक्त साम मराठीवर
1 comment:
राज साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, यशा कड़े वाटचाल करत रहा,
Post a Comment