
शिवसेनेबरोबरची युती जेव्हा संकटात होती, तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती

साम मराठीवर महाराष्ट्र कोणाचा या कार्यक्रमात पत्रकार राजू परूळेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतील ही काही प्रश्नोत्तरे...
गेल्या निवडणुकीत सरकारविरोधी जनमताचा (अँटी इन्कबन्सी फॅक्टर) फायदा घेता आला नाही. त्याचे विश्लेषण करून आगामी निवडणुकीत तुमची काय स्ट्रॅटेजी आहे?
- गेली आठ वर्षे राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार आहे. सत्ताधारी आघाडीने निवडणूक जाहीरनाम्यात सांगितले होते, की शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ, कर्ज माफ करू, कापसाला प्रतिक्विंटल 2500 रूपये भाव देऊ... अशा अनेक घोषणा केल्या होत्या. निवडून आल्यावर मुख्यमंत्री म्हणाले होते, की जाहीरनाम्यातील घोषणा पाळण्यासाठी नसतात. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रभा राव म्हणाल्या होत्या, की ती प्रिंटीग मिस्टेक आहे. तर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते, की तो आमचा निवडणूक संटट होता. ही जनतेची फसवणूक होती. आम्ही राज्य सोडले होते, तेव्हा राज्यावर 39 हजार कोटी रूपयांचे कर्ज होते. आम्ही सत्तेवर आलो होतो, तेव्हा 16 हजार कोटी रूपयांचे कर्ज होते. महाराष्ट्रावर आज एक लाख 51 हजार कोटी रूपये इतका कर्जाचा बोजा आहे. राज्यात गेल्या काही वर्षात सुमारे 15 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बिहार, उत्तरप्रदेशचा विक्रम तोडून महाराष्ट्रात 18-20 तास वीज भारनियमन सुरू आहे.
एन्रॉनप्रकरणी ते तुम्हाला जबाबदार धरत आहेत...
- हे सरकार येऊन 8 वर्षे झाली. एका वीज प्रकल्पाला चार वर्षे लागतात. आता आठ वर्षानंतरच्या स्थितीलाही आम्हीच जबाबदार कसे? हे आमच्यावर अन्यायकारक आहे. राज्याने 13 वीजप्रकल्पांबाबत सामंजस्य करार केले व उर्जामंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्याची विधीमंडळात घोषणा केली होती. त्यातील एक तरी आला का?
तुम्ही सत्तेवर आल्यावर तुमचे राज्याबद्दलचे स्वप्न काय?
- उद्योगधंदे व शेती अशा विकासाच्या दोन महत्वाच्या बाबी आहेत. उद्योगधंद्यांच्या विकासासाठी वीज, पाणी, वाहतूक व दळणवळण या गोष्टी आवश्यक आहेत. तर शेतीसाठी वीज, सिंचन सुविधा, खते, बियाणे, कमी व्याजदराचे कर्ज या गोष्टी महत्वाच्या आहेत. या गोष्टी उपलब्ध करून दिल्या, तर विकासदर वाढेल. रोजगार वाढेल. दरडोई उत्पन्न वाढेल. महाराष्ट्राचे चित्र बदलेल. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पतंगराव कदम, अशोक चव्हाण अमेरिकेत परकीय भांडवल आकर्षित करण्यासाठी गेले. ज्या राज्यात 18 तास वीजभारनियमन आहे, तेथे येण्यासाठी उद्योगपतींना काय वेड लागले आहे?
मोफत वीजेची घोषणा बाळासाहेब ठाकरेंनीही केली होती...
- त्याची अंमलबजावणी दोन वर्षात करता येईल. जादा वीजनिर्मिती करून शेतकऱ्यांना मोफत वीज देणे शक्य आहे. सरकारकडे इच्छाशक्तीच नाही. एका वीजप्रकल्पासाठी 28 ना-हरकत परवाने लागतात. प्रत्येक खाते झटपट काम करीत नाही व परवाने देत नाही. त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून प्रकल्प मार्गी लावले पाहिजेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गसाठीही पर्यावरणासह अनेक अडचणी होत्या. पण इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही ते अडथळे दूर केले. इच्छाशक्ती नसेल, तर सर्व्हे, सेमिनार, कमिटी, चर्चा, अहवाल हेच होत राहते. महाराष्ट्राला उद्योगधंद्यांमध्ये सहाव्या क्रमांकावर नेऊन ठेवले आहे. हे नरेंद्र मोदींच्या नावे खडे फोडतात, पण ते गुजरातला पहिल्या क्रमांकावर घेऊन गेले. त्याचे आम्हाला मराठी म्हणून दुःख आहे.
शिवसेनेने भाजपबरोबर सातत्याने मैत्री निभावलेली नाही. युतीचा धर्म पाळला नाही, अशी अनेक उदाहरणे आहेत. मग अशा मित्राला घेऊन सत्ता मिळवणे शक्य आहे का?
- जे झाले ते आम्ही विसरलो आहोत. कोणत्याही मैत्रीत लहान-मोठे वाद होतात. हिंदुत्वावरून शिवसेनेशी मैत्री आहे. झाले गेले विसरून महाराष्ट्रात युतीचे राज्य आणि देशात लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे राज्य आणायचे, असे आम्ही ठरविले आहे आणि कामाला लागलो आहोत. आम्ही निश्चितपणे राज्यात परिवर्तन करू, याची मला खात्री आहे.
लालकृष्ण अडवाणींच्या पंतप्रधानपदाच्या आकांक्षेसाठी भाजप राज्यात शिवसेनेच्या दावणीला बांधला गेला आहे का?
- हे असत्य आहे. अडवाणी ध्येयसमर्पित व राष्ट्रसमर्पित नेते आहेत. ते पंतप्रधान होण्यासाठी राजकारणात आलेले नाहीत.राजकारण हे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे एक साधन आहे, अशी त्यांची शिकवण आहे. अडवाणींचा कोणताही स्वार्थ नाही. भाजपला एकट्याच्या ताकदीवर पर्याय उभा करणे शक्य नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर समविचारी पक्षाशी झालेली आणि देशात सर्वाधिक काळ टिकलेली ही युती आहे. दोन व्यक्तींमध्ये 100 टक्के कधीच पटत नसते. घरात भावाभावांचीही वेगळी मते असतात. हिंदुत्वाच्या विचाराकरिता ही युती केलेली आहे. आम्ही लहानमोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून राष्ट्रहितासाठी मार्गक्रमण करणार आहोत. कटु गोष्टी विसरलो आहोत, त्याची आठवणही काढत नाही.
भाजपमध्ये संघाची शिस्त आहे. पण अशा पक्षात गोपीनाथ मुंडे यांचे बंड झाले. त्याबाबत तुमच्या दिशेने बोटे वळली होती. या परिस्थितीत भाजप कसा सत्ता मिळविणार?
- आम्ही आता सर्व विसरलो आहोत. मी त्यांचा कधीच अपमान केलेला नाही. ते आमचे नेते आहेत. मी वेगळ्या पध्दतीने काम करतो. एखादा निर्णय त्यांना आवडला नाही व ते नाराज झाले. त्यांच्या नेतृत्वाबद्दल आकस नसून, आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली निवडणुका लढणार आहोत. भविष्यात असे प्रसंग येणार नाहीत.
प्रदेशाध्यक्षाला कार्यक्षमतेनुसार माणसे नेमायची असतात. मुंडेंना त्यांची माणसे वेगवेगळ्या पदावर आणायची होती. व तुम्ही नेमत नव्हता. कार्यक्षमता न पाहता त्यांना आवडणारी नेमायचे ठरले, की काय झाले?
- मी राजकारणात आलो, ते सेवेचे व विकासाचे राजकारण करण्यासाठी. ते करताना पद मिळाले तर ठीक, पण ते मिळण्यासाठी मी काम करीत नाही. गोपीनाथ मुंडे मला खूप ज्येष्ठ आहेत. आमच्यातील गैरसमज आता दूर झाले आहेत. पक्षशिस्त म्हणून अंतर्गत व्यासपीठावर चर्चा केली पाहिजे, ती जाहीर करता कामा नये. ते माझ्या शिस्तीत बसत नाही. आमच्यातील भांडण व्यक्तिगत सत्तापदासाठी नव्हते. दोघांनी चर्चा करून प्रश्न मिटविला आहे.
तुम्हाला संघाचा भक्कम पाठिंबा आहे हे खरे आहे?
- तुम्ही संघावर अन्याय करता. संघ कुठलेही आदेश देत नाही. पाठिंबा देत नाही. सर्व संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांना चांगले काम करणे अपेक्षित असते. संघाने अमूक करा, हे सांगितलेले नाही. संघ समन्वयाचे म्हणजे दुधात साखर टाकायचे काम करतो.
विदर्भात शेतकरी आत्महत्या, बालमृत्यू, दुष्काळ, पूर, आदी प्रश्न आहेत. तुम्हाला त्यावर काय उपाय सुचविता येतील?
- राज्याच्या तिजोरीतील पैसा पश्चिम महाराष्ट्राला अधिक मिळाला. विदर्भाचा विकास झाला नाही. विशेषतः सिंचनाच्या बाबतीत अनुशेष खूप मोठा आहे. विदर्भात वीज तयार होते. वीजकेंद्राच्या बाजूच्या गावात 16-18 तास भारनियमन सुरू आहे. वन कायद्यामुळे सिंचनप्रकल्पही होत नाहीत. तेथील नेते विकासाकरिता पूर्ण ताकद पणाला लावून काम करीत नाहीत. पश्चिम महाराष्ट्राला मी दोष देणार नाही. आम्ही सत्तेवर असताना मी केवळ विदर्भ-मराठवाड्याचा विचार केला नाही. खंबाटकी घाट, मेळघाट परिसर, मुंबई पुणेमार्ग, नक्षलवादी भागातीलही रस्ते केले. विकास सर्व भागाचा व्हायला पाहिजे, हा विचार केला. शक्तिशाली नेते आपल्याकडे निधी ओढून घेतात. विदर्भाला पशुसंवर्धन, वस्त्रोद्योग व शिक्षण खाते आहे. अर्थ, गृह, सहकार, उर्जा, सगळी खाती पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडे आहेत. कॉंग्रेसमध्ये विदर्भाच्या मंत्र्यांना किंमतच नाही. कोणी मंत्रिमंडळात त्यांचे ऐकूनही घेत नाही.विदर्भ, मराठवाडा, कोकणच्या मंत्र्यांचे कोणी ऐकत नाही. या भागात सरकारविरूध्द असंतोष आहे. तेथील सिंचन प्रकल्प पूर्ण केले पाहिजेत. विदर्भातील अर्थकारण कापूस व सोयाबीनवर आहे. कापूस प्रक्रिया उद्योग आले पाहिजेत. त्याचबरोबर कपडे, पॅंट निर्यात उद्योग तेथे झाले पाहिजेत. विशेष आर्थिक क्षेत्र मुंबई परिसरात झाले, तर विदर्भात गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरला कोण जाईल? विदर्भात सवलती देऊ नका, पण मुंबईच्या 200 किमीपरिसरात उद्योगांनाही सवलती देऊ नका. मग आमच्याकडे विदर्भात उद्योग येतील. व्हिडीओकॉनची फॅक्टरी नवी मुंबईत कशाला?
विशेष आर्थिक क्षेत्राबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. याबाबत तुमचे धोरण काय?
- त्यासाठीच्या जमिनी सरकारने संपादित करू नये. उद्योगपतींनी बाजारभावाने जमिनी घेतल्या पाहिजेत. जेथे 100टक्के निर्यात क्षम उद्योग आहेत, तेच एसईझेड मुंबई परिसरात आणावेत. नाहीतर ते अन्य भागात गेले पाहिजेत. उद्योगांचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. अन्य भागातील लोकांनाही रोजगार मिळाला पाहिजे. तर प्रगती व विकासाचे विकेंद्रीकरण होईल. सांगली, आटपाडी, गडचिरोली येथे उद्योग नाहीत. मुंबई,परिसरात सवलती असताना मग याभागात कोण जाईल. प्रत्येक जिल्ह्यात एसईझेड करा. शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमोल भावाने संपादित करतात व उद्योगांना देतात. सरकार दलालीचे काम कशाला करते?
तुमच्या सरकारमध्ये मंत्री भ्रष्टाचारमुक्त होते का?
- आमचा पक्ष मोठा आहे. पक्ष भ्रष्टाचारमुक्त आहे, असा दावा करणे वेडेपणाचे आहे. पक्षात भ्रष्टाचाराला मान्यता किंवा प्रतिष्ठा नाही. पक्षात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. सर्वांसाठी असा दावा करणे बरोबर नाही. सिंचन, रस्ते, जीवन प्राधिकरण यांची कामे युतीच्या काळातही झाली. पण आता निविदा प्रक्रिया बंद आहे. मंत्री सांगतील, त्यांना कामे मिळतात. भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू आहे. सर्व सरकारच असे आहे. एसआरए, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, सर्व खाती सारखीच आहेत. मंत्री दुष्काळातून आल्यासारखे राज्यात लूटमार करीत आहेत. निवडणुकीनंतर आम्ही मंत्रालयात शपथ घेऊन जाऊ, तेव्हा मंत्रालयात आम्हाला बसायला टेबलखुर्ची तरी ठेवा. आठ मंत्र्यांविरूध्द उच्च न्यायालयाचे ताशेरे आहेत. सुरेशदादा जैन, नवाब मलिक, डॉ. गावीत आहेत. उच्च न्यायालय, लोकायुक्त यांचे मंत्र्यांविरूध्द ताशेरे आहेत. आमच्याकाळी अशा प्रकरणात लगेच चौकशी आयोग बसत असे. पण आता सरकार काहीच दखल घेत नाही. इतके बोजड सरकार आहे. आता कोणीही राजीनामा देत नाही. सरकार थंड असून संवेदनशीलता गमावली आहे.
विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांच्यात तोडबाजी आहे. कामे देण्यात टक्केवारी आहे. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाविरूध्द आवाज उठविला जात नाही?
- शिवसेना नेते उध्दव ठाकरे हेही भ्रष्टाचाराबाबत बोलले आहेत. काहींना कमी प्रसिध्दी मिळते. पण सरकार निगरगट्ट झाले आहे. भायखळ्याला 25 रूपये दराने जमीन विकली होती. वक्फ बोर्डाच्या जमिनी विकल्या. अनाथालय, कब्रस्तान याच्या जमिनी विकल्या जात आहेत.
मुसलमान समाजाला उखडण्याचे तुमचे तत्वज्ञान आहे?
- हे 100 टक्के चुकीचे आहे. हिंदुत्व हे मुसलमानाविरूध्द नाही. सर्वोच्च न्यायालयाने व्याख्या केली आहे की, हिंदुत्व ही जीवनपध्दती आहे. ते मुसलमानांविरूध्द नाही. स्वामी विवेकानंदांनी हिंदुत्वाची व्याख्या केली आहे. सेक्युलर शब्दाचा अर्थ सर्वधर्मसमभाव असा अर्थ आहे. धर्मनिरेपेक्ष असा त्याचा अर्थ नाही. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व. सावकरांचे विचार वाचा. देशाचा इतिहास म्हणजे हिंदुचा इतिहास. भारतीयांचा इतिहास म्हणजे औरंगजेबाचा? नाही, शिवाजी महाराज, राणा प्रताप यांचा इतिहास आहे. जगात हिंदूंचा देश कोणता? हिंदुस्थान व नेपाळ. हे दोनच देश आहेत. हिंदूची संस्कृती ही येथील संस्कृती. पाकिस्तानप्रमाणे धर्माधिष्ठित राष्ट्र निर्माण करणे आम्हाला अपेक्षित नाही.
मोगलांनी देशाच्या संस्कृतीत काहीही भर टाकली नाही?
- देशाच्या इतिहासाचे पुस्तक लिहायला सांगितले, तर कोणाचा इतिहास येईल. बौध्द, हिंदू, शीख यांचाच इतिहास येईल. या देशाची संस्कृती व इतिहास हा आमचा इतिहास आहे. संसदेवर हल्ला करणाऱ्या व सुरक्षा जवानांना मारणाऱ्या अफझल गुरूला हे सरकार फाशीची शिक्षा देत नाही. जवानांच्या विधवांनी आपली पदके फेकली. जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याशी लढताना जे गेले, त्यांना भरपाई व परिवाराला पेन्शन मिळते. हे का सुरू आहे.?
या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. आपल्या सरकारला दोन प्रकरणात अतिरेक्यांना सोडावे लागले?
- ही वेगवेगळी प्रकरणे आहेत. इंडियन एअरलाईन्सच्या विमानातील प्रवाशांना सोडण्यासाठी अतिरेक्यांना सोडावे लागले. जनतेने, पत्रकारांनी तशी मागणी केली होती. अफझल गुरूबाबत अशी काय अडचण आहे? बॉंबस्फोट घडविणाऱ्यांच्या वकिलाला स्वतःला राष्ट्रवादी म्हणविणारा पक्ष सरचिटणीस म्हणून नेमतो. तुम्ही पोटा कायदा का रद्द करतो. एका गटाचे तुष्टीकरण करण्यासाठी.
भाजप नारायण राणेंसाठी रेडकार्पेट ट्रीटमेंट देऊन पक्षात घेणार?
- मी व गोपीनाथ मुंडे यांनी राणेंबरोबर अनेक वर्षे काम केले. आमचे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत. त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा आमचे राजकीय संबंध संपले. शिवसेना सोडू नये, म्हणून मी त्यांना विनवणी केली. प्रयत्न केला. त्यांचे आमचे राजकीय संबंध नाही. भाजप-शिवसेना युती एकत्र आहे. आम्ही आतून राणे यांना पाठिबा देऊ अशी कृती करणार नाही. कॉंग्रेस नेहमी सर्वांना फसवतो. कॉंग्रेसमध्ये जाऊन राणे यांनी चूक केली आहे.
जागावाटपाबाबत भाजप व शिवसेना यांच्यामध्ये शिवसेना राज्यात व भाजप केंद्रात मोठा भाऊ अशी समीकरणे ठाकरे व महाजन यांनी ठरविली होती. ती समीकरणे बदलली आहेत व तशीच राहणार आहेत?
- हिंदू कुटुंबात आईवडिलांनी घेतलेल्या निर्णयाचे मुले जशी पालन करतात, तसे सुरू आहे.
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गुणदोष काय सांगता येतील?
- माझ्या मनात जेवढी श्रध्दा अटलबिहारी वाजपेयींबद्दल आहे, तेवढी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल आहे. भाजप-शिवसेना युती एक नैसर्गिक युती आहे. ज्याप्रकारे प्रमोद महाजन व बाळासाहेबांनी युती टिकविली आहे, त्याप्रमाणे बाळासाहेबांनंतर उध्दव ठाकरे व आम्हीही ती टिकवू. दुधात साखर टाकण्याचे काम आम्ही करू. काही पत्रकार व राजकीय नेत्यांना कायम वाटत असते, की आमची युती तुटावी.
भाजप व मनसे युती होण्याची हवा होती? आज तुमची भूमिका काय?
- राज ठाकरे शिवसेनेत होते, तेव्हापासून माझे त्यांच्याशी चांगले संबंध होते. मनसेबरोबर युतीचा प्रस्ताव कधीही नव्हता. मित्र म्हणून राज ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. शिवसेनेबरोबरची युती संकटात आली होती, तेव्हा आपण राज ठाकरे यांच्याबरोबर युती करावी असा विचार आला होता. पण सुदैवाने आमचे भांडण मिटले. राजकारणात आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. राज ठाकरे एक उत्तम व्यक्तिमत्व आहे. पण राजकारणात त्यांना फायदा होईल, असा एकही निर्णय मी घेणार नाही.
शिवसेना-भाजप युतीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्याचा संकल्प सोडला आहे का? तो सिध्दीस जाईल का?
- मागच्यावेळी सत्तेने जवळून हुलकावणी दिली होती. यावेळी मंत्र्यांविरूध्द जनतेमध्ये असंतोष आहे. राज्यात विकासाचे वातावरण तयार केले पाहिजे. चित्र बदलू शकतो, भारनियमन थांबवू शकतो, उद्योगांचे विकेंद्रीकरण करू शकतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू शकतो, याबाबत संयुक्तरितीने प्रचार करून जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला पाहिजे. लवकरच याबाबत योजना घेऊन आम्ही काम करू. युतीच्या काळातील काम व निर्णय आणि या सरकारचे निर्णय व कामगिरी यासंदर्भात जनजागृती व परिवर्तन अभियान सुरू करू. आमचीच सत्ता येईल व मंत्रालयावर भगवा फडकेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
जर शिवसेनेबरोबर युती नसेल, तर सर्वात जवळचा पक्ष कोणता असेल?
- शिवसेनेबरोबर युती असल्याने तसे उत्तर देता येणार नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------
उद्याची मुलाकत - उद्धव ठाकरे
"केवळ राजकारण म्हणून मराठीच्या मुद्द्याचा वापर करू नये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू आदींकडे दुर्लक्ष करून मराठीचा मुद्दा लावून धरण्याचा काहीच उपयोग नाही.''
- उद्धव ठाकरे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष. नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षाची पडझड रोखण्यात यशस्वी ठरलेले नेते. राज्यात सत्तापरिवर्तनाचे शिवधनुष्य पेलण्याविषयी त्यांनी केलेल्या वक्तव्यांतून "साम' वाहिनीवर त्यांची रंगलेली मुलाखत.
2 सप्टेंबर, रात्री 9.30
---------------------------------------------------------------------------------------------------
उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यासाठी एसएमएस करा. "मेसेज'मध्ये टाइप करा pun1, (आपला प्रश्न) आणि पाठवा 54321 वर. (एअरटेल मोबाईलधारकांनी 56666 ला एसएमएस करावा)
("एसएमएस'साठी ऑपरेटरनुसार एक ते तीन रुपये खर्च येईल)
3 comments:
This is the worst govt maharashtra has seen in her history.
No work in Past 9yrs. still these people want to get in power. why they should be allowed to even participate in elections?
I dont know why this person is given any importance ? Let him get elected by people atleast ones
Marathi Manus
Hi,
Aho kon ha manus? Bhala motha aakarane. Yala shetat kaam karayala lava. Rajkaran kartoya. Aho akkal bagh yanchi. Aaj-kaal paisa aale ki lok var rajya karayala neta banta. Raj thakre, koni sangitale neta banayala. Koni sangitale leadership ghyala. Shikun savrun administration madhe ka jaat nahit naukri karayala. Yanche kade paisa kuthun yeto. Kase kamvtat te bagha jara. Te vichara. Aaj kaal "POSTER" che mothe fad ahe yaa lokana.
Vichar kara.
Aapan pudhari nivdnyapeksha...changale administrative lok bagha..govt madhil ghaan kadha.
Post a Comment