Wednesday, August 27

आमच्यात मतभेद नाहीत!



अतिशय सामान्य परिस्थितीतून वर आलेले आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते ही उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते आर. आर. पाटील यांची ओळख. पत्रकार राजू परूळेकर यांनी महाराष्ट्र कोणाचा या कार्यक्रमात काल (ता. 27) सुमारे तासभर त्यांची मुलाखत घेतली. त्याचा हा गोषवारा....





आगामी निवडणुकीत जनता तुमच्या बाजूने राहील का? अँटीइन्कबन्सी फॅक्‍टर(शासनविरोधी जनमत) चा परिणाम किती होईल?
- महाराष्ट्र विचाराने जातो, भावनेच्या आहारी जात नाही. शिवसेना-भाजपने विकास व आर्थिक प्रश्‍नात राज्याचे नुकसान केले होते. राजकारण करताना राज्याची जडणघडण बिघडेल, असे काम त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांनी पाच वर्षे संपायच्या आत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मध्यावधी निवडणुका घेतल्या. लोकांनी त्यांचा अंदाज सपशेल खोटा ठरविला. जनतेपुढील अडचणी सोडविण्याचे काम करण्याचे सामर्थ्य विचाराने व ध्येयाने काम करणाऱ्या पक्षांकडेच आहे. जातीधर्मात तेढ निर्माण करणारे व धार्मिक आवाहन करणारे पक्ष विकासाचे काम करू शकणार नाहीत, हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे मतदार कॉंग्रेस व राष्ट्रवादीला पाठिंबा देतील. अपूर्ण पाटबंधारे योजना, वीजटंचाई या अडचणी आहेत. पण लोकशाही आघाडी सरकारने चार वर्षात बरेच काही केले आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च करून 1150 टीएमसी पाणी अडविले गेले आहे.

कारखाने, शिक्षणसंस्था तुमच्याकडे नाहीत. त्यामुळे तुम्हाला पक्षांतर्गत सरंजामदारीचा किती त्रास होईल?
- कारखाने, शिक्षणसंस्था नाहीत, हेच माझ्याकडे भांडवल आहे. निवडणुकांमध्ये लोक हेच भांडवल असते. चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांना आपलेसे वाटेल, असे शरद पवारसाहेबांचे नेतृत्व आमच्याकडे आहे. नेत्यांच्या महत्वाकांक्षांमुळे पक्षांतर्गत वाद अन्य पक्षांमध्ये आहेत. राष्ट्रवादी पक्ष त्याला अपवाद आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिक्षण, सहकार क्षेत्रात प्रभुत्व आहे. अनेक जिल्हापरिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. ज्या पक्षांकडे कार्यक्रम, कार्यकर्त्यांचे जाळे व पवारसाहेबांसारखे नेतृत्व आहे, तो निवडणुकीत बाजी मारेल, हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात आर.आर. पाटील यांच्या चेहऱ्याच्या आधारे निवडणुका लढविणार. तुम्हाला राष्ट्रवादीतील बलदंड नेते विरोध करीत असल्याने निवडणुकीत मार पडेल?
- प्रत्येक गोष्टींची नोंद पवारसाहेब घेतात. आमच्यात मतभेद नाहीत. पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकसंघ आहोत. कुणाच्याही नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या तरी पवारसाहेब व आमदार निर्णय घेणार, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे वाद करून उपयोग नाही. एकमेकांना अडविणे व नुकसान करणे, असे कोणीही नेता करणार नाही.

तुम्ही न दिलेल्या राजीनाम्याचे वृत्त तुमच्याच पक्षाचा नेता बाहेर फोडतो? शिस्तबध्द कार्यक्रम किंवा कायदा व सुव्यवस्थेसाठी केलेल्या तुमच्या कारवाईबद्दल काही नेते उघडपणे बोलतात?
- एखाद्या मुद्‌द्‌यावर कोणी बोलले म्हणजे पक्षात वाद असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. कमीत कमी वाद व एकजिनसीपणा राष्ट्रवादी पक्षात आहे. कधीही एका नेत्याकडे पाहून मतदान होत नाही. पक्षाचे अन्य नेते, कार्यक्रम, कार्यकर्ते आदी बाबींचा विचार करून लोक मत देतात. पक्षात आज तरूणांची फळी उभी आहे.

पक्षातील काही नेत्यांवर आरोप, न्यायालयांचे ताशेरे होते. स्वच्छ प्रतिमा व निष्कलंक चेहरा म्हणून पक्ष तुमचा वापर करीत आहे का? लोक तुमच्याकडे पाहून मतदान करतील?
- पक्ष चालविताना गुणदोषांसह माणसे स्वीकारावी लागतात. ज्यावेळी दोष स्पष्ट होतात. त्यावेळी पक्ष व नेतृत्व तटस्थ राहिले, तर मग दोष पक्षाचा आहे. अण्णा हजारे यांनी काही मंत्र्यांवर आरोप केले. त्यांचे राजीनामे घेतले, तर पक्षाचे नुकसान होईल, हे आम्हाला दिसत होते. पण लोकशाहीची बिघडत चाललेली मूल्ये व वातावरण पाहून पक्षाने या मंत्र्यांचे राजीनामे घेतले. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याची भूमिका पक्षाने घेतलेली नाही. मात्र राजकीय असूयेपोटी व बदनामीसाठी काहींनी खोटेनाटे आरोप केले. सर्वच आरोप खरे मानून कारवाया करत सुटलो, तर माणसेच शिल्लक राहणार नाहीत. ते खरे असले, तर कारवाई होईल.

ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव यासारख्या मूलभूत कामांना प्रसिध्दी कमी मिळते आणि चटकदार विषय म्हणून दहीहंड्या, हिरेजडित मोबाईल किंवा इतर इव्हेंटना अधिक प्रसिध्दी मिळते. त्याबाबत कसा विचार करता?
- महाराष्ट्रातील प्रसिध्दीमाध्यमांनी तंटामुक्त गाव, स्वच्छता अभियान याला चांगली प्रसिध्दी दिली. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद मिळाला. नाहीतर कार्यक्रम कागदावर राहतो, जनतेच्या मनाला भिडत नाही. युतीशासनाने सार्वजनिक शौचालये बांधण्यासाठी 487 कोटी रूपये खर्च केले व 14 लाख शौचालये बांधणार होते. पण त्यात भ्रष्टाचार झाला व कामे अपूर्ण राहिली. जी पूर्ण झाली, त्यात अन्य कारणांसाठी शौचालयांचा वापर होत असल्याचे दिसून आले. देशात 350 गावे निर्मल ग्राम ठरली असून त्यापैकी 158महाराष्ट्रात आहेत. दुसऱ्या वर्षी 750 पैकी 370 गावे राज्यातील असून यंदा सहा हजाराहून अधिक महाराष्ट्रातील गावांचा त्यात समावेश आहे. तंटामुक्त योजनेवर टीका झाली. पण आम्ही ताकदीने योजना राबविली. छोट्या गोष्टींसाठी मोठे गुन्हे घडत होते. राज्यात दरवर्षी साधारणपणे 2600 खून होतात. सगळ्यात क्षुल्लक कारणावरून झालेला प्रकार तपासला. एका पानपट्टीवर दोघे एकाचवेळी पान मागतात. एकाला पान दिल्यावर दुसऱ्याला राग येतो, तो पानवाल्यावर अडकित्ता मारतो. पानवाला दुसऱ्या धर्माचा असतो आणि एका पानामुळे उसळलेल्या धार्मिक दंगलीत 15 माणसे मरतात. राज्यात आज 20 लाख खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. लोक खेटे घालतात, खर्च होतो, सिस्टीमवरचा विश्‍वास उडेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे योजनेत 12 लाख तंटे नोंदले गेले व 2 लाख 64 हजार तंटे सोडवून न्यायालयाच्या परवानगीने मागे घेण्यात आले. समजूतदारपणा व शहाणपणाने राज्य पध्दतशीरपणे चालते. गावागावांत पारावरची न्यायपध्दती पिढ्यानपिढ्या होती. ती पुन्हा वर काढण्याचा प्रयत्न मी केला आहे. राज्यात 2309 गावे आज तंटामुक्त बनली आहेत.

पोलिसांना चांगल्या सुविधा, निवारा उपलब्ध नाही. पोलिसांवर राजकीय दबाब आहे व स्वातंत्र्य उरत नाही. याकडे कसे बघता?
- नैसर्गिक व अन्य आपत्तीस पोलिस पहिल्यांदा सामोरे जात असतात. त्यांच्यावरील ताण वाढत चालला आहे. सणासुदीला बंदोबस्त ठेवावा लागत आहे. पूर्वी निवडणुकीसाठी सर्वाधिक बंदोबस्त लागत असे. आता त्यापेक्षा अधिक बंदोबस्त गणेशोत्सवात लागतो. सण बंदोबस्तात, जयंत्या-पुण्यतिथ्या बंदोबस्तात, नेत्यांची सुरक्षितता, अतिरेक्‍यांचे संकट, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न आदींमुळे पोलिसांना रोज 14 तास काम करावे लागते. तीन महिन्यात सुटी मिळत नाही. त्यामुळे पोलिसांची संख्या वाढविली पाहिजे, असा निर्णय आम्ही घेतला. कोणत्याही खासगी रूग्णालयात चांगले उपचार घेण्याची सुविधा सुरू केली. देशातील कोणत्याही राज्यांपेक्षा अधिक पगार व अन्य भत्ते महाराष्ट्रातील पोलिसांना आहेत. अनधिकृत झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करून घर दिले जाते. पण आयुष्यभर कायदा पाळणाऱ्या पोलिसाला निवृत्त झाल्यावर किंवा नोकरीत मृत्यू झाल्यास निर्दयपणे त्याला किंवा कुटुंबियांना शासकीय घराबाहेर काढले जाते. त्यामुळे म्हाडाकडून राबविल्या जाणाऱ्या घरबांधणी योजनेत 5 टक्के घरे पोलिसांसाठी राखून ठेवून मालकी हक्काने देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

अधिक आमदार येऊनही कॉंग्रेससाठी भविष्यात मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे का? तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नाही का?
- मागील निवडणुकीच्यावेळी आमचे 71 व कॉंग्रेसचे 69 होते. कॉंग्रेसने पवारसाहेबांना पक्षातून काढले होते व आमचा पक्ष कॉंग्रेसमधून फुटून निघाला होता. पण विचार करून आम्ही कॉंग्रेसकडे मुख्यमंत्रीपद दिले होते. पुन्हा झालेल्या निवडणुकीनंतर आमच्या पक्षाने मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. धर्मनिरपेक्ष पक्षाच्या ताब्यात राज्य जावे, यासाठी आम्ही उदार भूमिका घेतली होती व त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले. राष्ट्रवादीसारखा पक्ष देशात कुठेही नाही. आमच्या निर्णयाचा आम्हाला पश्‍चातापही नाही.

जागा मिळविण्याची चढाओढ असते. मित्रपक्ष हा राजकारणात प्रतिस्पर्धीच असतो. इतर मित्रपक्ष शोधणे किंवा त्याच्याविरोधातील शक्तींशी अंतर्गत हातमिळवणी करणे याची कितपत शक्‍यता?
- लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळली जाईल व आमच्या आघाडीकडूनच निवडणुका लढविल्या जातील. जागावाटपात कदाचित वाद, संघर्ष होतील. पण एकदा वाटप झाले की एकदिलाने काम केले जाईल. पाठीमागून वार करण्याचे राजकारण होणार नाही. पवारसाहेबांच्या आदेशानुसार कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतील.

छगन भुजबळ नाराज आहेत. पक्षात मराठा व मराठेतर संघर्ष आहे का?
- काही वाद कल्पनेने रंगविले जातात. ज्यादिवशी छगन भुजबळ यांनी राजीनामा घोषित केला, तेव्हा पहिला दूरध्वनी मला केला होता. गृहमंत्रीपदासाठी मी तुमचे नाव पवारसाहेबांकडे सुचवितो, असे त्यांनी सांगितले होते. अजितदादा व माझे वाद आहेत, अशाही बातम्या येतात. पण मंत्रीपदी निवड झाल्याचा दूरध्वनी त्यांनीच मला प्रथम केला होता. माझ्या उपमुख्यमंत्रीपदाचे सूचक तेच आहेत. घरात भांड्याला भांडे लागते. घर फुटत नसते, प्रेम कमी होत नसते. सामान्य कुटुंबाइतकेही वाद आमच्यात नाहीत. जात-धर्म डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करीत नाही. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे, हीच विचारधारा घेऊन आम्ही वाटचाल केलेली आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्‍न होता. नामांतर केल्यास सत्तांतर होईल, असा इशारा आमदारांकडून पक्षाच्या बैठकीत देण्यात आला होता. पण दलितांच्या अस्मिता जोपासत असताना नामांतर केल्याने सत्ता गेली तरी चालेल, असे भाषण पवारसाहेबांनी केले होते व नामांतर करून दाखविले.

मराठी अस्मिता व परप्रांतीयांच्या लोढ्यांचा मुद्दा, याबाबत तुमची व पक्षाची भूमिका काय?
- देशाची घटना परिपूर्ण आहे. भाषा, प्रांत, देशाचा आदर असला पाहिजे. भारत व पाकिस्तान एकाच दिवशी स्वतंत्र झाले. तेथे एकच भाषा, धर्म व संस्कृती असून पाकिस्तान व बांगला देश निर्मण झाले. काश्‍मीर ते कन्याकुमारी विविध भाषा, धर्म व संस्कृती असून देशाची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. प्रांताचा मर्यादित विचार केला तर देश पूर्वीसारखा संस्थानांमध्ये वाटला जाईल.

भारत हा एक देश असला तरी व्यवहारात अन्य प्रांतीयांसाठीचे औदार्य अंगलट येईल, असे मत डॉ. आंबेडकर यांनी व्यक्त केले होते. याबाबत मत काय?
- देशाची राज्यघटना प्रमाण मानली पाहिजे. महाराष्ट्रात 10 कोटी लोक असून व 2 कोटी मराठी राज्याबाहेर रहात आहेत. मराठी माणसाला अन्य प्रांतात जाण्याचा अधिकार आहे, मग अन्य लोकांनी येथे येऊ नये, असे आपण कसे म्हणू शकतो.

जैनांकडून मराठी लोकांना मांसाहारी असल्याने घरे नाकारली जात आहेत?
- ते बेकायदा आहे. दुर्दैवाने हे घडते. हिंदूंच्या वस्तीत मुस्लिमांना घर नाकारले जाते. शबाना आझमी यांनी हे जाहीरपणेही सांगितले होते. जैनांनी हिंदूंना किंवा अल्पसंख्यांकांना व त्यांनीही एकमेकांना घरे नाकारू नयेत. सरकारच्या ज्या गृहबांधणी योजना आहेत, अशा ठिकाणी सर्वजातीधर्माचे लोक एकत्र आले पाहिजेत, अशी भूमिका घेता येईल. खासगी सोसायट्यांच्या बाबत काही कायदेशीर तरतूद करता येईल का, याचा मी विचार करीन.

तुमच्या सरकारच्या काळात उद्योगांना 16 ते 24 तास भारनियमन आहे. दुष्काळ व ओला दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, सिंचनाचा प्रश्‍न, वीजेचा प्रश्‍न यांचे स्वरूप अक्राळ विक्राळ आहे. मंदीची लाट, महागाई वाढत असताना निवडणुकीला कसे सामोरे जाणार?
- मी पहिले प्राधान्य शिक्षणाला देईन. सिंचन, धरणे, वीज याप्रश्‍नांवर आपल्याला जाताजाता एक-दोन वर्षात काम करता येईल. त्यांना मी फार मोठे मानत नाही.ज्ञानाला 21 व्या शतकात अनन्यसाधारण महत्व आहे. राज्याच्या विकासाचे गाडे योग्य मार्गावर आहे. सुमारे तीन लाख 53 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक राज्यात येऊ घातली आहे. सर्वाधिक वीज महाराष्ट्रात तयार होते. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती बरी आहे. सिंचनाच्या बाबतीत 18 टक्के यश आले. अजून 82 टक्के शेती जिरायती आहे. पण सरकारला दोष देऊन कसे चालेल. राज्यस्थापनेनंतर लगेचच यशवंतराव चव्हाण यांनी जल आयोगाची स्थापना केली. त्यांची किती दूरदृष्टी होती, हे त्यावरून लक्षात येते. जलसिंचनावर 45 हजार कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. सर्वाधिक धरणे व टॅंकरही महाराष्ट्रात आहेत. राज्यकर्ते किंवा तज्ज्ञ चुकले नसून भौगौलिक स्थिती हे त्याचे कारण आहे. नद्या उथळ असून पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आपल्या बेसॉल्ट खडकामध्ये कमी आहे. राज्यात 44 हजार हेक्‍टर ओलिताखाली आले व प्रकल्प पूर्ण झाल्यावर 27 हजार हेक्‍टर लवकरच येईल. राज्यात 85 हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आल्यावर ग्रामीण भागाला स्थैर्य प्राप्त होईल.

महाराष्ट्राचे संकल्पचित्र कसे बघता?
- जगाला पुढे नेणारे कुशल मनुष्यबळ राज्यात तयार झाले पाहिजे. कोठूनही पैशांची व्यवस्था करून राज्यात 27 हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणले जाईल. पण राज्यातील लोकसंख्येची केवळ शेतीवर उपजीवीका होणे अवघड आहे. राज्य उद्योगांच्या बाबतीत सदैव पहिल्या क्रमांकावर ठेवू.

तुमच्या पक्षाला किती जागा मिळतील.?
- आम्ही प्रत्येक निवडणुकीत निम्म्यापेक्षा जास्त आहोत. आमच्या ताकदीच्या तुलनेत जागा मिळाव्यात, अशी मित्रपक्षाकडून प्रयत्न आहे.

मुख्यमंत्रीपदाचे तुम्ही दावेदार आहात का?
- महाराष्ट्रातील 10 कोटी जनतेशी बेईमानी करून, आयुष्यभर स्वीकारलेल्या मूल्यांविरोधात वागून, पक्षाचे नुकसान व संघटनेची मोडतोड करून काही उपयोग नाही. त्यातून मानसिक समाधानही मिळणार नाही.

सरंजामशाही असलेले नेते तुमच्यावर व तुमच्या प्रगतीवर जळतात, हे खरे का?
- कोणीही मला विरोध केला असता, तर मी या पदापर्यंत पोचू शकलो नसतो. आमच्या पक्षात वाद नाहीत व सौहार्दाचे वातावरण आहे. छगन भुजबळ हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. संधी एकालाच मिळत असते व अन्य नेत्यांना वाईट वाटत नाही. त्यांना मिळाली, तर मला वाईट वाटणार नाही. आम्ही एकसंघ राहिलो तर त्यात राज्याचे आणि पक्षाचे भले आहे. त्यातून सर्वांचेच भले होत असते.

राज्यातील जनता आर.आर. पाटील यांच्यावर विश्‍वास ठेवते!
- मी एकटा कोण टिकोजीराव! आम्हा सर्व नेत्यांवर ती विश्‍वास ठेवते. संघटनेचे ते एकत्रित यश आहे. आम्ही एकत्रित केलेल्या कामाचे परिणाम आहेत.

नम्रपणा हा तुमच्या यशातील मोठा वाटेकरी आहे. पक्ष तुमच्या प्रतिमेवर अवलंबून आहे?
- तिकीट देताना आमच्या पक्षात जात, धर्म आणि पैसे खर्च करण्याची क्षमता हे प्रश्‍न विचारले जात नाहीत, याबद्दल मला पक्षाचा अभिमान वाटतो. रोजगार हमीवर ज्याने काम केले आहे, अशा माझ्यासारख्या सामान्य माणसाला प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्रीपदी नेतो. राज्यात असा कोणता पक्ष आहे ? गरीब घरातील अनेक व्यक्तींना पक्षाने सन्मानाची संधी दिली आहे, त्यांची यादीच देता येईल.

पक्ष, राजकारण, तुमच्या आयुष्यातील थक्क करणारा प्रवास आदींबाबत तळमळीने आपले म्हणणे आपण आमच्यासमोर ठेवलेत. आता जनताच ठरवेल, तुम्हाला व पक्षाला सिंहासनापर्यंत न्यायचे की नाही. धन्यवाद.
(शब्दांकन - उमाकांत देशपांडे)

--------------------------------------------------------------------------------------------------

उद्याची मुलाखत - छगन भुजबळ


""मी मुख्यमंत्री होणे, हा जर-तरचा प्रश्‍न आहे. पण मुख्यमंत्रिपद हे शक्तिस्थान आहे. त्याला चांगली साथ मिळाली, तर राज्यातील परिस्थितीत आमूलाग्र बदल करणे, अशक्‍य नाही.''
- छगन भुजबळ

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री, आधी शिवसेनेचे आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धडाडीचे नेते. समता परिषदेच्या माध्यमातून ते वेगळे विचारही मांडतात. त्यांची दिलखुलास मुलाखत रंगली "साम' वाहिनीवर.
ता. 28 ऑगस्ट, रात्री 9.30
-----------------------------------------------------------------

तुम्हाला भुजबळांना प्रश्‍न विचारयाचे असतील, तर आम्हाला एसएमएस करा. "मेसेज'मध्ये टाईप करा pun1, (स्पेस), प्रतिक्रिया आणि पाठवा 54321 वर (एअरटेल मोबाईलधारकांनी 56666 वर एसएमएस करावा)
"एसएमएस'साठी ऑपरेटरनुसार एक ते तीन रुपये खर्च येईल.

11 comments:

Anonymous said...

The people who call them self secular( Congress & NCP Party) are they going to give reservation to Maratha Caste in Maharashtra. If yes then what about the Suprem High Court decision of not exceding the reservation percentage above 50%.Then also if these people of congress & NCP gives reservation it is going to exceed 50% limit and it is going to affect to General Catogery very much which is going to reduce their chances of getting jobs in govt.sector and also it will heavily affect on their admissions in various colleges instead of getting good marks.As per the demand of reservation of 36% for Maratha Caste from various organisations the reservation percentage will go up to 86%because of that only 14% seats will remain for Open Category. Is it is fair to open catgory? What you fell about this who call them self very proudly as secular every time. It will be very much injustice to Open Category that they will get only 14% seats in govt. jobs & in all collages. Because of only 14% if the students of Open category do not get admissions in collages who will be responsible for that?. Should open Category people also come on the street like other people are comming for their reservation.Is this is your Secularism that the General Category people who are not that much aggresive nor they have powerfull control on politics nor they have organisation for their community who come on the street for their demands. So take disadvantage of that and impose very unlawful & wrong reservation policy.

Saam Team said...

thanks for your comment...

Anonymous said...

Saam... its very marathi theme! nice to read about maharashtra konacha...please do not stop here. take forward this concept some other way as well.. may be teachers, students, youth, housewives, work class, intellectuals. All of these will throw different light on this. donot concentrate on polititians only.
Best of 9 ...annasaheb, rajji, nitinji, vishwasrao
would like to read 10th part.

Unknown said...

mala ase vate ki raj is best cm for marashtra.

Anonymous said...

aamcha, marathi maticha jyala yeto sugandh, maharastra sathi jya aahe talmal, tya sarvancha.

this concept is too good, plz contiues this becoz this will bring great revolution in maharashtra as its necessicity of this time.

Kapil Paraji More said...

is there anyway we can see saam tv online

Anonymous said...

Namaskar,
"Maharashtra konacha" link e-sakal var baghitali. aani don diwasat sarv mulakhati baghitaya. ek-don vachlya.
Mala SAAM cha kharach khoop abhinand karavese vatate. Khoopach sundar kalpana aahe. Asech darjedaar karyakram det ja. istead of sasu-suna malika.

Raju Parulekar is cool! I liked the way he talks to all of them. He was really comfortable with all "Rajkarani"
Mi ek housewife aahe but in USA. pan barech varsh Maharashtrachya rajakaranashi sambhadh nahi. pan SAAM vahinemule aaj mala baryach goshti kalayla. Pratek pakshacha chehara kalala.

I will start taking interst in our politics. This time hopfully I will be in India to vote, I'll vote with after proper thinking.

Thank you SAAM.. Keep it up Mr. Parulekar.

Ashwini Deshapne

Unknown said...

mala ase vate ki raj is best cm for marashtra.

Anonymous said...

WHY ARE YOU PLAYING POLITICS ON " MARATHA WORD "?

Anonymous said...

Good evening

Great share, thanks for your time

Anonymous said...

Hello

Can I link to this post please?